शिरपूर तालुक्यात फुलपाखरांच्या ७१ प्रजातींची नोंद 

सचिन पाटील 
Monday, 28 September 2020

फुलपाखरांना वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार संरक्षण दिले आहे. फुलपाखरांना निसर्गाचे संवेदनक्षम दर्शक म्हटले जाते. फुलपाखरे वनस्पतींच्या परागीभवनासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.

शिरपूर: येथील ‘नेचर कॉन्झर्व्हेशन फोरम’च्या सदस्यांनी बटरफ्लाय मंथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सप्टेंबर महिन्यात निरीक्षण करून फुलपाखरांच्या तब्बल ७१ प्रजातींची नोंद केली. अशा स्वरूपाचे सर्वेक्षण प्रथमच करण्यात आले. 

वाचाः धुळे जिल्ह्यात खासगी लॅबचा पॉझिटिव्हिटी रेट तुलनेने वरचढ

फुलपाखरांबद्दल जिज्ञासूंना अधिकाधिक माहिती मिळावी, या हेतूने संस्थेतर्फे हा उपक्रम हाती घेतला होता. सप्टेंबर महिना फुलपाखरांच्या निरीक्षणासाठी योग्य काळ असल्याने त्याला वन्यजीव अभ्यासक बटरफ्लाय मंथ म्हणतात. नेचर कॉन्झर्व्हेशन फोरमचे वन्यजीव अभ्यासक अभिजित पाटील, राहुल कुंभार, गिरीश सोनवणे यांनी तालुक्यातील करवंद मध्यम प्रकल्पाचा परिसर, मांजरोद येथील भुयारेश्वर मंदिर परिसर, शहरातील रिक्रिएशन गार्डन, श्‍यामाप्रसाद मुखर्जी गार्डन, बोराडी परिसरातील वने, लौकी तलाव परिसर अधिवासातील फुलपाखरांचे निरीक्षण केले. त्यात डेनाइड एगफ्लाय, कॉमन गल, कृष्णराजा, लिंबाळी, मोठा चांदवा, हबशी, गौरांग, बहुरूपी, छोटा मोलारी, पीकॉक पॅन्सी, बारोनेट, कॉमन कोस्टर, ग्रेट एगफ्लाय, ब्लू टायगर, ग्रास डेमन, कॉमन जय, प्लेन ऑरेंज टीप, क्रिमसन रोज आदींसह तब्बल ७१ विविध प्रजातींची फुलपाखरे असल्याची नोंद करण्यात आली. या निरीक्षणासाठी संस्थेला वन विभाग आणि जळगाव येथील बायो संस्थेच्या फुलपाखरू मार्गदर्शिकेचे सहकार्य लाभले. 

फुलपाखरांना वन्यजीव अधिनियम कायद्यानुसार संरक्षण दिले आहे. फुलपाखरांना निसर्गाचे संवेदनक्षम दर्शक म्हटले जाते. फुलपाखरे वनस्पतींच्या परागीभवनासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. फुलपाखरांबद्दल जनजागृती होण्यासह तालुक्यातील जैवविविधता ठळकपणे नोंदवता यावी, या हेतूने हे सर्वेक्षण करण्यात आले. 
-अभिजित पाटील, वन्यजीव अभ्यासक  

 

संपादन- भूषण श्रीखंडे
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Shirpur Eleven species of butterflies were surveyed by members of Nature Conservation