साथीच्या आजाराच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवा : महापौर भारती सोनवणे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 एप्रिल 2020

महापौरांनी सुप्रिम कंपनीच्या डेप्युटी जनरल मॅनेजर विपुल पारेख यांच्याशी चर्चा केली. त्यात 500 प्लास्टिक कोट उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद कंपनीने दिला असून लवकरच आरोग्य सेवा देणाऱ्या महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी प्लास्टिक कोट उपलब्ध होणार आहेत.

जळगाव :  शहरात कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून एक रुग्ण बरा झाला, तर एक मृत झाला आहे. श्वसनाशी निगडित असलेल्या "सारी' या आजाराने 18 बळी गेल्याचे गैरसमज पसरल्याने त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्याप्रमाणात भीती पसरली आहे. हा गैरसमज नागरिकांमधून दूर करावा. तसेच साथीच्या आजाराच्या सर्व उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या. 

आर्वजून पहा जळगावातील उद्योगाची चाके येणार रुळावर;  शंभरावर कंपन्या होणार सुरू
 

कोरोना, आयएलआय, सारी, एआयआरसह पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना वेळीच दूर ठेवत जळगावकरांना सुरक्षितता मिळावी यासाठी आढावा बैठक महापौरांनी घेतली. यावेळी स्थायी समिती सभापती ऍड. शुचिता हाडा, महिला व बालकल्याण सभापती शोभा बारी, नगरसेवक कैलास सोनवणे, सदाशिव ढेकळे, पार्वताबाई भिल, मनोज काळे, अतुल बारी, डॉ. राम रावलानी, डॉ. राधेश्‍याम चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, डब्ल्यूएचओचे डॉ. प्रकाश नांदापूरकर, सहाय्यक आयुक्त पवन पाटील, डॉ. विकास पाटील, डॉ. शिरीष ठुसे, डॉ. नेहा भारंबे आदी उपस्थित होते. 

"त्या' रुग्णांची कोरोनाप्रमाणेच काळजी घ्या 
सध्या कोरोना सारखी लक्षणे असलेल्या काही रुग्णांचा स्वॅब तपासणी रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याचे आढळून आले आहे. टेस्ट निगेटिव्ह आले तरी त्या रुग्णांना कोरोनाची बाधा होण्याची शक्‍यता असल्याने त्याकडे दुर्लक्ष करणे चुकीचे ठरेल त्यासाठी काळजी घेणे आवश्‍यक आहे अशी सूचना डॉ. राधेश्‍याम चौधरी यांनी मांडली. 

नक्की वाचा :  दिलासादायक : त्या महिलेच्या संपर्कातील सात जणांचे अहवाल निगेटीव्ह 
 

आरोग्य सेवा देणाऱ्यांना प्लास्टिक कोट 
शहराच्या विविध भागात सर्वेक्षण करण्यासाठी फिरणारे आरोग्य कर्मचारी आणि रुग्णालयात सेवा बजावत आहे. त्यासाठी महापौरांनी सुप्रिम कंपनीच्या डेप्युटी जनरल मॅनेजर विपुल पारेख यांच्याशी चर्चा केली. त्यात 500 प्लास्टिक कोट उपलब्ध करून देण्याची मागणी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद कंपनीने दिला असून लवकरच आरोग्य सेवा देणाऱ्या महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेसाठी प्लास्टिक कोट उपलब्ध होणार आहेत. 

रुग्ण वाढीचा अंदाजानुसार तयारी 
जळगाव शहर मनपा अंतर्गत 10 आरोग्य केंद्र आहे. प्रत्येक केंद्राअंतर्गत सर्वेक्षण आणि नियोजन सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव शहरात वाढल्यास जास्तीत जास्त किती रुग्ण होऊ शकतात याचा अंदाज महापालिका प्रशासनाकडून सर्वेक्षणातून काढला आहे. त्या दृष्टीने खासगी रुग्णालयांचे अधिग्रहण, त्याठिकाणी सुविधा करणे याची माहिती माहिती डॉ. रावलानी यांनी दिली. 

रुग्णालयांनी द्यावी विहित नमुन्यात माहिती 
शहरातील खासगी रुग्णालयात असलेल्या रूम्सची पूर्ण माहिती अद्याप महापालिका प्रशासनाकडे उपलब्ध नाही. तरी शहरातील महापालिका अंतर्गत असलेल्या सर्व हॉस्पिटल्सने विहित नमुन्यात असलेली माहिती तातडीने महापालिका प्रशासनाकडे जमा करावी, असे आवाहन महापौरांनी केले आहे. 

क्‍लिक कराः PHOTO कॅरम, बुद्धिबळ खेळून कंटाळलात...मग आता हे खेळ खेळा 
 

"अमृत'मक्तेदारास महापौरांचे आदेश 
जळगाव शहरात "अमृत'योजनेचे काम "लॉकडाउन'मुळे बंद आहे. मात्र आता काही कामात शिथिलता दिली आहे. त्यात "अमृत'चे कामही सुरू करावे असे महापौर भारती सोनवणे यांनी मक्तेदारास कळविले आहे. त्यांनी सोशल डिस्टन्सिंग ठेवून कामगारांना आवश्‍यक ते मास्क तसेच सॅनेटायझरही द्यायचे आहे. उद्या (ता. 21) सकाळी अकराला मक्तेदारास महापालिकेत बोलाविण्यात आले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Mayor strikly order by jmc doctar and helth Officer