Latest Political News | BJP vs Shinde Group : शिंदे गटाविरोधात बीजेपीने थोपटले दंड; कारण आले समोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shinde Group vs BJP News

BJP vs Shinde Group : शिंदे गटाविरोधात बीजेपीने थोपटले दंड; कारण आले समोर

नाशिक : भाजपबरोबर सत्तेचा संसार थाटून चार महिने होत नाही, तोच शिंदे गटाविरुद्ध भाजप असे चित्र शहरात निर्माण झाले आहे. त्याला कारणीभूत पालकमंत्री दादा भुसे हे असून, शहरात शिंदे गटाची ताकद वाढविण्यासाठी महापालिकेस संबंधित प्रश्नांवर परस्पर बैठक घेऊन भाजपच्या आमदारांना निमंत्रित केले जात नसल्याची तक्रार करण्यात आल्याने भाजप व शिंदे गटात वादाला नवे तोंड फुटले आहे. (Bjp shinde group dispute over meeting of NMC nashik news)

हेही वाचा: BJPची ताकद असताना शिंदे गटाचा वरचष्मा; पालकमंत्रिपदावरून वादाची ठिणगी पडली

जून महिन्यात राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे बसले. त्यापूर्वी त्यांनी चाळीस शिवसेनेचे आमदार सोबत घेत भाजप बरोबर सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन झाल्यानंतर सत्तेचा गाडा आता कुठे रुळावर येत असताना भाजप व शिंदे गटात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण रंगले आहे. नाशिक शहरात कुरघोडीचा अध्याय मागील आठवड्यापासून सुरू झाला.

नाशिकचे पालकमंत्री भाजपकडे अर्थात गिरीश महाजन यांच्याकडे येईल, अशी अपेक्षा होती. परंतु, शिंदे गटाचे दादा भुसे यांच्याकडे पालकमंत्रीपद गेल्याने भाजपमध्ये नाराजी पसरली. आता त्या नाराजीने संतापाचे रूप धारण केले आहे. त्याला कारण म्हणजे पालकमंत्री दादा भुसे यांनी महापालिकेत संदर्भात दोन बैठकांचे आयोजन केले होते.

हेही वाचा: जिल्ह्याच्या नेतृत्वाची धुरा पुन्हा मालेगावकडे; दादा भुसेंकडे नाशिकचे पालकमंत्री पद

यातील एक बैठक महापालिकेत झाली, तर दुसरी बैठक मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्र्यांना समवेत असलेली बैठक वेळेवर रद्द करण्यात आली. मात्र, या दोन्ही बैठकांमध्ये भाजपच्या तीनही आमदारांना निमंत्रित केले नाही. त्यामुळे भाजप व शिंदे गट असा वाद निर्माण झाला असून, भाजपच्या आमदारांसह पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे या संदर्भात तक्रार केल्याचे समजते.

दोघांना हवीय महापालिकेवर पकड

भाजप- शिंदे गटामध्ये निर्माण झालेल्या वादास महापालिकेचे राजकारण कारणीभूत ठरताना दिसत आहे. येत्या काळात महापालिकेच्या निवडणुका होणार असून, या निवडणुकीत महापालिकेची सत्ता स्वतःकडे ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहे. मागील पाच वर्षे भाजपची सत्ता होती. त्यामुळे प्रशासनावर भाजपचा प्रभाव कायम आहे. मात्र, शिंदे गटाच्या एन्ट्रीमुळे हा प्रभाव कमी होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Nashik Political : सेनेच्या कार्यक्रमात BJP आमदाराची Entry