esakal | सावरू पाहणारा पदर पुन्हा निखळला! दुसऱ्या लाटेत पैठणीलाही फटका
sakal

बोलून बातमी शोधा

paithani

सावरू पाहणारा पदर पुन्हा निखळला! दुसऱ्या लाटेत पैठणीलाही फटका

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : रेशीम उकलण्यापासून तर सप्तरंगी धाग्यांची गुंफण करण्यापर्यंत अन्‌ पैठणी देखण्या महावस्त्राला ग्राहकांसमोर ठेवून विक्री करेपर्यंत असंख्य जणांचे योगदान लागते. मात्र कोरोनाच्या पहिल्या लाटेत विस्कळित झालेली घडी काहीअंशी पुन्हा बसू लागली आणि तोच दुसऱ्या लाटेचा झटका पैठणी व्यवसायाला बसला आहे. यामुळे वर्षभरात ३०० कोटींहून अधिक अर्थकारणाची घडी विस्कळित झाली आहे. शिवाय विणकर, विक्रेते, कारागीर या सर्वांनाच हाताची घडी बांधून बसण्याची वेळ आली आहे.

दुसऱ्या लाटेत पैठणीला ३०० कोटींवर फटका

सोळाव्या शतकापासून येथील पैठणी महावस्त्राने आपल्या नजाकतभऱ्या सौंदर्याने महिलांच्या मनावर राज्य केले आहे. किंबहुना येथील विणकरांच्या कलाकुसरीमुळे ग्लोबल व फॅशनच्या जमान्यातही पैठणी तितकीच लाडाची व प्रेमाची राहिली आहे. मागील पाच-सात वर्षांत तर येथील पैठणीने जागतिक बाजारपेठेही काबीज केली. किंबहुना येथील बाजारपेठेला कोट्यवधींचा आधार पैठणी देत आहे. चार जिल्ह्यांतून नव्हे, तर थेट मुंबई-पुण्यासह देशभरातील साईभक्तही पैठणीच्या खरेदीला येतात. त्यामुळे तीन-चार शोरूम असलेल्या या शहरात आता छोटे-मोठे शंभराच्या आसपास शोरूम झाले आहे.

हेही वाचा: कोविड सेंटरमध्ये 'नो स्टंटबाजी'; एकाच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये पेटला वाद

पैठणी व्यवसायाची घडी मोठ्या प्रमाणात विस्कळित

महामार्गावरही झालेले देखणे शोरूम ग्राहकांच्या पसंतीचे द्योतक आहे. सगळे सुरळीत सुरू असताना मागील वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत येथील पैठणी व्यवसायाची घडी मोठ्या प्रमाणात विस्कळित झाली. तीन ते चार महिने बाजारपेठा ठप्प राहिल्याने दोनशे कोटींवर उलाढाल ठप्प होऊन येथील विक्रेते, विणकर व कामगारांना झळ सहन करावी लागली. दिवाळीपासून बाजारपेठ पुन्हा सुधारून काहीअंशी पैठणीची घडी सुरळीत होऊ लागली होती.

हेही वाचा: लेकाच्या डोक्यावर अक्षता टाकून कृषिमंत्री लगेच ऑन फिल्ड!

विणकरांपुढे सवाल

जानेवारी-फेब्रुवारी तर लगीन सराईने पुन्हा ग्राहकांची रेलचेल वाढल्याने व्यवसाय स्थिरावला. मात्र, पुन्हा दृष्ट लागावी अशी अवस्था या व्यवसायाची कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत झाली आहे. शटर डाउन असल्याने व लग्नसराई बंद असल्याने मागणीच नसून विणकरांनी बनवलेल्या पैठण्या आहे तशाच कपाटात आहेत. विक्रेत्यांचे शोरूम फुल आहेत, तर विणकामापासून तर विक्रीपर्यंत काम करणाऱ्यांचे हाताला कुठलेच काम नसल्याने हजारो जण सध्या बेरोजगार झाल्याने संपूर्ण घडीच विस्कळित होऊन गेली आहे. घरातल्या घरात हा व्यवसाय असल्याने हातमागावर पैठणी विणणे शक्य आहे; पण मागणी व कच्चा मालाचा अभाव असल्याने पैठणी तयार करून काय करणार, असा सवाल विणकरांपुढे उभा राहिला आहे. अगोदरच व्यवसाय ठप्प असल्याने विणकाम करून साड्या कोण घेणार हा विणकरांना, तर दुकानात कामाला असलेल्या मजुरांना पगार कसा करावा, हा प्रश्‍न विक्रेत्यांसमोर उभा राहिला आहे. सर्व बाजूने घेरल्यागत या व्यवसायाची अवस्था झाल्याने कोरोनातून केव्हा मुक्ती मिळेल अन्‌ पुन्हा व्यवसाय पूर्वपदावर कसा येईल, याचीच चिंता आता विणकरांना लागली आहे.

ऑनलाइनला फटका

येथे दुकानदार, विणकरांसह इतर चारशे-पाचशे जण ऑनलाइन विक्रीचा व्यवसाय करत असल्याने पहिली लाट स्थिरावल्यानंतर राज्यभरातून ऑनलाइन पैठणी खरेदीचा जोर वाढला होता. दिवसाला हजारो साड्या येथून विक्री व्हायच्या. मात्र, आता लॉकडाउन झाल्याने ऑनलाइन विक्रीवरही परिणाम झाला आहे. कुरिअर सेवा सुरू असली तरी हाताळणी व कोरोनाच्या भीतीमुळे खरेदीकडे ग्राहक दुर्लक्ष करत आहेत.

एक नजर आकडेवारीवर

* पैठणीशी निगडित कुटुंब ः दोन हजार ५००

* विक्रेते - शोरूम ः दहा व इतर शंभरपर्यंत

* ऑनलाइन विक्रेते ः सुमारे ५००

* हातमाग ः चार हजार

* विणकर ः आठ हजार

* विणकर, कारागीर, कामगार आदी ः १५ हजार

* रेशीम विक्रेते ः दहा

* महिन्याला लागणारे रेशीम ः चार हजार किलो

* महिन्याला लागणारे जर ः ५०० किलो

* सांधणी कारागीर ः २००

* रेशीम उकलणारे कारागीर ः १५०

* रंगणी कारागीर ः १२

* विणकाम होणारी गावे - येवला, नागडे, बल्हेगाव, जळगाव नेऊर, आडगाव चोथवा, सुकी, अंगणगाव, नांदेसर, मातुलठाण, बाभूळगाव आदी.

लग्नसराई सुरू झाल्याने मागील दोन-तीन महिने येथील व्यवसाय काहीसा स्थिरावला होता. आता पुन्हा प्रचंड मंदीचा फटका सहन करावा लागत आहे. हातमाग कारागिरांच्या हाताला काम उरले नाही. लग्नाचा हंगामही सलग दुसऱ्या वर्षी वाया चालला आहे. या पुढील काळात परिस्थिती अशीच राहिल्यास अनेक हातमाग बंद होतील. -दिलीप खोकले, संचालक, कापसे पैठणी

loading image
go to top