महिलांना गावातच मिळणार रक्कम! 

jan dhan yojna
jan dhan yojna

नंदुरबार : प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत महिलांच्या जन-धन बचत खात्यात पुढील दोन महिने पाचशे रुपये अनुदान जमा होणार असून, प्रत्येक महिन्यात जमा होणारी रक्कम त्यांना इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक व बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्राद्वारे घरपोच मिळणार आहे. 
योजनेंतर्गत जन-धन बँक खातेधारक महिलांना एप्रिलचे अनुदान वितरित करण्यात आले असून, मे आणि जूनमध्येही अनुदान वितरित करण्यात येणार आहे. ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून बँकेतील गर्दी टाळणे आवश्यक असल्याने प्रशासनामार्फत सर्व इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून गावपातळीवर व शहरात वॉर्डनिहाय सेवा देण्यात येत आहे. 

जिल्ह्यात इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकची १५० सेवा केंद्रे आहेत, तसेच बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्रांची संख्या १७२ आहे. या सर्वांची यादी तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांच्याकडे देण्यात येणार आहे. त्यानंतर गावातील व वॉर्डातील लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून पैसेवाटपाचे वेळापत्रक ठरविण्यात येईल. ग्राहकांना जाहीर दवंडीद्वारे पैसे मिळण्याचा दिवस कळविण्यात येईल. कुठल्याही राष्ट्रीयीकृत बँकेत आधार लिंक खाते असलेले सर्व ग्राहक या दोन्ही सेवांच्या माध्यमातून पैसे काढू शकतात. त्यासाठी ग्राहकांनी आधार कार्ड आणि मोबाईल सोबत न्यावा. ग्राहकांना पैसे काढण्यासाठी बँकेत जाण्याची आवश्यकता नसल्याने त्यांचा वेळ व श्रम वाचणार आहे. धुळे-नंदुरबार पोस्टाचे वरिष्ठ अधीक्षक अनंत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्ट पेमेंटचे काम होणार आहे. 

पैसेवाटप करताना एकावेळी चार ते पाच ग्राहकांना परवानगी देण्यात येईल. ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यात येईल. ग्राहक सेवा केंद्रात ग्राहकांना काउंटरपासून एक मीटर दूर उभे राहावे. ग्राहक सेवा केंद्रांना आपली यंत्रे वेळोवेळी स्वच्छ करण्याच्या आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत जन-धन खातेधारक ग्राहकांना या सेवा केंद्रातून पैसे काढण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. एकावेळी जास्तीत जास्त एक हजार रुपये काढता येतील. 

प्रशासनाचे आवाहन 
जिल्हास्तरावर जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक जयंत देशपांडे (९९२३६०१६५६), ‘नाबार्ड’चे प्रमोद पाटील (९९८७६६७८९१) आणि पोस्ट पेमेंट बँकेचे व्यवस्थापक योगेश शिंदे (९४२१६११६१८) हे काम पाहतील. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन बँकेतील गर्दी टाळावी. जवळील टपाल कार्यालय व बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. 

  
दृष्टिक्षेपात... 
- इंटरनेट कनेक्टिव्हिटी असलेल्या गावांत सुविधा 
- तलाठी, ग्रामसेवक एका दिवसातील लाभार्थी संख्या ठरविणार 
- एका दिवसात एका प्रतिनिधीकडून जास्तीत जास्त २५ हजारांचे वाटप 
- लाभार्थी पूर्ण होईपर्यंत संबंधित गावात वितरण सुरू राहणार 
- मोठे गाव असल्यास एकापेक्षा अधिक प्रतिनिधींचे नियोजन 
- एका ग्राहक सेवा केंद्राला (टच पॉइंट) तीन ते चार गावे जोडणार 
- ग्रामपंचायत किंवा पालिकेने निश्चित केलेल्या जागेवर वितरण होणार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com