वाढता आकडा थोपविण्यासाठी हवा "नाशिक पॅटर्न'! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 मे 2020

नागरिक बिनधास्तपणे रस्त्यांवरून फिरत आहेत. भाजीपाला घेण्यासाठीही गर्दी करीत असतात. यामुळे जळगाव शहरातच नव्हे, तर जिल्ह्यातील नवीन ठिकाणी "कोरोना'चे रुग्ण आढळून येत आहेत. 

जळगावः "कोरोना व्हायरस'चे संकट सर्वदूर पसरले आहे. एकवेळ "ग्रीन झोन'मध्ये आलेला जळगाव जिल्हा "रेड झोन' झाला आणि म्हणता म्हणता एक- एक परिसर "हॉटस्पॉट' होऊ लागले; परंतु "कोरोना'चा वाढता आकडा थोपविण्यासाठी नाशिकमध्ये ज्याप्रमाणे "लॉकडाउन'चे कडक पालन झाले, तेच अमळनेर शहरातही करण्यात आले. यामुळे काहीसे दिलासादायक चित्र या दोन्ही शहरांमध्ये पाहण्यास मिळू लागले आहे. जळगावमध्ये मात्र चित्र उलटे असून, "पॉझिटिव्ह' रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. 

आर्वजून पहा : खडसे पक्षाबाबत घेत असलेली भूमिका वेदनादायी  : आमदार मंगेश चव्हाण 
 

"कोरोना व्हायरस'चा प्रादुर्भाव वाढत आहे. यात जळगाव जिल्हा अडीचशेचा पल्ला गाठण्याच्या जवळ आला असून, अवघ्या काही दिवसांत हा आकडा पाचशेच्यावर पोचण्याची भीतीही व्यक्‍त केली जात आहे. हा वाढणारा आकडा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व महापालिका प्रशासनाकडून ज्या उपाययोजना करणे किंवा "लॉकडाउन'चे कडक पालन करणे आवश्‍यक आहे. मात्र, जिल्ह्यात अशा प्रकारचे चित्र पाहण्यास मिळत नाही. "लॉकडाउन' असतानाही नागरिक बिनधास्तपणे रस्त्यांवरून फिरत आहेत. भाजीपाला घेण्यासाठीही गर्दी करीत असतात. यामुळे जळगाव शहरातच नव्हे, तर जिल्ह्यातील नवीन ठिकाणी "कोरोना'चे रुग्ण आढळून येत आहेत. 

नक्की वाचा :  चिंताजणक...जिल्ह्यात अजून तेरा कोरोना बाधित रूग्ण आढळले 
 

नाशिकमध्ये 40 दिवसांचा "लॉकडाउन' 
राज्यात "कोरोना'चे रुग्ण वाढण्यामध्ये नाशिक जिल्हा सर्वांत पुढे होता; परंतु सद्यःस्थितीचे चित्र पाहिल्यास वाढता प्रादुर्भाव काही प्रमाणात रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. जेथे जिल्ह्यात रोजचे 40- 50 "पॉझिटिव्ह' रुग्ण आढळून यायचे; तेथे आज 15- 16 रुग्ण "पॉझिटिव्ह' येत आहेत. याला कारण म्हणजे नाशिकमध्ये "लॉकडाउन'चे काटेकोरपणे पालन करण्यात आले. "कोरोना व्हायरस'च्या पार्श्‍वभूमीवर देशात पहिला "लॉकडाउन' 23 मार्चपासून लागू करण्यात आला होता. तेव्हापासून तीन मेपर्यंत म्हणजेच चाळीस दिवसांचा "लॉकडाउन' काटेकोरपणे पाळण्यात आला. यात जिल्हा प्रशासनाकडून कडक नियम लावून नियम तोडणाऱ्यास दंड करण्यात आला. हेच काम नाशिक महापालिका प्रशासनाने केले. ज्या परिसरात एखादा रुग्ण "पॉझिटिव्ह' आला; तो भाग अगदी 14 दिवसांसाठी "सील' करण्यात येत होता. 

अमळनेरकरांचा "जनता कर्फ्यू' 
जिल्ह्याचा विचार केल्यास अमळनेर "हॉटस्पॉट' ठरला होता. जिल्ह्यातील एकमेव तालुक्‍याचे शहर हे शंभरी पार करणारे ठरले. अमळनेर शहरातील आकडा रोजचा वाढत असताना अवघ्या पंधरा दिवसांत शंभर रुग्ण झाले. यानंतर तेथे दोन टप्प्यांत आठ दिवसांचा "जनता कर्फ्यू' लावण्यात आला. यात भाजीपाला, किराणा दुकानांसह मेडिकलदेखील बंद ठेवण्यात आली होती. रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना दंड आकारणी झाली. यामुळे सद्यःस्थितीत शहरातील "कोरोना पॉझिटिव्ह' आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागली. "कंटेन्मेंट झोन'मध्ये "कोरोना पॉझिटिव्ह' रुग्णाच्या संपर्कातील कोणीच आढळून येत नसल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. 

क्‍लिक कराः संरक्षण क्षेत्रातील परकीय गुंतवणुकीस विरोध; आयुध निर्माणी संघटनांकडून निषेध
 

जळगावात कधी होणार अंमलबजावणी? 
"कोरोना व्हायरस'ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या शहरातील वेगवेगळ्या भागांतून वाढत आहे. असे असतानाही जिल्हा प्रशासन किंवा महापालिका प्रशासनाकडून कडक नियम लागू करण्यात येत नाहीत. नाशिक व अमळनेर येथे राबविण्यात आलेल्या उपाययोजनांसारखे कोणतेही चित्र जळगाव महापालिका किंवा जिल्हा प्रशासनाकडून होत असल्याचे पाहण्यास मिळत नाही. नागरिकांमध्ये पोलिस किंवा प्रशासनाची कोणत्याही प्रकारची भीती नसल्याने बिनधास्त फिरत आहेत. परिणामी "कोरोना'चा आकडा वाढत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Nashik pattern' is needed jalgao distrik to curb rising numbers!