कांदा निर्यात खुली : नाशिकहून मलेशिया-सिंगापूरसह श्रीलंकेसाठी कांदा बंदरांकडे रवाना 

onion market.jpg
onion market.jpg

नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यात खुली करण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार शुक्रवार (ता. १)पासून मुंबईसह तुतिकोरीनच्या बंदरात कांदा स्वीकारण्यास सुरवात होईल. याच पार्श्‍वभूमीवर नाशिकहून मलेशिया, सिंगापूर आणि श्रीलंकेसाठी कांदा रवाना झालाय. त्याच वेळी पोंगलसाठी दक्षिणेत, तर मकरसंक्रांतीसाठी उत्तर प्रदेशात नाशिकहून कांद्याला मागणी वाढली आहे. 

पोंगलसाठी दक्षिणेत अन् मकरसंक्रांतीसाठी उत्तर प्रदेशात मागणी 
अरब राष्ट्रांमधील आयातदारांनी पाकिस्तानच्या जोडीला चीनचा कांदा मागविला असून, सद्यःस्थितीत तेथील आयातदारांच्या गुदामात पाकिस्तानसोबत चीनचा कांदा आहे. हा कांदा विकण्यासाठी आणखी दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे भारतीय निर्यातदारांकडे अरब राष्ट्रांमधील आयातदारांकडून ३० टक्क्यांपर्यंत मागणी आहे. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये कांदा निर्यातबंदी केल्यावर केंद्र सरकारच्या तत्कालीन मंत्र्यांनी यंदाच्या फेब्रुवारीमध्ये ट्विटद्वारे कांदा निर्यातबंदी उठविण्याचे जाहीर केले होते.

नाशिकच्या कांद्याला अरब राष्ट्रांतील आयातदारांकडून मागणी वाढेल

प्रत्यक्षात १ मार्चला अधिसूचना निघाली आणि प्रत्यक्षात निर्यातीला १५ दिवसांनी सुरवात झाली होती. त्यामुळे निर्यातदार आणि आयातदारांना १५ दिवसांचा कालावधी मिळाला होता. आता मात्र साडेतीन महिन्यांनंतर निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असला, तरीही प्रत्यक्ष निर्यातीला तीन दिवसांनी सुरवात होणार असल्याने आता अरब राष्ट्रांतील मागणीसाठी दहा दिवसांची प्रतीक्षा करण्याची वेळ निर्यातदारांवर आली आहे. या साऱ्या परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वसाधारणपणे मकरसंक्रांतीपासून नाशिकच्या कांद्याला अरब राष्ट्रांतील आयातदारांकडून मागणी वाढेल, असा अंदाज कांद्याचे निर्यातदार विकास सिंह यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला. 

हेही वाचा - सरपंचपद भोगल्यानंतर भयाण वास्तवाचा सामना! माजी सरपंचांवर आज मजुरीची वेळ 
कर्नाटकची नाशिक आणि मध्य प्रदेशला पसंती 
दक्षिणेतील कांद्याचे अवकाळी पावसाने नुकसान झाले. त्यानंतर कर्नाटकमधील शेतकऱ्यांनी दुसऱ्यांदा कांद्याची लागवड केली. त्यामुळे कर्नाटकमधून नवीन कांदा येण्यास फेब्रुवारी उजाडणार आहे. परिणामी, कर्नाटकमधील व्यापाऱ्यांनी नाशिक आणि मध्य प्रदेशातून कांदा खरेदीला सुरवात केली आहे. पोंगलसाठी तमिळनाडूला कांदा रवाना होत आहे. दरम्यान, बंदरांमध्ये शुक्रवार (ता. १)पासून कांदा स्वीकारण्यास सुरवात होणार असली, तरीही प्रत्यक्षात कांद्याचे कंटेनर भरलेले जहाज रविवार (ता. ३)पासून रवाना होण्यास सुरवात होईल. शिवाय नाशिकच्या निर्यातदारांनी कंटेनरच्या वाढलेल्या भाड्याच्या अनुषंगाने मुंबईऐवजी तुतिकोरीनच्या बंदरातून श्रीलंकेसाठी कांदा पाठविण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी पाठविलेले ट्रक तुतिकोरीनमध्ये पोचले आहेत. या ट्रकमधील कांदा कंटेनरमध्ये भरून कंटेनर जहाजामध्ये ठेवले जातील. हा कांदा ५ जानेवारीला श्रीलंकेत पोचेल. 


