राणेंचे काय ? ते "महान' नेते...देशात ही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करतील ः मंत्री दादा भुसे 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याबाबत जनजागृती करीत आहे. यामुळेच कोरोना बाधीतांचा आकडा आटोक्‍यात आहे. विरोधी पक्ष कोरोनाच्या परिस्थितीतही राजकारण करीत आहे, हे चांगले नाही.

जळगाव : नारायण राणेंचे काय ? ते "महान' नेते आहेत. ते "केंद्रात'ही राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करतील. देशात कोरोनाचे संकट असताना त्यांनी राजकारण करणे योग्य नाही, अशी टीका राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी आज येथे केली. 

क्‍लिक कराः राणे शिवसेनेमुळेच मुख्यमंत्री बनले...आणि रस्त्यावर ही आले ः मंत्री गुलाबराव पाटील 

जळगाव, धुळे, नंदुरबार तीन जिल्ह्यातील खरीप तयारीचा आढावा घेण्यासाठी आज मंत्री भुसे जळगावला आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. भाजपचे नेते नारायण राणे यांनी राज्यपालांना भेटून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात महाविकास आघाडीचे शासन अपयशी ठरले आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधीतांचा आकडा व मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे, अशी कारणे त्यांनी राज्यपालांना दिली होती. 

श्री.राणेंच्या या मागणीवर मंत्री भुसे यांनी वरील प्रत्युत्तर दिले. 
राज्य शासन कोरोनोचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याबाबत जनजागृती करीत आहे. यामुळेच कोरोना बाधीतांचा आकडा आटोक्‍यात आहे. विरोधी पक्ष कोरोनाच्या परिस्थितीतही राजकारण करीत आहे, हे चांगले नाही. 

नक्की वाचा :  सद्य:स्थितीत राज्यात राजकीय उलथापालथ होणे अशक्‍य : एकनाथराव खडसे 
 

युरियाचा बफर स्टॉक 
मंत्री भुसे म्हणाले, की राज्यात खरिपासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खतांची टंचाई भासणार नाही. राज्यात 16 लाख मे.टन बियाण्यांची मागणी आहे. आमच्याकडे 17 लाख मे.टन बियाणे उपलब्ध आहे. युरियासह विविध प्रकारची खतेही उपलब्ध आहेत. राज्यात युरियाचा खताचा 50 हजार मे.टन बफर स्टॉक कृषी विभागाकडे आहे. शेतकऱ्यांनी युरियाचा वापर करताना संबंधित पिकांना मानवेल एवढाच युरिया टाकावा. 
सोयाबिनसाठी घरगुती बियाणे वापरण्याचे नियोजन आहे. या बियाण्यांची उगवण क्षमता कशी आहे याबाबत प्रयोग शाळेत प्रयोग सुरू आहेत. शेतकऱ्यांनी याबाबत कृषी विभागाशी संपर्क करावा. 

कापूस खरेदीची तारीख वाढणार 
मंत्री भुसे म्हणाले, की राज्यात अनेक शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक आहे. यासाठी कापूससह ज्वारी, बाजरी खरेदी केंद्र सूरू आहेत. जो पर्यंत शेतकऱ्यांचा माल आहे तो घेतला जाईल. 

पीक कर्ज वाटप सुरू 
ते म्हणाले, राज्यात शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप सुरू झाले. शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजने अंतर्गत जे पात्र शेतकरी असतील त्यांच्या खात्यावर लवकरच कर्जमुक्तीची रक्कम पडेल. सर्व बॅंकांनी शेतकऱ्यांना कर्ज त्वरित द्यावे. 

बांधांवर बियाणे 
शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या बांधांवर बियाणे, खते पुरविण्याचे ठरविले आहे. त्यादृष्टीने कृषी विभाग कार्यरत आहे. गावागावात बियाणे, खते पुरविली जातील. मिळाले नसेल तर शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क करावा. 

पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, उपसंचालक अनिल भोकरे आदी यावेळी उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon ministar dada bhuse stetment by narayan rane president will demand the implementation of the regime in the country