Malegaon : मुबलक उसामुळे राज्यात अजुनही 121 साखर कारखाने सुरु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sugarcane Farm

Malegaon : मुबलक उसामुळे राज्यात अजुनही 121 साखर कारखाने सुरु

मालेगाव (जि. नाशिक) : सलग दोन वर्षे समाधानकारक पाऊस झाल्यामुळे राज्यात ऊसाचे (Sugarcane) क्षेत्र वाढले आहे. मुबलक ऊसामुळे या वर्षी १९९ साखर कारखान्यांमधून (Sugar Factory) उत्पादन घेण्यात आले. एप्रिल अखेरपर्यंत ७८ कारखान्यांचा गळीत हंगाम बंद झाला. ऊस उपलब्ध असल्यामुळे मेच्या पहिल्या आठवड्यातही राज्यात १२१ कारखान्यांमधून साखरेचे उत्पादन सुरू आहे. हंगामात राज्यात आतापर्यंत १२७१ लाख टन ऊसाचे गाळप झाले, तर १३२५ लाख टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले. गेल्या वर्षाच्या तुलनेने या वर्षी साखर उत्पादनात लक्षणीय वाढ होणार असून, शिल्लक ऊसाचा प्रश्‍न भेडसावू शकेल. (121 sugar factories still open in state due to availability of sugarcane Nashik News)

राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम १५ ऑक्टोबरला सुरू झाला. १०० सहकारी व ९९ खासगी, अशा एकूण १९९ साखर कारखान्यांमधून साखरेचे उत्पादन घेतले जात आहे. एरव्ही एप्रिलअखेरपर्यंत बहुतांशी साखर कारखान्यांचा हंगाम संपलेला असतो. या वर्षी मुबलक ऊस असल्यामुळे अजूनही १२१ कारखान्यांचा हंगाम सुरू आहे. कोल्हापूर विभागातील ३६ पैकी ३३ कारखाने बंद झाले आहेत. पुणे विभागातील ३० पैकी १२ तर सोलापूर विभागातील ४७ पैकी २२ कारखाने बंद झाले. नगर विभागातील २७ पैकी २३, तर औरंगाबाद विभागातील २५ पैकी २३ कारखान्यांतील उत्पादन सुरू आहे. नांदेड विभागातील २७ पैकी केवळ एक कारखाना बंद झाला असून, उर्वरित सर्व कारखान्यातून उत्पादन सुरू आहे. अमरावती ३ पैकी २, तर नागपूर ४ पैकी २ कारखाने बंद झाले आहेत.

गेल्या वर्षी राज्यात ९४ सहकारी व ९६ खासगी, अशा एकूण १९० कारखान्यांचा हंगाम सुरू होता. या वर्षी ९ कारखान्यांची संख्या वाढली. गेल्या वर्षी २ मे २०२१ अखेर १०११ लाख टन ऊसाचे गाळप झाले होते. यातून १०६३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. या वर्षी याच तारखेपर्यंत १२७१ लाख टन ऊसाचे गाळप झाले असून, १३२५ लाख टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले. ऊसाची उपलब्धता लक्षात घेता यंदा मे अखेरपर्यंत साखर हंगाम सुरू राहण्याची शक्यता असून, विक्रमी साखरेचे उत्पादन होणार आहे. राज्यात ऊसाचे विक्रमी पीक घेण्यात आले. या वर्षी १९९ साखर कारखान्यांबरोबरच राज्यभरातील हजारो रसवंतीगृहांमधून ऊसाचा वापर करण्यात आला. मे अखेरपर्यंत हंगाम सुरू राहीला. तरीही काही प्रमाणात ऊस शिल्लक राहण्याची शक्यता आहे.

"राज्यात मे अखेरपर्यंत गळीत हंगाम सुरू राहीला, तरी शिल्लक ऊसाचा प्रश्‍न कायम राहणार आहे. हंगाम संपल्यानंतर अंदाजे ३० लाख टन ऊस शिल्लक राहण्याची शक्यता आहे. राज्य व केंद्र शासनाने शिल्लक ऊसासाठी शेतकऱ्यांना प्रतिटन ५०० रुपये अनुदान देऊन ऊस उत्पादकांना दिलासा द्यावा. कारखानदारांनी जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना ऊसाचा पहिला हप्ता एकरकमी तत्काळ द्यावा."
-कुबेर जाधव, राज्य समन्वयक, स्वाभिमानी शेतकरी संघटना