४०० ते एक हजार रुपयांची वृद्धी 
निर्यात खुली करण्याच्या केंद्राच्या निर्णयाचे पडसाद मंगळवार (ता. २९)पासून स्थानिक बाजारपेठेत उमटले. कांद्याचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यात निर्यातबंदी खुली करण्याच्या झालेल्या निर्णयाच्या दुसऱ्या दिवसापासून भावात सुधारणा होण्यास सुरवात झाली. निर्यात खुली झाल्याच्या सोमवार (ता. २८)च्या तुलनेत आजपर्यंत क्विंटलभर कांद्याच्या भावात ४०० ते एक हजार रुपयांची वृद्धी झाली आहे. येवल्यात ६५०, लासलगावमध्ये ६२४, मुंगसेमध्ये ८५०, कळवण आणि उमराणेमध्ये प्रत्येकी एक हजार, सटाण्यात ४००, देवळ्यात ६७५ रुपयांनी भाव वाढले आहेत. मुंबईत २८ डिसेंबरला दोन हजार १०० रुपये क्विंटल या भावाने कांदा विकला गेला होता. आज मुंबईत दोन हजार ८५० रुपये असा भाव मिळाला. पुण्यात स्थानिक कांद्याच्या भावात ६०० रुपयांची वृद्धी होऊन गुरुवारी शेतकऱ्यांना क्विंटलला सरासरी दोन हजार ४०० रुपये असा भाव मिळाला. फेब्रुवारीत गुजरात, पश्‍चिम बंगालसह दक्षिणेतील नवीन कांदा बाजारात येण्यास सुरवात होईल. तोपर्यंत नाशिकच्या कांद्याला चांगल्या भावाची अपेक्षा आहे. सद्यःस्थितीत शेतकऱ्यांनी कांद्याची आवक ५० टक्क्यांवर आणली आहे. निर्यातीला सुरवात झाल्यावर कांदा विक्रीसाठी आणण्याच्या मनःस्थितीत शेतकरी आहेत. त्यामुळे भावात वृद्धी झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. 


लासलगावमधील वर्षाखेरीचे भाव 
(सात वर्षांतील लाल कांद्याची स्थिती) 
तारीख आवक सरासरी भाव 
(क्विंटलमध्ये) (क्विंटलला रुपयांमध्ये) 
३० डिसेंबर २०१४ १५ हजार १ हजार ३७५ 
३१ डिसेंबर २०१५ २२ हजार ६२५ १ हजार ३५० 
३० डिसेंबर २०१६ ३१ हजार ९८८ ६५० 
२९ डिसेंबर २०१७ २६ हजार ८७० २ हजार ८७५ 
३१ डिसेंबर २०१८ १८ हजार १२८ ९३५ 
३१ डिसेंबर २०१९ १७ हजार ४०५ ४ हजार २०१ 
३१ डिसेंबर २०२० १४ हजार २२८ २ हजार ५७५ 
(३१ डिसेंबर २०१८ ला एक हजार ७६९ क्विंटल उन्हाळ कांद्याला सरासरी क्विंटलला २४० रुपये असा भाव मिळाला.) 
(३१ डिसेंबर २०२० ला ३०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक होऊन त्यास क्विंटलला दीड हजार रुपये असा सरासरी भाव मिळाला.) 


नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या भावाची स्थिती 
(आकडे क्विंटलला सरासरी रुपयांमध्ये दर्शवितात) 
बाजारपेठ गुरुवार (ता. ३१) मंगळवार (ता. २९) सोमवार (ता. २८) 
लासलगाव २ हजार ५७५ २ हजार ४०० १ हजार ९५१ 
मुंगसे २ हजार ५७५ २ हजार २५० १ हजार ७२५ 
कळवण २ हजार ७०० २ हजार २५० १ हजार ७०० 
सटाणा २ हजार २७५ १ हजार ८७५ १ हजार ५५० 
देवळा २ हजार ६०० २ हजार ४०० १ हजार ९२५ 
उमराणे २ हजार ५५० २ हजार २०० १ हजार ५५०  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com