esakal | शेतमालाची आवक घटल्याने उत्पन्नात घट; आठवड्याभरापासून ५० टक्के आवक

बोलून बातमी शोधा

Nashik

शेतमालाची आवक घटल्याने उत्पन्नात घट; आठवड्याभरापासून ५० टक्के आवक

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (जि. नाशिक) : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने काही दिवसांपूर्वी लॉकडाउन जाहीर केले आहे. लॉकडाउनमुळे नागरिक घराबाहेर पडत नसल्याने त्यातच ग्रामीण भागात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग वाढल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आणणाऱ्या शेतकऱ्यांनी कोरोनाची धास्ती घेत पाठ फिरवली. यामुळे दैनंदिन आवक ५० टक्क्यांपर्यंत घटल्याने परिणामी बाजार समितीच्या दैनंदिन उत्पन्नातदेखील साधारण अंदाजे तीन लाख रुपयांपर्यंत घट होत आहे.

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल खरेदी-विक्रीच्या माध्यमातून दैनंदिन सात कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होत असते. गेल्या दहा दिवसांपासून उन्हाळा जाणवू लागल्याने सर्वत्र शेतमालाची आवक घटली आहे. त्यातच आता ग्रामीण भागात कोरोना विषाणूने डोके वर काढल्याने शेतकरी भयभीत झाले आहे. शेतकऱ्यांनीदेखील कोरोनाची धास्ती घेत शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणण्याचे प्रमाण कमी केल्याने, तसेच कोरोना रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू करत लॉकडाउन जाहीर केल्याने व्यापारी वर्गानेदेखील शेतमाल खरेदीकडे दुर्लक्ष केले आहे. त्याचा परिणाम बाजार समितीत विक्रीसाठी येणाऱ्या दैनंदिन शेतमालाच्या आवकेवर झाला आहे. परिणामी, बाजार समिती आवक तर घटली आहेच, शिवाय बाजार समितीच्या उत्पन्नातदेखील घट झाली आहे.

हेही वाचा: "खडसेंचे मानसिक संतुलन बिघडले" गिरीश महाजन यांची टिका

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे बाजार समितीत शेतमालाची साधारण ५० टक्क्यांपर्यंत आवक घटली आहे. बाजार समितीला मिळणाऱ्या उत्पन्नापैकी दैनंदिन जवळपास तीन लाख रुपये उत्पन्न घटले आहे. शेतकऱ्यांनी कोरोनाची धास्ती घेतल्याने सध्या बाजार समितीत शेतमालाची आवक कमी प्रमाणात होत आहे. परिणामी, उत्पन्नात घट झाली आहे.

-देवीदास पिंगळे, सभापती, बाजार समिती, नाशिक

हेही वाचा: महामारी आजारांचा चारशे वर्षांचा इतिहास! सोशल मीडियावर संदर्भासह चित्र व वृत्त