गिरीश महाजन माजी मंत्री असूनही चुकीच्या माहितीवर बोलतात : मंत्री गुलाबराव पाटील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 मे 2020

"कोरोना' रुग्णांसाठी तब्बल सात कोटी रुपये मंजूर केले. यात चोपडा, रावेर, धरणगाव ग्रामीण रुग्णालयासाठी तीन कोटी 78 लाख, आपत्ती यंत्रणेतून दोन कोटी; तर व्हेंटिलेटर रूम उभारणीसाठी आपत्ती व्यवस्थापनातून दोन कोटी मंजूर करण्यात आले आहेत.

जळगाव ः भाजपचे नेते गिरीश महाजन माजी मंत्री आहेत. मात्र, ते चुकीच्या माहितीवर बोलतात. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून जळगाव जिल्ह्यात "कोरोना' रुग्णांसाठी होणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली असती, तर त्यांना सर्वच माहीत झाले असते, असा टोला शिवसेना उपनेते व जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे. 

नक्की वाचा : जळगावने गाठली शंभरी; नवे दहा कोरोना बाधित 

भाजचे नेते व माजी मंत्री महाजन यांनी जळगाव जिल्ह्यात "कोरोना' रुग्णांसाठी केवळ चार व्हेंटिलेटर आहेत. अधिक व्हेंटिलेटर तत्काळ खरेदी करावेत, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आपण पत्र दिले. परंतु त्यांनी दखल घेतली नसल्याचा आरोप केला. महाजन यांच्या या आरोपाला मंत्री पाटील यांनी आपल्या शैलीत "सकाळ'शी बोलताना उत्तर दिले आहे. मंत्री पाटील म्हणाले, की जळगाव जिल्ह्यात "कोरोना' रुग्णांची संख्या वाढू नये तसेच रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी शासन उपायोजना करीत आहे. आतापर्यंत फक्त "कोरोना' रुग्णांसाठी तब्बल सात कोटी रुपये मंजूर केले. यात चोपडा, रावेर, धरणगाव ग्रामीण रुग्णालयासाठी तीन कोटी 78 लाख, आपत्ती यंत्रणेतून दोन कोटी; तर व्हेंटिलेटर रूम उभारणीसाठी आपत्ती व्यवस्थापनातून दोन कोटी मंजूर करण्यात आले आहेत. 

आर्वजून पहा : नऊ महिन्याची गरोदर...341 किमीची पायपीट अन्‌ रस्त्यावर न पाहवणारे दृश्‍य ​
 

व्हेंटिलेटर रूमचीच उभारणी 
जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाकरिता "कोरोना' रुग्णांसाठी अधिक व्हेंटिलेटरची गरज लक्षात घेऊन शासनाने तातडीने आपत्ती व्यवस्थापनातून दोन कोटी रुपये मंजूर केले. विशेष म्हणजे या ठिकाणी थेट व्हेंटिलेटर रूमच उभारण्यात येत आहे. राज्यात पुणे वैद्यकीय महाविद्यालयानंतर जळगाव वैद्यकीय महाविद्यालयातच ही सुविधा उपलब्ध होत आहे. या ठिकाणी व्हेंटिलेटर रूम तयार होत असल्याने रुग्णांच्या बेडजवळच व्हेंटिलेटरची नळी असेल. एक, दोन नव्हे; तर तब्बल पंचवीस ते तीस रुग्णांसाठी ही सुविधा असेल. विशेष म्हणजे या महाविद्यालयात ही कायमस्वरूपी सुविधा असेल. या कामाला मंजुरीही मिळाली आहे. त्याचे कामही वेगाने सुरू होत आहे. त्यामुळे अधिक व्हेंटिलेटरची सुविधा करण्यासाठी शासन काहीही करीत नसल्याचा आरोप चुकीचा आहे. 

माहिती घेऊन आरोप करावेत 
महाजन यांनी जिल्ह्यात "कोरोना' रुग्णांना व्हेंटिलेटर घेण्यास शासन दिरंगाई करीत आहे, असा आरोप केला. ते माजी मंत्री आहेत. मात्र त्यांना जिल्ह्यात कोणाकडे ही माहिती असते, याचीही माहिती नसावी. जर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली असती, तर त्यांना "कोरोना' रुग्णांसाठी शासनातर्फे करण्यात येत असलेल्या उपायोजनांची माहिती मिळाली असती. परंतु कोणतीही माहिती न घेता त्यांनी चुकीचे आरोप केले आहेत. 

क्‍लिक कराःफौजदाराच्या पत्नीची डोक्‍यात गोळी झाडून आत्महत्या ;गडचिरोलीतील घटना ; कौटुंबिक वाद विकोपाला 
 

जनतेसाठी सोबत काम करू 
"कोरोना'शी सर्वांनीच लढा द्यायचा आहे. अगदी भेदभाव विसरून जनतेसाठी काम करायचे आहे. त्यामुळे महाजन यांनी केवळ आरोप न करता "कोरोना'विरुद्धच्या लढ्यात शासनासोबत येऊन काम करावे, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon mla Girish Mahajan and Minister Gulabrao Patil Allegations