व्यापारी संकुलाच्या लिलावामूळे शहादा नगरपालिकेच्या तिजोरीत आली लक्ष्मी

एल. बी. चौधरी
Friday, 13 November 2020

केंद्र सरकारच्या यूआयडी एसएमटी योजनेंतर्गत २०१० मध्ये येथील पालिकेने आरक्षण क्रमांक २१ वर ८८ गाळे असलेल्या दोन व्यापारी संकुलांची निर्मिती केली.

 शहादा ः येथील पालिकेच्या ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित आरक्षण क्रमांक २१ वरील व्यापारी संकुलातील ३८ दुकानांच्या लिलावातून सुमारे चार कोटी ६८ लाख ४६ हजार रुपये उत्पन्न मिळाले असून, दर वर्षी साधारणतः १२ लाख रुपये वार्षिक भाडे पालिकेला मिळणार आहे. 

आवश्य वाचा- धुळे महापालिकेत जुन्याच कामांचा उदोउदो ! 
 

केंद्र सरकारच्या यूआयडी एसएमटी योजनेंतर्गत २०१० मध्ये येथील पालिकेने आरक्षण क्रमांक २१ वर ८८ गाळे असलेल्या दोन व्यापारी संकुलांची निर्मिती केली. पैकी एका व्यापारी संकुलातील तळमजल्यावरील २५ गाळ्यांचा लिलाव झाला होता. उर्वरित ६८ गाळ्यांचा लिलाव झाला नव्हता. व्यापारी संकुलातील तळमजला व पहिल्या मजल्याच्या ३८ गाळ्यांचा लिलाव करण्याचा ठराव पालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते मंजूर झाला. 

पालिका प्रशासनाने ११ नोव्हेंबरला त्याची आवश्यक प्रक्रिया पार पाडली. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या प्रक्रियेत सहभाग नोंदविला. लिलावप्रक्रिया पारदर्शकपणे पार पडावी, यासाठी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, गटनेते मकरंद पाटील, मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी काम पाहिले. लिलावावेळी नगरसेवक, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व इच्छुक गाळेधारक उपस्थित होते. 

तळमजल्यावरील गाळ्याला सर्वाधिक बोली 
तळमजल्यावरील गाळा क्रमांक १९ साठी सर्वाधिक ३१ लाख ५१ हजार रुपयांची बोली अविनाश मोरे यांनी, तर पहिल्या मजल्यावरील गाळा क्रमांक १४ साठी सर्वांत कमी तीन लाख दहा हजार रुपये बोली तुकाराम पाटील यांनी लावून गाळे प्राप्त केले. ३८ गाळ्यांसाठी पालिकेला त्रिसदस्यीय समितीने ना परतावा अधिमूल्य रक्कम ८७ लाख १६ हजार रुपये निर्धारित केली होती व एवढे अपेक्षित उत्पन्न ठरविले होते. मात्र लिलाव सुरू होताच सुमारे चार कोटी ६८ लाख ४६ हजार रुपये ना परतावा अनामत रक्कम पालिकेला प्राप्त झाली असून, या सर्व गाळ्यांच्या भाड्यापोटी पालिकेला दर वर्षी १२ लाख रुपये उत्पन्न मिळणार असून, तीन वर्षांनंतर या वार्षिक भाड्यात वाढ होणार आहे. 

वाचा- गहू, तांदुळ द्या अन्‌ घेवून जा हवे ते; दिवाळीमुळे मिळतोय फराळ

संपूर्ण लिलावप्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यात आली. या लिलावातून पालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले असून, पालिकेचे उत्पन्न वाढावे, यासाठी याच संकुलातील पहिल्या व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावरील रिक्त २५ व इतर संकुलातील रिक्त गाळ्यांचा लिलाव करण्याचा मानस आहे. लिलावप्रक्रियेतील प्राप्त रकमेतून पूर्ण परिसराचा विकास करण्यात येणार आहे 
-राहुल वाघ, मुख्याधिकारी, शहादा 

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada Shahada Municipality got crores of rupees from the auction of the commercial complex