"कोरोनाबाबत असहकार्य केल्यास खासगी रुग्णालयांवर कारवाई"

chhagan bh.jpg
chhagan bh.jpg

नाशिक : कोरोनाच्या प्रभावावर नियंत्रणासाठी प्रशासकीय यंत्रणेतर्फे खबरदारीच्या उपाययोजना सुरू आहेत. मात्र, कोरोनाग्रस्त देशातून भारतात येणाऱ्या नागरिकांची वेळीच माहिती मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा विविध यंत्रणांनी आढावा बैठकीत व्यक्त केली. तसेच काही खासगी रुग्णालये कोरोनासारख्या संवेदनशील विषयात सहकार्य करीत नसल्याचे पुढे आल्याने, अशा रुग्णालयांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाईचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले. 

पर्यटकांची माहिती मिळावी 
दहा दिवसांत विदेशातील 22 नागरिक नाशिकला आले. मात्र, त्यापैकी 17 नागरिकांनी स्वतःहून जिल्हा आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधला. उर्वरित पाच नागरिकांबाबत जिल्हा यंत्रणेला कुठलीही माहिती मिळाली नाही. 17 जणांपैकी पाच नागरिकांनी स्वतःहून तपासणीसाठी संपर्क केला. त्यामुळे विपश्‍यना केंद्र, हॉटेल, कारखाने यांसह पर्यटनासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या देशांतून किंवा अन्य कुणी नाशिकला आल्यास त्यांची माहिती जिल्हा आरोग्य व पोलिस यंत्रणेला त्वरित मिळायला हवी. केंद्राकडून तसे निर्देश दिले जावेत. संशयितांसाठी कोरोटाइन कक्ष, तर बाधितांसाठी आयसोलेशन कक्षाची सोय असेल. बाधितांसाठी एका वॉर्डात एकाची सोय केली जाणार असल्याचे डॉ. जगदाळे यांनी सांगितले. 

..तर दवाखान्यावर कारवाई 
जिल्ह्यातील आपोलो रुग्णालयात कोरोनाच्या संशयावरून दाखल असलेल्या रुग्णाबाबत त्या आस्थापनेकडून कुठलीही माहिती दिली गेली नाही. हे निदर्शनास आल्याने आपोलो रुग्णालयाला नोटीस बजाविण्यात आल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी सांगितले. तसेच, कोरोना साथरोग हा विषय संवेदनशील असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गतचे विशेषाधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे अशी माहिती न देणाऱ्या रुग्णालयांवर प्रसंगी कारवाई होईल, असे संकेतही श्री. मांढरे यांनी दिले. 

जिल्हा शल्यचिकित्सकांना आपत्तकालीन विशेषाधिकार 
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. 9) आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्याधिकारी लिना बनसोड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदी उपस्थित होते. 

प्रतिबंधात्मक उपाययोजना 
कोरोना संशयितासाठी ः नाशिक रोडला शंभर खाटांचा कोरोटाइन कक्ष 
कोरोना बाधितांसाठी : आठ ठिकाणी 40 खाटांचा आयसोलेशन कक्ष 

रंगपंचमी करू नका म्हणणार नाही..पण... 

कोरोना साथीचा फैलाव होऊ नये म्हणून प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. रंगपंचमी करू नका म्हणणार नाही; पण सार्वजनिक ठिकाणी वावरताना काळजी मात्र प्रत्येकाने घेतली पाहिजे. खबरदारीचा उपाय म्हणून व्हेंटिलेटर, तसेच खासगी रुग्णालयांचे कक्ष ताब्यात घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत. - छगन भुजबळ, पालकमंत्री, नाशिक 
 

...त्यामुळे मास्कचा बाऊ करू नये.

कोरोनाच्या प्रादुर्भावाचा बाऊ करून विनाकारण मास्क लावण्याची गरज नाही. कोरोना बाधितांच्या संपर्कात येणाऱ्यांसाठी मास्क आवश्‍यक आहे. नाशिकला कोरोनाबाधित एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे मास्कचा बाऊ करू नये. - डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक 

हेही वाचा >  भयानक प्रकार! हुंडा दिला नाही म्हणून डोक्यात घातला लाकडी दांडका..
 
प्रतिबंधात्मक निर्देश 

* विपश्‍यना केंद्राने विदेशी नागरिकांबाबत खबरदारी घ्यावी 
* उद्योग, कंपन्या, रुग्णालयांना पत्राद्वारे सहकार्याचे आवाहन 
* मास्कसह इतर साहित्य विक्रीतील नफेखोरीवर राहणार लक्ष 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com