धक्कादायक..शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी केली तयार...आणि केली शिक्षक भरती ! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 मार्च 2020


अहवाल माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषदेला सादर न करता परस्पर शिक्षण उपसंचालक, नाशिक यांच्याकडून शालार्थ आय. डी. प्रकरण मंजूर करून घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

जळगाव  : पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयात 5 शिक्षक व दोन शिपायांची बोगस भरती करण्यात आल्याचे आढळून आले आहे. तसेच अमळनेरच्या जय योगेश्‍वर माध्यमिक विद्यालयाने बनावट वैयक्तिक मान्यता आदेश तयार करून माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने अहवाल थेट शिक्षण संचालकांना सादर करून शालार्थ आयडी मंजूर करवून घेतल्याप्रकरणी संबंधित शिक्षक व शिपायांसह संस्थेच्या अध्यक्षाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गिरणाई शिक्षण संस्था संचालित आदर्श माध्यमिक विद्यालय, पाचोरा या संस्थेच्या संचालकांनी शासन निर्णयानुसार 8 रिक्त पदांवर बनावट संच मान्यतेच्या आधारे मयूर किशोर महाजन, मिलिंद माधव सावळे, संगीता मनोहर सोनवणे, संदीप दिनकर पाटील, वैशाली पुरणदास राठोड, शिपाई नितीन मिठाराम सोनवणे, निखिल विकास नाईक अशांची संस्थेचे अध्यक्ष, सचिव पंडित परशुराम शिंदे (पाचोरा) व मुख्याध्यापकांनी 5 शिक्षकांचे बनावट आदेश तयार करून त्यावर शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट सही करून अहवाल सादर केला आहे. चौकशीअंती वर्ष-2014 च्या जावक क्रमांक त्यावर नमूद असून, हा अहवाल माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत जिल्हा परिषदेला सादर न करता परस्पर शिक्षण उपसंचालक, नाशिक यांच्याकडून शालार्थ आय. डी. प्रकरण मंजूर करून घेतल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

आर्वजून पहा :  अरेच्चा... खराब रस्ते दाखविण्यासाठी..चक्क महापौरांना चालवावी लागली दुचाकी !  

अमळनेरच्या संस्थेतही प्रकार 
धुळे जिल्ह्यातील धनदाई माता एज्युकेशन सोसायटी मोहाडी (प्र.डांगरी) ता, जि. धुळे संचालित अमळनेर येथील जय योगेश्‍वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर (जि. जळगाव) यांनी पदे रिक्त नसताना देखील रोहिदास प्रताप ठाकरे, प्रदीप लीलाधर धनगर, भाग्यश्री रामदास वानखेडे, दत्तू भगवान कोळी यांची शिक्षणसेवक पदासाठी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय दयाराम पाटील व वसंत तानकू पाटील आणि संचालक मंडळाने शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट सही करून वैयक्तिक मान्यता आदेश तयार करून ते, शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत (माध्यमिक) सादर न करता परस्पर शिक्षण उपसंचालक नाशिक यांच्याकडून शालार्थ आयडी प्रकरण मजूर करवून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. 

नक्की वाचा :  न्यायालयाने केले आश्‍वस्त ... आणि सहा दिवसांनी स्वीकारला मृतदेह 
 

चौकशीअंती गुन्हा 
एकवीस जुलै 2014 ते सहा फेब्रुवारी 2020 दरम्यान पाचोरा येथील गिरणाई शिक्षण संस्था संचालित आदर्श माध्यमिक विद्यालय, पाचोरा आणि धनदाई माता एज्युकेशन सोसायटी मोहाडी (धुळे) संचालित जय योगेश्‍वर माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय, अमळनेर या संस्थेचे अध्यक्ष सचिव दत्तात्रय दयाराम पाटील, वसंत तानकू पाटील, संचालक मंडळ, मुख्याध्यापक यांनी संस्थेच्या शाळेतील उपशिक्षकांचे, शिक्षणसेवकाचे व शिपाई पदाचे रिक्त पदे नसतानाही शासनाकडे जिल्हा परिषदेमार्फत आदेश न पाठवता, शिक्षणाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षरीने प्रकरण सादर करून बनावट आदेश तयार करून शासनाची, उपसंचालकांची आणि शिक्षणाधिकाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

क्‍लिक कराः जैन समाजाचे क्रांतीकारी पाऊल... महावीर कल्याण महोत्सव अध्यक्षपदी प्रथमच महिलेची निवड 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Recruit teachers with fake signature of education officers