मालेगावात बंदोबस्ताला गैरहजर; आणखी दोघे पोलिस निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 May 2020

"कोरोना' साथरोग नियंत्रणात कार्यरत पोलिसांवर आणि खास करून मालेगावात नियुक्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर कटाक्षाने लक्ष दिले जात असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची आता गय नाहीच, असा संदेश पोलिस अधीक्षकांनी या कारवाईतून दिला आहे. 

जळगाव  : बंदोबस्तावर नियुक्त केले असताना मालेगावात हजर न होता, परस्पर दांडी मारणाऱ्या पोलिस मुख्यालयातील सोनजी सुभाष कोळी व महेंद्र प्रकाश शिंपी या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना आज निलंबित करण्यात आले. यापूर्वीच मालेगावात नियुक्तीच्या जागी गैरहजर असल्याने तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली असताना आजअखेर मालेगावात नियुक्त पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन झाले आहे. 

आर्वजून पहा : धक्कादायक: जिल्ह्यात आणखी 19"कोरोना' बाधित! 
 

जळगाव जिल्ह्यातून मालेगाव येथे 110 पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी जिल्हा मुख्यालयात नेमणुकीस असलेले सोनजी कोळी व महेंद्र शिंपी हे दोघे नेमून दिलेल्या ठिकाणी गैरहजर आढळून आले. संबंधित कर्मचाऱ्यांचा अहवाल मालेगाव विभागाकडून पोलिस अधीक्षकांकडे पाठविण्यात आला होता. पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी याबाबत अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना चौकशीच्या सूचना केल्याने चौकशीअंती त्यांनी सोनजी कोळी व महेंद्र शिंपी या दोघांचा चौकशी अहवाल पोलिस अधीक्षकांना सादर केला होता. त्यानुसार पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दोघांच्या निलंबनाचे आदेश आज पारित केले. कोव्हिड-19 अर्थात "कोरोना' साथरोग नियंत्रणात कार्यरत पोलिसांवर आणि खास करून मालेगावात नियुक्त कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर कटाक्षाने लक्ष दिले जात असून, कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची आता गय नाहीच, असा संदेश पोलिस अधीक्षकांनी या कारवाईतून दिला आहे. 

नक्की वाचा : डॉक्‍टरसह दोघे कोरोना पॉझिटिव्ह...बाधित एक रूग्णही गरोदर पत्नी, मुलासह पळाला 
 

कर्तव्यात कसूर भोवली 
मालेगाव बंदोबस्तावर सुरेश रूपा पवार (मुक्ताईनगर), प्रसाद सुरेश जोशी व परवेझ रईस शेख (तिघे मुख्यालय, जळगाव) नेमून दिलेल्या ठिकाणी गैरहजर आढळून आले. तसेच वरिष्ठांची परवानगी न घेताच जळगावात प्रवेश केला होता. अपर पोलिस अधीक्षकांनी चौकशी करून अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्यानुसार पोलिस अधीक्षकांनी 25 एप्रिलला सुरेश पवार, प्रसाद जोशी व परवेझ रईस शेख यांना निलंबित केले होते. त्यानंतर आज सोनजी सुभाष कोळी व महेंद्र शिंपी यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असून, मालेगाव बंदोबस्तात एकूण पाच कर्मचारी आतापर्यंत निलंबित करण्यात आले आहे. 

क्‍लिक कराः सगळ्यांचे चांगले होईल, माझा आर्शिवाद आहे  कोरोनामुक्त महिलेच्या भावना 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon malegaon duty Absence two polise Suspended