esakal | केळी निर्यातीत भारत अव्वल ठरणार : के. बी. पाटील 
sakal

बोलून बातमी शोधा

banana_

केळी निर्यातीत भारत अव्वल ठरणार : के. बी. पाटील 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रावेर : सध्या भारतातून सुमारे ८५ हजार टन केळी विदेशात निर्यात होते; मात्र केळी उत्पादक शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध प्रयत्न केल्यास आणि केंद्र शासनाने मदतीचा हात दिल्यास देशातून २५ लाख टन केळी निर्यातीस वाव आहे. यातून भारत केळी निर्यात करणारा जगातील अव्वल देश ठरू शकतो, असे प्रतिपादन केळी तज्ज्ञ आणि जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष के. बी. पाटील यांनी आज त्रिची (तामिळनाडू) येथे व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय केळी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी आपले विचार मांडले. 

आर्वजून पहा : पाण्यावर तरंगणारी चप्पल दिसली...अन्‌ गावावर शोककळाच पसरली ! 

हॉटेल ब्रिझ रेसिडेन्सीच्या भव्य सभागृहात उपस्थित सुमारे साडेचारशे शेतकरी, शास्त्रज्ञ यांच्यासमोर बोलताना श्री. पाटील म्हणाले की, केळी उत्पादन आणि निर्यातीसाठी जैन इरिगेशनने नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान निर्माण केले आहे. ऑटोमेशन, ग्रँडनाईन जात, आणि ठिबक सिंचन या नियोजनबद्ध तंत्रज्ञानातून देशातील केळी निर्यातीची संधी निर्माण झाली आहे. सध्या देशातील सुमारे ८५ हजार टन केळी अरब देशात निर्यात होते. केंद्र शासनाने प्रयत्न केल्यास युरोप, रशिया, जपान, हॉंगकॉंग, कॅनडा, चीन आणि मध्यपूर्वेतील देशांमध्ये केळी निर्यातीची मोठी संधी उपलब्ध आहे. एकट्या रशियात २५ लाख टन केळी निर्यातीस वाव आहे. फिलिपिन्स आणि इक्वाडोर या सर्वाधिक केळी निर्यात करणाऱ्या देशांपेक्षा भारत देश तुलनेने कमी अंतरावर आहे. केळी उत्पादक शेतकऱ्यांनी देखील निर्यातीचे ध्येय डोळ्यासमोर ठेवूनच दर्जेदार उत्पादन करण्याचे आवाहन श्री. पाटील यांनी केले. 

क्‍लिक कराः  पेरूच्या ‘उत्राण ब्रान्ड'ची बाजारपेठेत चलती! 

प्रभावी सादरीकरण 
(ता. २२) आणि रविवारी (ता. २३) मिळून या जागतिक केळी परिषदेत ५२ शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी आपले सादरीकरण केले आहे. या सर्वात श्री. पाटील यांचे आज अवघ्या २५ मिनिटांचे सादरीकरण अत्यंत प्रभावी झाले. देश-विदेशातील उपस्थित सर्वच शेतकरी आणि अधिकाऱ्यांनी उभे राहून आणि टाळ्या वाजवून श्री. पाटील यांचे अभिनंदन केले. 

तज्ज्ञांचे मार्गदर्शन 

रविवारी दिवसभरात डॉ. सी. के. नारायणन (बंगलोर), डॉ. आय. रवी, डॉ. सेबास्टीयन कारपेंटीयर (बेल्जियम), डॉ. व्ही. कुमार आदी तज्ज्ञांचे केळीचे उत्पादन, नवे तंत्रज्ञान आणि पॅकेजिंग आदी विषयांवर मार्गदर्शन झाले. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही केळी परिषद म्हणजे एक पर्वणीच असल्याची प्रतिक्रिया प्रेमानंद महाजन, विशाल अग्रवाल, प्रशांत महाजन, प्रवीण महाजन या केळी उत्पादक शेतकऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

नक्की वाचा : मेहरुण तलाव परिसरात हजार वृक्षांची वनराई