काहीही करा..आम्हाला मायदेशी परत आणा..रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांची आर्तहाक !

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

महाराष्ट्रीयन विद्यार्थी रशियातून परत यावे म्हणून माझे संबंधित यंत्रणांशी बोलणे झाले आहे. याबाबत फेजवाईज प्लॅनिंग झाले आहे. मात्र नेमके हे विद्यार्थी केव्हा परत येतील, हे निश्चित सांगता येणार नाही. 
 खासदार रक्षा खडसे. 

भुसावळ  : तुम्ही काहीही करा पण आम्हाला मायदेशी परत आणा हो! अशी आर्त हाक रशियात अडकलेल्या महाराष्ट्रातील १५७ विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे केली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वंदे भारत योजनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांबाबत दुजाभाव होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. 

क्‍लिक कराः तरुणाने "कोरोना'वर केली मात... दहाच दिवसांत "ओके',  पुष्पवृष्टीने स्वागत 
 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगात विविध देशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी केंद्र सरकार वंदे भारत योजना राबवीत आहे. अगदी रशियातूनही भारतीयांना आणले जाणार आहे. त्या यादीत महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांची नावे नसल्याने ते सर्व जण अस्वस्थ आहेत. राज्यातील सुमारे १५७ विद्यार्थी रशियात वैद्यकीय शिक्षण विविध विद्यापीठांमध्ये घेत आहेत. जिल्ह्यातील हर्षित वळिंकार (यावल), रोहित गरुड (जामनेर) व मेघना बागूल (जळगाव) हे तीन विद्यार्थी युलिनोव्हस्क मेडिकल युनिव्हर्सिटी मध्ये शिक्षण घेत आहे. याबाबत हर्षित वळिंकार याने सांगितले की, रशियातील महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधला तर ते म्हणतात की, महाराष्ट्र सरकारने अद्याप आम्हाला परवानगी दिलेली नाही. हॉस्टेल मध्ये खाण्यापिण्याची व राहण्याची सर्व व्यवस्था चांगली आहे. मात्र रशियात कोरोनाबाधितांची संख्या तीन लाखाच्यावर पोचल्याने विद्यार्थी अस्वस्थ आहेत. हर्षितचे वडील ज्युक्टो संघटनेचे जिल्हा सरचिटणीस असून, ते म्हणाले मी खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेश पाटील यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते म्हणाले आम्ही विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. रोहितचे वडील दिलीप गरुड म्हणाले, रशियातून इतर विद्यार्थ्यांना आणण्याचे नियोजन झाले आहे. मग महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांवरच अन्याय कशासाठी. त्यांना मुंबईला आणणे शक्य नसेल तर नागपूर किंवा शिर्डीला आणावे. तेही शक्य नसेल तर दिल्लीचा पर्याय निवडावा. पण त्यांना मायदेशी आणावे, असेही श्री. गरुड म्हणाले. 
 

आर्वजून पहा : जळगाव जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आलेख वाढतोय 
 

ट्विटद्वारे विनंती 
आपल्या मुलांना रशियातून परत आणण्यासाठी महाराष्ट्रातील पालक आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत. काही पालकांनी नितीन गडकरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आदींना ट्विट करून महाराष्ट्रीयन मुलांना रशियातून परत करण्याची लवकर व्यवस्था करावी, अशी विनंती केली आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon Stuck in Russia mharastra studant help by govharment