esakal | ‘सकाळ’चे आहे लक्ष; मृत कोरोनाबाधितांची मोठी आकडेवारी पोर्टलवर अपलोडच नाही
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

मृत कोरोनाबाधितांची मोठी आकडेवारी पोर्टलवर अपलोडच नाही

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : काही महिन्‍यांमध्ये रुग्‍णालयांकडून मृत कोरोनाबाधितांची मोठी आकडेवारी पोर्टलवर अपलोडच झाली नसल्‍याची बाब समोर येत आहे. यामुळे गुरुवारी (ता.१०) शासकीय यंत्रणेकडील दैनंदिन अहवालात कोरोनामुळे २७० मृत्‍यू झाल्‍याची नोंद नमूद आहे. यात यापूर्वी मृत्‍यू झालेल्‍या नाशिक महापालिका क्षेत्रातील १६४, तर ग्रामीणमधील ८५ मृतांसह एकूण २६० मृतांचा समावेश आहे. दिवसभरात नाशिक शहर तीन, नाशिक ग्रामीण सहा, जिल्‍हाबाहेरील एक अशा दहा बाधितांच्‍या मृत्‍यूची नोंद आहे.(corona-deaths-not-uploaded-on-portal-nashik-marathi-news)

‘सकाळ’चे आहे लक्ष...

एकीकडे रुग्‍णसंख्येत घट होत असताना, कोरोनाबळींच्‍या वाढत्‍या संख्येबाबत ‘सकाळ’मध्ये प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित केले होते. या वृत्तांची गंभीर दखल घेताना प्रशासकीय पातळीवर पोर्टलवर मृतांची संख्या युद्धपातळीवर अपलोड केली जात आहे.

प्रकरणाच्‍या चौकशीची आवश्‍यकता

यापूर्वी कोरोनामुळे मृत्‍यू झालेल्‍या रुग्‍णांची माहिती अलीकडे पोर्टलवर अपलोड केली जात आहे. खासगी रुग्‍णालयांकडून ही माहिती उशिराने अपलोड केली जात असल्‍याचे प्रशासकीय यंत्रणेचे म्‍हणणे होते. परंतु प्रत्‍यक्षात जाणीवपूर्वक मृतांची आकडेवारी लपविण्यात आली का, या संपूर्ण प्रकाराबाबत प्रशासकीय यंत्रणेला खरंच अनभिज्ञ होती का, अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळविण्यासाठी या प्रकाराची सखोल चौकशी होण्याची आवश्‍यकता व्‍यक्‍त होत आहे.

हेही वाचा: भीषण! एकमेकांवर आदळून नऊ वाहने अपघातग्रस्त

पोर्टलवर अपलोड झालेल्‍या वाढीव मृतांच्‍या संख्येची महिनानिहाय वर्गवारी अशी-

महिना नाशिक महापालिका नाशिक ग्रामीण मालेगाव मनपा जिल्‍हा बाह्य

डिसेंबर २०२० पर्यंत ५ ४ ० १

जानेवारी २१ २ ० ० ०

फेब्रुवारी २१ १ २ ० ०

मार्च २१ २५ ६ ० १

एप्रिल २१ ९८ ५१ २ ५

मे २१ ३३ २२ ० २

१० जून ३ ६ ० १

आरोग्‍यसेवकांवर कामाचा ताण वाढला

जिल्ह्यात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या घटत असताना मृतांची वाढती संख्या सर्वांसाठी अनाकलनीय होती. परंतु यासंदर्भात जिल्‍हा रुग्‍णालयातर्फे स्‍पष्टीकरण दिले आहे. त्‍यानुसार कोरोनाच्‍या दुसऱ्या लाटेत रुग्‍णांना आरोग्‍य व्‍यवस्‍था पुरविताना डॉक्‍टर, आरोग्‍यसेवकांवर कामाचा ताण वाढला होता. त्‍यातच काही कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती. काही वेळा तांत्रिक अडचणीही उद्‍भवत होत्‍या. या कारणांमुळे रुग्‍णालयांकडून त्‍यांच्‍याकडील मृतांची दैनंदिन आकडेवारी पोर्टलवर अपलोड करण्यात आली नव्‍हती. सध्या सुरू असलेल्‍या अद्ययावतीकरणामुळे जिल्ह्याच्या‍ मृत्‍यूंच्‍या संख्येत जरी काही प्रमाणात वाढ होत असली तरी मृत्‍युदर १.३१ वरून ०.८ ने वाढून १.३९ टक्‍के झाला असल्‍याचे नमूद केले आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये आता दुसरा 'मॅग्नाइट मॅन'!बघण्यासाठी गर्दी

सर्व रुग्‍णालयांना ताकीद

दुसऱ्या लाटेची दाहकता, वाढलेली एकूण रुग्‍णसंख्या, झालेले मृत्‍यू व प्रत्‍येक मृत्‍यूचे विशलेषण हे पुढील व्‍यवस्‍थेच्‍या सुधारणांसाठी आवश्‍यक आहे. शासकीय आरोग्‍य यंत्रणा तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी करत असून, कोविड पोर्टलवरील मृत्‍यू अद्ययावत करण्याची प्रक्रिया पुढील काही दिवस सुरू राहील. त्‍यामुळे मृत्‍यूंची संख्या वाढलेली दिसेल. यापुढे वेळोवेळी पोर्टलवर मृत्‍यूंची माहिती अद्ययावत करण्याबाबत सर्व रुग्‍णालयांना ताकीद दिली आहे. - अनंत पवार, जिल्‍हा नोडल अधिकारी, जिल्‍हा रुग्‍णालय