शक्कल लढवली आणि दोन महिन्यापासून अडकेले नाग सर्पमित्राने शिताफीने पकडले !

फुंदीलाल माळी
Wednesday, 7 October 2020

विहिरीत उतरणे सुरक्षित व शक्य नव्हते. त्यामुळे सर्पमित्रांनी हुशारीने सापांना काढण्यासाठी झाडाच्या फांद्या तोडून झुडपे दोराला बांधली. ते दोर विहिरीत सोडले.

तळोदा : तळोदा तालुक्यातील प्रतापपूर शिवारात 70 फूट विहिरीत दोन महिन्यापासून अडकून पडलेल्या दोन नाग सापांना सर्पमित्रांनी बाहेर काढले व त्यांच्या अधिवासात सोडले. त्यामुळे विहिरीत अडकून पडलेल्या सापांना आता मुक्त विहार करता येणार आहे. नाग सापांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी सर्पमित्रांनी लढवलेल्या युक्तीचे व त्यांनी दाखविलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे.

आवश्य वाचा- विद्यार्थ्याने लढवली अजब शक्कल, आणि दाखविले अकल के साथ भैस भी बडी !
 

तालुक्यातील प्रतापपूर शिवारात रविकिरण शिंदे यांचे शेत आहे. त्या शेतातील वापरात नसलेल्या विहिरीत दोन महिन्यापासून दोन नाग साप मुक्त विहार करताना पडले होते. विहीर कामात येत नसल्याने शेतमालक शिंदे यांनी सुरुवातीला त्या नाग सापांकडे दुर्लक्ष केले. मात्र विहिरीत पडलेल्या सापांबद्दल त्यांना मनातून दया येऊ लागली होती. कारण दोन्ही साप त्या विहिरीत बंदिस्त झाले होते. 

वाचा- धुळेकरांनो तुम्हीच तुमचा रस्ता व्यवस्थित दुरूस्त होत आहे का, नाही तपासा !

त्यामुळे रविकिरण शिंदे यांनी वन्यजीव संरक्षण संस्थेचे सदस्य अविनाश पाटील यांना त्याबद्दल माहिती दिली. तातडीने अविनाश पाटील आणि प्रमोद पाटील या दोन्ही सर्पमित्रांनी प्रतापपूर येथे जाऊन पाहणी केली. तर विहिरीत 50 फुटापासून पाणी होते. त्यामुळे विहिरीत उतरणे सुरक्षित व शक्य नव्हते. त्यामुळे सर्पमित्रांनी हुशारीने सापांना काढण्यासाठी झाडाच्या फांद्या तोडून झुडपे दोराला बांधली. ते दोर विहिरीत सोडले. टाकलेल्या झुडपांमध्ये व फांदीला अडकून दोन्ही नाग सुरक्षित बाहेर काढले. त्या दोन्ही नाग जातीच्या सापांना पकडून सर्पमित्रांनी त्यांच्या अधिवासात सोडले. त्यामुळे तेथे उपस्थितांना देखील रोमांच अंगावर येत होता. या कामात शेतमालक रविकिरण शिंदे ,रवी गोसावी ,गोपाळ कोळी, वसंत गोसावी ,राहुल निकुंभे यांनी सहकार्य केले. या घटनेची पंचक्रोशीत एकच चर्चा सुरू होती.

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news taloda Snake friends caught snakes stuck in the well for two months

Tags
टॉपिकस
Topic Tags: