Chhagan Bhujbal : दरसवाडी-डोंगरगाव कालव्यासाठी 243 कोटी; भुजबळांच्या प्रयत्नांना यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chhagan Bhujbal News

Chhagan Bhujbal : दरसवाडी-डोंगरगाव कालव्यासाठी 243 कोटी; भुजबळांच्या प्रयत्नांना यश

येवला : चांदवडसह येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न असलेल्या व उत्तर-पूर्व भागाला जलसंजीवनी ठरणाऱ्या दरसवाडी डोंगरगाव पोहोच कालवा व पुणेगाव दरसवाडी डावा कालवाचे मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरण करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या सततच्या प्रयत्नांतून २४३ कोटी २३ लाखांचा निधी मंजूर झालेला होता.

या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून निविदा प्रस्ताव शासनाच्या मंजुरीसाठी गेला आहे. लवकरच या कामाचे कार्यारंभ आदेश निर्गमित होऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते डॉ. मोहन शेलार यांनी पत्रकान्वये दिली.

छगन भुजबळ यांच्या माध्यमातून येवल्यासाठी असलेल्या मांजरपाडा या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पातील दरसवाडी पोहोच कालवा व पुणेगाव डावा कालव्याची वहन क्षमता वाढविण्यासाठी या कालव्याचे मातीकाम, बांधकाम व अस्तरीकरण करण्याचे त्यांचे प्रयत्न होते. त्यानुसार या कामासाठी यापूर्वीच निधीला मंजुरी देखील देण्यात आली होती.

दरसवाडी पोहोच कालवा किमी ० ते ८८ चे मातीकाम बांधकामे व अस्तरीकरणाचे नूतनीकरण करण्यासाठी १४६ कोटी ८३ लाख तर पुणेगाव डावा कालवा किमी ० ते ६३ चे मातीकाम बांधकामे व अस्तरीकरणाचे नूतनीकरण करण्यासाठी ९५ लाख ५६ हजारांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

हे काम पूर्ण झाल्यानंतर मांजरपाडाचे पाणी डोंगरगावपर्यंत जाऊन येवला तालुक्यातील सिंचन क्षमतेत अधिक वाढ होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे असे मोहन शेलार यांनी म्हटले आहे.

असा आहे कालवा

तालुक्याच्या उत्तर पूर्व भागातील जनता १९७२ पासून ओझरखेड -डोंगरगाव कालव्याचे काम पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत होती. त्यातून पहिल्या टप्प्यातील २० कोटी खर्चाचे १३ ते ४२ किमीचे पूर्ण झाले. १० डिसेंबर २००५ ला तालुक्याच्या कातरणीसह उत्तरपूर्व भागात गुढीपाडवाच साजरा झाला. चैत्राचा महिना नसतानाही गुढी उभारली गेली.

किंबहुना तब्बल ४८ वर्षानंतर २०१९ मध्ये बाळापूरपर्यंत या कालव्याला पाणी आल्याने येवलेकरांनी दिवाळीच साजरी केली. आताही मांजरपाडाची कामेही मार्गी लागल्याने या कालव्याला नक्कीच पाणी वाहताना दिसणार आहे.

पाझरतलाव भरण्याची योजना या अंतर्गत आहे. त्यामुळे उत्तर पूर्व भागाला जलसंजीवनी मिळणार आहे. पाण्याचा होणारा पाझर व अपव्यय ही अडचणही आता अस्तरीकरणामुळे दूर होणार असल्याने तालुकावाशीयांच्या अपेक्षात नक्कीच वाढ झाली आहे.