संसर्ग वाढूनही मनपा प्रशासन निद्रिस्त... कडक अमंलबजावणीची आवश्‍यकता ! 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 18 May 2020

जळगाव शहरातील 19 प्रभागांपैकी 13 प्रभाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. "कोरोना'चा रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाच्या घराचा परिसर सील केला जातो.

जळगाव  : शहराच्या नवनवीन भागात "कोरोना'चा शिरकाव झाला आहे. शहरातील निम्म्याहून अधिक भाग "कंटेन्मेंट झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे. या ठिकाणी नागरिकांकडून कुठल्याच प्रकारे नियम पाळले जात नसल्याचे "सकाळ'ने केलेल्या पाहणीत आढळून आले. नियम धाब्यावर बसविणाऱ्या नागरिकांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, महापालिका आयुक्तांनी सूचना करूनही अंमलबजावणी होत नसल्याने संसर्ग वाढत आहे. याला पोलिसांसह महापालिकेचे अधिकारी देखील जबाबदार आहेत. 

आर्वजून पहा : खडसे पक्षाबाबत घेत असलेली भूमिका वेदनादायी  : आमदार मंगेश चव्हाण 
 

जळगाव शहरातील 19 प्रभागांपैकी 13 प्रभाग प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहेत. "कोरोना'चा रुग्ण आढळल्यानंतर त्या रुग्णाच्या घराचा परिसर सील केला जातो. या परिसरात नागरिकांनी काही दिवस कंटेन्मेट झोनचे नियम पाळून घराबाहेर टाळणे आवश्‍यक आहे. मात्र, शहरात असलेल्या कंटेन्मेट झोनमध्ये नागरिक बिनधास्त वावरत असल्याबाबतचे वृत्त "सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. या ठिकाणावरील नागरिकांवर पोलिसांसह महापालिका प्रशासनाकडून कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, महापालिका आयुक्तांकडून केवळ बैठकांमध्येच सूचना देण्याचे काम करीत असल्याने प्रत्यक्षात कुठलीही कार्यवाही केली जात नसल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. 

कर्मचाऱ्यांचा बेजबाबदारपणा 
कंटेन्मेट झोनमधील नागरिकांना घराबाहेर न पडता त्यांना लागणाऱ्या अत्यावश्‍यक वस्तू आणण्यासाठी महापालिकेकडून प्रत्येक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी नियुक्ती केली आहे. मात्र, हे कर्मचारी ठराविक ठिकाणीच कर्तव्य बजावत असल्याने नागरिक बिनधास्तपणे कंटेन्मेट झोनमध्ये फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांसह कर्मचारीही बेजबाबदारपणाने वागत आहे. 

नक्की वाचा :  चिंताजणक...जिल्ह्यात अजून तेरा कोरोना बाधित रूग्ण आढळले 
 

मनपाकडून उपाययोजना शून्य 
शहरातील कंटेन्मेंट झोनमध्ये "कोरोना'चे रुग्ण वाढू नये, याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची आहे; परंतु महापालिकेकडून रुग्ण आढळला, त्यावेळेस केवळ निर्जंतुकीकरण करून तो परिसर सील केला जातो. परंतु त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून संसर्ग रोखण्यासाठी या ठिकाणी कुठल्याच प्रकारची उपाययोजना केली जात नसल्याने "कोरोना'ची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

..तर परिस्थिती गंभीर 
शहरातील दाटीवाटीच्या परिसरासह उच्चभ्रू परिसरात देखील कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी पोलिस प्रशासनासह महापालिका अधिकाऱ्यांकडून नियोजनबद्ध उपाययोजना करणे अपेक्षित आहे. येत्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आयुक्तांनी उपाययोजना न केल्यास शहराची "मालेगाव'सारखी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. 

संशयितांचा शहरात वावर 
पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात व ज्यांच्या कुटुंबीयांचा अहवाल "निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्या हातावर शिक्का मारला जातो. तसेच त्यांना पुढील काही दिवस "क्‍वारंटाइन' राहण्याचा सल्ला दिला जातो. अशांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही महापालिका प्रशासनाची आहे. मात्र, शहरातील पवननगर परिसरातील महिला "पॉझिटिव्ह' आली आहे. त्या महिलेच्या कुटुंबातील अन्य दोन व्यक्ती देखील "पॉझिटिव्ह' आल्या आहेत. त्या महिलेच्या पतीचा अहवाल "निगेटिव्ह' असून त्याला शिक्का मारून "क्‍वारंटाइन' राहण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, ही व्यक्ती कुठल्याही नियमांचे पालन न करता दिवसभर शहरात फिरत असल्याचे धक्कादायक चित्र शहरात दिसून येत आहे. 

नक्की वाचा :  सायकल आवडली अन्‌ लंपास केली  ; अल्पवयीन संशयीतांसह दोन दिवसात तीघे ताब्यात 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon municipal administration good not work by coron vhirase infection