अबब...शालेय व्हॅनमध्ये तब्बल 24 विद्यार्थी 

school van
school van

जळगाव : असुरक्षित आणि धोकादायक पद्धतीने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षा व व्हॅन चालकांवर उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे मोहीम तीव्र करण्यात आली आहे. शाळा सुटण्याच्या वेळी व्हॅन व रिक्षांची तपासणी करण्यात आली. यात विद्यार्थ्यांना फ्रंट सीटवर बसविणे, क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. तर एका व्हॅनमध्ये तब्बल 24 विद्यार्थी बसल्याचे आढळून आले. त्यावर अधिकाऱ्यांनी व्हॅनचालकाचे थेट पायच धरले.. 

क्‍लिक करा - दारू पिवून आले माफी मागायला आणि घरातच पत्नीवर केला चाकूचा वार

शहरातील आर. आर. विद्यालय, गुरुकुल इंग्लिश स्कूल, सेंट लॉरेन्स, वर्धमान, ओरियन आदी विविध शाळांच्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या ऑटोरिक्षांची आरटीओ अधिकाऱ्यांतर्फे तपासणी करण्यात आली. बहुतांश रिक्षांमध्ये सुरक्षेचे उपाय म्हणून जाळ्या बसवलेल्या आढळून आल्या तर काहींमध्ये धोकादायक पद्धतीने विद्यार्थी वाहतूक होत असल्याने अशा वाहनांना जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. 

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्‍याम लोही, किरण मोरे यांच्या मार्गदर्शनात आज (ता.27) शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीचा निर्णय घेण्यात आला. शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांची होणारी वाहतूक कोणत्या व कशा पद्धतीने होते, यासाठी शहरातील मुख्य रस्त्यांवर विविध पथके उभी करून त्यांना तपासणीच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शाळा सुटण्याच्या आणि शाळेत जाण्याच्या वेळेत जवळपास अडीचशे वाहने या पथकांनी तपासणी केली. त्यातून सर्वाधिक धोकादायक वाहतूक ऑटोरिक्षा चालकांद्वारे होत असल्याचे आढळून आले. आरटीओ पथकातील अधिकाऱ्यांनी तब्बल 24 ऑटोरिक्षा जप्त करण्यात आल्या. पथकातील मोटर वाहन निरीक्षक सचिन दळवी, विकास सूर्यवंशी, दीपक ठाकूर आणि सर्व सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी सहभाग घेतला होता. 

शाळांना तंबी 
आरटीओ विभागातर्फे तपासणी दरम्यान ज्या शाळांच्या विद्यार्थ्यांची धोकादायक पद्धतीने वाहतूक करण्यात आल्याचे आढळून आले आहेत. त्यात प्रामुख्याने चिमुरड्यांना फ्रंटसीट बसवणे, कोंबून अतिरिक्त विद्यार्थ्यांची वाहतूक, रिक्षातून जाताना विद्यार्थ्यांचे हात-पाय बाहेर आलेले आढळून आले असून, अशा रिक्षाचालकांची वाहने ताब्यात घेण्यात येऊन संबंधित शाळेच्या प्राचार्यांना लेखी स्वरूपात तंबी देण्यात आली आहे. स्कूल बस समितीचे अध्यक्ष म्हणून या धोकादायक वाहतुकीला प्राचार्य जबाबदार असल्याचेही सांगण्यात आले आहे. 

विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ 
आरटीओ अधिकाऱ्यांनी थांबविलेल्या शाळेच्या एका व्हॅनमध्ये चक्क 24 विद्यार्थी कोंबून भरण्यात आल्याचे आढळून आले. वाहनाला थांबविल्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी या चालकाला अक्षरश: हात जोडून विनंतीच केली. मुलांना मोजून परत बसवूनही बघितले. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळ होत असल्याने या वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करून शाळेलाही त्याची सूचना देण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com