गरोदर, स्तनदा मातांना प्रथमच मिळतोय सुकामेवा..कुठे मग वाचा ! 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 8 May 2020

जिल्हयातील दुर्गम भागात प्रत्येक माता व बालकांपर्यंत पूरक पोषण आहार पोहचावा यासाठी लॉकडाऊनच्या काळात मोठी कसरत झाली. मात्र जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सीमाताई वळवी, सभापती निर्मला राऊत आणि सीईओ विनय गौडा आदींचे प्रयत्न आणि सूचनेनुसार काम सोपे झाले. तीन प्रकल्पांत वाटप झाले असून उर्वरित प्रकल्पातही युध्दपातळीवर वाटपाचे नियोजन सुरू आहे. 
- वर्षा फडोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( महिला व बालकल्याण विभाग) 

नंदुरबार  : लॉकडाऊनच्या काळात गरोदर, स्तनदा माता व बालकांची पूरक पोषण आहारअभावी गैरसोय हाऊ नये यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने कंबर कसली असून सर्व मातांना हा आहार वेळेवर पोचविण्याची खबरदारी घेतली आहे. विशेष म्हणजे शासनाच्या सुचनेनुसार पूरक आहाराच्या रकमेत काही रक्कम टाकत प्रथमच या महिलांना सुकामेवा देण्यात येत आहे. या मातांना पन्नास दिवसांसाठीच्या या आहाराचे कीट देण्यात येत आहेत. शिवाय सहा वर्षाच्या आतील सर्व बालकांनाही ३२ दिवसांसाठी खजूर, गूळ, शेंगदाणे वाटप करण्यात येत आहेत. 

आर्वजून पहा : जिल्ह्यात अजून 14 पॉझिटिव्ह...सर्व कोरोनाबाधीत रुग्ण अमळनेर मधील 
 

महिला व बालकल्याण विभागातर्फे जिल्हयातील २७ हजार ३०१ गरोदर व स्तनदा मातांना सुक्यामेव्यासह किराणा किटचे १२ प्रकल्पांमध्ये वाटप सुरू झाले आहे. प्रातिनिधिक स्वरूपात अमोनी (ता. तळोदा) येथे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड. सिमा वळवी यांचे हस्ते वाटप करण्यात आले. ७ महिने ते ६ वर्ष वयोगटातील १ लाख ४५ हजार १५२ बालकांना व गरोदर स्तनदा २७ हजार ३०१ मातांना एप्रिल व मे महिन्यातील ५० दिवसासाठी शिधा वाटप करण्यात आला आहे. 
 

क्‍लिक कराः भुकेने व्याकुळ पडलेला, जवळ कोणी जाईना...पण खाकी आली धावून !

असा आहे शिधा 
शिधामध्ये काजू, बदाम, मनुका व खारी या सुकामेव्याचे एकत्रित अर्धा किलोचे पाकिट, ३ किलो तांदूळ, ५ किलो गहू, १ किलो गुळ, १ किलो शेंगदाणे, प्रत्येकी ७५० ग्रॅम मसूर व हरभरा डाळ, २०० ग्रॅम मसाला, १०० ग्रॅम हळद व ५०० ग्रॅम मिठ व १.२५ लिटर सोयाबील तेल याचा समावेश आहे. याशिवाय ७ महिने ते ६ वर्ष वयोगटातील बालकाला ३२ दिवसासाठी ५०० ग्रॅम खजूर, प्रत्येकी ४०० ग्रॅम गुळ व शेंगदाणे देण्यात आले. 

नक्की वाचा : गिरीश महाजन माजी मंत्री असूनही चुकीच्या माहितीवर बोलतात : मंत्री गुलाबराव पाटील

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अॅड. सीमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, महिला बालकल्याण सभापती निर्मला राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी अमृत आहार योजनेवर लक्ष केंदित केले आहे. कोरोना संकटाच्या काळात देखील मातांना व बालकांना देखील आहार पोहोच केला. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandhurbar zp women and child development pregnant, lactating mothers diet