शिवरायांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून धुळ्यात वाद; शिवप्रेमी आक्रमक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule

शिवरायांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून धुळ्यात वाद; शिवप्रेमी आक्रमक

सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्‍लोषात साजरी होत असताना धनूर (ता. धुळे) येथे मात्र महसूल व पोलिस प्रशासनाला अभुतपूर्व पेच प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. धनूर येथे शुक्रवारी मध्‍यरात्रीनंतर ग्रामपंचायतीलगत अश्‍वारूढ छत्रपती शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा अज्ञातांनी उभारला. तो विनापरवानगी असल्‍यामुळे महसूल, पोलिस प्रशासन व ग्रामस्‍थांमध्‍ये पुतळा हटविण्यासंदर्भात शाब्‍दीक ओढाताण सुरू आहे. धनूरमधील महिलांनी पुतळा हटवू नये यासाठी पुतळ्याभोवती वेढा घालत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

हेही वाचा: नाशिक महानगरपालिका निवडणूक | भाजप शहरात लढणार स्वबळावर

तीन हजार लोकसंख्‍येचे धनूर गाव आहे. शेतीवर अर्थकारण असलेल्‍या या गावात शुक्रवारी (18 फेब्रुवारी) मध्‍यरात्रीनंतर काही अज्ञात व्‍यक्‍तींनी अश्‍वारूढ शिवरायांचा पुर्णाकती पुतळा ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी उभारला. हा प्रकार शनिवारी सकाळी महसूल व पोलिस प्रशासनाच्‍या निदर्शनास आला. सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशानुसार पुतळा समितीची स्‍थापना व विविध शासकीय परवानगी घेतल्‍यानंतर पुतळा उभारणीला मंजूर दिली जात असते. परंतु, धनूर येथे विनापरवानगी छत्रपती शिवारायांचा पुतळा उभारण्यात आला. यामुळे सहाय्यक जिल्‍हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्‍ती धोडमिसे, प्रभारी पोलिस अधिक्षक प्रशांत बच्‍छाव यांच्‍यासह महसूल व पोलिस प्रशासनाचा फौजफाटा शनिवारी सकाळी धनूर येथे दाखल झाला.

हेही वाचा: Video: नितेश राणे क्रिकेटच्या मैदानात; केली तुफान फटकेबाजी

सरपंच सत्‍यभामाबाई शिंदे यांच्‍याशी चर्चा करत त्यांना विनापरवानगी असलेला शिवरायांचा पुतळा सन्‍मानाने हटवावा, अशी सूचना उपस्थित वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी दिली. तसेच सरपंचांना त्‍याबाबत नोटीसही बजावली. चर्चेची फेरी सुरू असताना काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील व राष्ट्रवादीचे जिल्‍हा परिषद सदस्‍य किरण पाटील गावात दाखल झाले. पुतळा हटविण्यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरून हालचाली सुरू असल्‍याचे समजताच; ग्रामस्‍थ पुतळ्याभोवती जमा झाले. प्रामुख्‍याने महिला वर्ग पुतळ्याच्‍या संरक्षणासाठी पुतळ्याभोवती वेढा टाकत ठिय्या मांडून बसला. त्यामुळे अधिकाऱ्यांची गोची झाली. शनिवारी (१९ फेब्रुवारी) रात्री दहापर्यंत सलग ठिय्या आंदोलन सुरू असताना सरपंच सत्‍यभामाबाई शिंदे यांनी सोमवारी ग्रामसभा बोलावून पुतळ्याबाबत होणारा निर्णय महसूल व पोलिस प्रशासनाला कळविला जाईल; अशी भूमिका जाहीर केली.

हेही वाचा: 'अरुणाचल हमारा', PM मोदींनी सादर केलं भारतरत्न भूपेन हजारिकांचे गीत

असे असताना दोनशेवर पोलिस व एसआरपीचा ताफा आज (२० फेब्रुवारी) रविवारी सकाळी धनूर येथे दाखल झाला. ही वार्ता गावात पसरताच महिला वर्ग व ग्रामस्‍थ पुन्‍हा संघटित झाले. त्‍यांनी पुतळ्याला वेढा घालत ठिय्या मांडला. या पाठोपाठ आमदार कुणाल पाटील, जिल्हा परिषद सदस्‍य किरण पाटील व समर्थकांनी या ठिय्या आंदोलनात उडी घेतली. त्‍यांनीही पुतळ्याभोवती आंदोलनातून वेढा घातला. या स्थितीमुळे पोलिसांना पुतळ्यापर्यंत पोहचणे अडचणीचे ठरले. हा वाद सुटणार नसल्‍याचे चिन्‍ह दिसू लागल्‍यानंतर पोलिसांनी आमदार कुणाल पाटील यांच्‍याशी संवाद सुरू केला. यानंतर आमदार कुणाल पाटील यांनी हस्‍तक्षेप करत छत्रपती शिवरायांचा पुतळा हटवू नये यासाठी जिल्‍हाधिकारी यांच्‍याशी सोमवारी चर्चा केली जाईल; तोपर्यंत पुतळा हटवू दिला जाणार नाही, अशा भूमिकेतून धनूरच्‍या ग्रामस्‍थांना अश्वस्त केले.

हेही वाचा: केंद्राच्या आदेशावरून नारायण राणेंच्या बंगल्यावर होणार कारवाई

त्‍यानंतर आज रविवारी दुपारी पावणेदोनला जमावाला पांगविण्याची प्रक्रीया सुरू झाली. तोपर्यंत भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे गावात दाखल झाले. त्यांनी पुतळ्यासाठी खासदार निधीतून दहा लाखांचा निधी देण्याचे घोषित केले. त्‍याआधी जिल्‍हा मराठा क्रांती मोर्चाचे मनोज मोरे, मराठा संघटनांचे प्रतिनिधी व शिवप्रेमी संघटनांचे पदाधिकारी घटनास्‍थळी दाखल झाले होते. ग्रामस्‍थांनी नियमांचे पालन करत सहकार्य करावे, असे आवाहन महसूल व पोलिस प्रशासनाने केले.

Web Title: Dhule Disputes Over Chhatrapti Shivaji Maharaj Statue Police Action Dhanur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Dhule
go to top