कोरोनाबाधितांचे मनोबल वाढण्याचा घेतला वसा- भडगावच्या डॉक्टर दाम्पत्यांकडून योगाचे धडे

कोरोनाबाधितांचे मनोबल वाढण्याचा घेतला वसा- भडगावच्या डॉक्टर दाम्पत्यांकडून योगाचे धडे

भडगाव : कोरोनाने सध्या प्रचंड दहशत निर्माण केल्याने बाधित रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा सोडली तरी कोणीही त्यांच्याजवळ जायला तयार नाही. एवढेच नाही तर ज्यांना संशयित म्हणून क्वारंटाइन केले आहे, त्यांच्या आसपासही कोणी जायला धजावत नाहीत. खासगी डॉक्टर तर दुरुनच उपचार करताना दिसतात. मात्र, भडगाव येथील डॉ. नीलेश पाटील व डॉ. पल्लवी पाटील हे दाम्पत्य दररोज बाधित रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी सकाळी योगा व सायकांळी विविध खेळ घेत आहेत. यातून कोरोनाबाधितांचे मनोबल वाढवण्याचा जणू या दाम्पत्याने वसा घेतल्याचे दिसून येत आहे.

अशा प्रकारे सेवा देणारे राज्यातील हे पहिले खासगी डॉक्टर असण्याची शक्यता आहे. त्यांच्या या सेवाभावीवृत्तीचे कौतुक होत आहे. 
येथील डॉ. नीलेश पाटील व त्यांच्या पत्नी डॉ. पल्लवी पाटील हे पाच दिवसांपासून दररोज सकाळी व संध्याकाळी कोरोना बाधिताना योगाचे धडे तर सायकांळी त्यांचे विविध खेळ घेत आहेत. यामुळे रुग्णांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होत आहे. शिवाय त्यांचे मनोधैर्यही वाढत आहे. योगा आणि विविध खेळांमुळे रुग्णांमध्ये सकारात्मकता वाढीस लागण्यास मदत होत आहे. त्यांच्या या योगाच्या वर्गाला बाधित रुग्णांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून ते ही सेवा देत आहे. आतापर्यंत संशयित म्हणून क्वारंटाइन करण्यात आलेल्यांना योगाचे धडे देण्यात आल्याचे ऐकीवात आहे. मात्र, थेट बाधितांनाच योगाचे धडे देण्याचे धाडस करणारे हे डॉक्टर दाम्पत्य पहिले ठरले असावे. 

उपचारासाठी दाखविली तयारी 
डॉ. नीलेश व डॉ. पल्लवी पाटील या दाम्पत्याने प्रशासनाला स्वतःहून कोरोना बाधित रुग्णांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून उपचार करण्याची तयारी दाखवली. डॉ. नीलेश पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जळगाव जिल्हा सह संघचालक आहेत. सध्याचे केअर सेंटर हे अपूर्ण पडत असल्याने नवीन उपचार केंद्र सुरू करावे. त्या ठिकाणी देखील आपण रुग्णांवर पूर्णपणे उपचार करण्यास तयार आहोत, अशी मागणी डॉ. पाटील यांनी तहसीलदार माधुरी आंधळे यांना दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून त्यांना आपलेपणा वाटावा व त्यांचे मनोधैर्य वाढावे म्हणून योगा, विविध खेळ घेत असल्याचे डॉ. नीलेश पाटील यांनी सांगितले. यासाठी त्यांना तहसीलदार माधुरी आंधळे, पोलिस निरीक्षक धनंजय येरूळे, डॉ. पंकज जाधव, डॉ. प्रशांत पाटील यांचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com