द्राक्ष बागायतदारांना नुकसान भरपाई देणार : खासदार भामरे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 October 2019

गेल्या आठवडाभरापासून बागलाण तालुक्यात परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे द्राक्ष हंगाम वाया गेला असून डाळिंबासह खरीप पिके, भाजीपाला आणि इतर पिकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे.

सटाणा : 'व्यवसायाने डॉक्टर असलो तरी सर्वात आधी शेतकरी पुत्र आहे, त्यामुळे शेतकर्‍यांच्या दु:खाची मला जाणीव आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे,' असे आश्वासन माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी (ता.27) शेतकऱ्यांना दिले. 

गेल्या आठवडाभरापासून बागलाण तालुक्यात परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे द्राक्ष हंगाम वाया गेला असून डाळिंबासह खरीप पिके, भाजीपाला आणि इतर पिकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी केल्यानंतर रविवारी सूर्या लॉन्स येथे खासदार डॉ. भामरे आणि आमदार दिलीप बोरसे यांनी द्राक्ष व डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधला. 

- 'क्‍यार' चक्रीवादळाने धारण केले रौद्ररूप; काय होतील भारताच्या किनाऱ्यावर परिणाम?

यावेळी बोलताना आमदार दिलीप बोरसे यांनी नुकसानग्रस्त द्राक्ष बागांचे पंचनामे पूर्ण करून हा अहवाल येत्या 30 ऑक्टोबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार आहे. यावेळी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे आग्रह धरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

द्राक्ष पिकासमोर असलेल्या अडचणींवर तात्पुरता इलाज न करता त्या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विशेष कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पाऊस आणि खराब हवामानात तग धरणाऱ्या द्राक्षाची वाण विकसित करण्यासाठी जे प्लास्टिकचे अस्तरीकरण करावे लागते, त्यासाठीचे अनुदान आणि विमा धोरणात बदल करण्याबाबत प्रयत्न करणार आहे, असेही भामरेंनी स्पष्ट केले. 

- असे असेल एक नोव्हेंबरपासून कोकण रेल्वेचे वेळापत्रक

बैठकीत द्राक्ष उत्पादकांनी आपल्या भावना व्यक्त करताना द्राक्षाला जून ते जुलै महिन्यापासून विमा संरक्षण पुरवावे, प्लास्टिक अस्तरीकरणासाठी अनुदान द्यावे, हमीभावात वाढ करावी, बँकांशी बोलून कर्जाचे पुनर्गठन करावे आणि नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करीत खरीप हंगामातील मका, बाजरी, सोयाबीन अशा सर्वच पिकांचे वारेमाप नुकसान झाल्याचे सांगितले. नुकसानीची माहिती देताना अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले होते.

बैठकीस भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ.विलास बच्छाव, तालुकाध्यक्ष संजय भामरे, कृष्णा भामरे, किशोर खैरनार, केदा काकुळते, मनोहर देवरे, भास्कर सोनवणे, शिवाजी रौंदळ, प्रभाकर रौंदळ, पंकज ठाकरे, डॉ.शेषराव पाटील, खंडेराव आहिरे आदींसह द्राक्ष उत्पादक शेतकरी बहुसंख्येने संख्येने उपस्थित होते.

- चंद्रकांतदादांवर खासदार मंडलिकांचा पलटवार

रात्रीत होत्याचे नव्हते झाले

इजमाणे (ता.बागलाण) येथील युवा शेतकरी अभिजित धोंडगे यांनी वीस लाख रुपये खर्च करून निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतले होते. मात्र, दुर्दैवाने परतीच्या पावसाने त्यांच्या सहा एकरातील 42 टन द्राक्ष पिकाचे नुकसान झाले. खासदार डॉ. भामरे आणि आमदार बोरसे यांना सदर घटनेची माहिती देताना धोंडगे या युवा शेतकर्‍याने हंबरडा फोडला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Subhash Bhamre assured for compensation to grape gardeners for the loss due to rain