esakal | मालेगावसह सटाण्यासाठी 5 हजार रेमडेसिव्हिर उपलब्ध; खासदार भामरेंच्या प्रयत्नांना यश
sakal

बोलून बातमी शोधा

remidesivir

मालेगावसह सटाण्यासाठी 5 हजार रेमडेसिव्हिर उपलब्ध; खासदार भामरेंच्या प्रयत्नांना यश

sakal_logo
By
टिम इ सकाळ

सटाणा (जि. नाशिक) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक व धुळे जिल्ह्यात रेमडेसिव्हिर औषधांचा तुटवडा जाणवत आहे. धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या माध्यमातून धुळे लोकसभा मतदारसंघासाठी पाच हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून दिलासा दिला आहे. मतदारसंघातील मालेगावसह सटाणा येथील खासगी कोविड सेंटरला बुधवारी (ता. १४) रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे वाटप करण्यात आले.

राज्यात रेमडेसिव्हिर इंजेक्शनची टंचाई भासत आहे. कोरोना रुग्णांसह त्यांच्या नातेवाइकांना धावाधाव करावी लागत आहे. नाशिक व धुळे जिल्ह्यातील कोरोनाची बिकट परिस्थिती लक्षात घेता खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी तातडीने दिल्ली गाठून केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची भेट घेतली. या भेटीत डॉ. भामरे यांनी डॉ. हर्षवर्धन यांना महाराष्ट्रातील कोरोनाच्या बिकट परिस्थितीबरोबरच रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या तुटवड्याबाबत सविस्तर माहिती दिली. राज्याला रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी साकडे घातले. इंजेक्शनची कृत्रिम टंचाई कशी दूर करता येईल यावरही चर्चा केली. डॉ. हर्षवर्धन यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. कोरोनावरील औषधांचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी तातडीने पाच हजार रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा उपलब्ध करून दिला.

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव व सटाणा येथील खासगी कोविड सेंटरला बुधवारी साठा देण्यात आला. दोन्ही तालुक्यांसाठी आता दररोज २५० ते ३०० इंजेक्शन पुरविली जातील.

येथील सिम्स हॉस्पिटलमध्ये भाजपचे बागलाण तालुकाध्यक्ष व बाजार समितीचे सभापती संजय देवरे व शहराध्यक्ष राहुल केदा सोनवणे यांच्या हस्ते इंजेक्शनचे वाटप करण्यात आले. भाजप किसान मोर्चाचे अशोक गुंजाळ, शेतकरी नेते दीपक पगार, भाजप ओबीसी जिल्हाध्यक्ष सुरेश मोरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण बधान, सरचिटणीस दिलीप खैरनार, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नीलेश पाकळे, जीवन सोनवणे, देवेंद्र पवार, किशोर कोठावदे, संदीप पवार, निरपूरचे सरपंच मुन्ना सूर्यवंशी, गौरव चंद्रात्रे, महेंद्र पवार आदी उपस्थित होते.

बागलाण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या नातलगांनी रुग्णांचे आधारकार्ड, त्यांचे कोरोना अहवाल, सीटी स्कॅन अहवाल यांच्या झेरॉक्स प्रती सोबत घेऊन तत्काळ खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या सटाणा येथील संपर्क कार्यालयासह जी. सोनवणे (मो. ९७३०९७३९९९) व राजेंद्र पवार (मो. ९९६०८१३३३८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन डॉ. भामरे यांचे स्वीय सहाय्यक डॉ. शेषराव पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये अडीच महिन्यांतच वाढले ६७ टक्के बेड, ऑक्सिजन बेडमध्ये दुप्पट वाढ

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन आणि प्रशासनाच्या सहकार्यामुळे मतदारसंघातील गरजूंसाठी पाच हजार रेमडेसिव्हिरचा मोठा साठा उपलब्ध करून दिल्याने मी समाधानी आहे. यापुढील काळात मतदारसंघातील जनतेला कोरोनासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे आणि अधिकाधिक आरोग्यविषयक मदत मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची यासाठी भेट घेणार आहे.

-डॉ. सुभाष भामरे, खासदार, धुळे लोकसभा मतदारसंघ