नाशिक-सुरत अंतर आता अवघ्या दोन तासांत; वेळेची होणार बचत

nashik -surat.jpg
nashik -surat.jpg

नाशिक : केंद्राच्या ग्रीनफिल्ड महामार्ग संकल्पनेनुसार चेन्नई-सुरत ग्रीनफिल्ड सहापदरीकरण महामार्गाच्या सादरीकरणाला मंजुरी मिळाली आहे. सादरीकरणानुसार सुरत ते चेन्नई हे एक हजार ६०० किलोमीटरचे अंतर आता एक हजार २५० किलोमीटर इतके कमी होणार आहे. तसेच हा मार्ग जिल्ह्यातून जाणार असल्याने नाशिक-सुरतदरम्यानचे अंतर अवघे १७६ किलोमीटरवर येणार आहे. त्यामुळे नाशिककरांना अवघ्या दोन तासांत सुरतला जाता येणार आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. 

नाशिक-सुरत अंतर अवघे १७६ किलोमीटर 
सध्या सुरत-मुंबई-पुणे-सातारा-कोल्हापूर-बेळगाव-चित्रदुर्ग-तुरकर्म-बेंगळूरू-चेन्नई हा मार्ग ग्रीनफिल्ड अंतर्गत सुरत-नाशिक-नगर-कर्माळा-सोलापूर-कर्नल-कडप्पा-चेन्नई असा तयार करण्याचे नियोजन आहे. त्याअंतर्गत दोन मुख्य शहरांना जोडणाऱ्या या मार्गातील अंतर ३५० किलोमीटरने कमी होणार होऊन सहापदरीकरणामुळे वेळेची बचत होणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या सादरीकरणदरम्यान ही माहिती देण्यात आली. खासदार गोडसे, राष्ट्रीय महामार्गाचे बी. एस. साळुंखे, डी. आर. पाटील, श्रीनिवास राव आदी उपस्थित होते. 

सहा तालुक्यांतून जाणार 
देशातील गुजरात-महाराष्ट्र-कर्नाटक-तमिळनाडू-आंध्र प्रदेश-तेलंगणा या सहा राज्यांतून जाणारा ग्रीनफिल्ड सहापदरी महामार्ग जिल्ह्यातील सुरगाणा-पेठ-दिंडोरी-नाशिक-निफाड-सिन्नर या सहा तालुक्यातील ६९ गावांतील १२२ किलोमीटर अंतर कापणार आहे. त्यासाठीची सुरगाणा, पेठ, दिंडोरी तालुक्यांतील वन विभागाच्या जमिनी हस्तांतरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मार्च २०२१ नंतर या महामार्गाच्या निविदा निघून त्यानंतर अवघ्या सात ते आठ महिन्यांनंतर प्रत्यक्ष कामकाजाला सुरवात होईल. 

उत्तर महाराष्ट्रावर १५ हजार कोटींवर 
सुरत ते नगरदरम्यानच्या रस्ता कामासाठी १५ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, महामार्गावर प्रत्येकी २० किलोमीटरवर खाली उतरण्यासाठी रस्ता असेल. त्याशिवाय कुठेही हा इतर महामार्गाला जोडले जाणार नसल्याने महामार्गावर वाहने प्रतितास १२० किलोमीटर अंतराने धावू शकणार आहेत. नाशिक जिल्ह्यात हा सहापदरी मार्ग समृद्धी महामार्गाला ओलांडून जाणार आहे. 


नाशिकहून अंतर 
प्रवास अंतर (कि.मी) वेळ 
- सुरत ते चेन्नई १२५० १० तास 
- नाशिक-सुरत १७६ २ तास 


नाशिकच्या या गावातून जाणार मार्ग 
सुरगाणा : राक्षसभवन-भावडा-भेडवळ-दुधवड-गहाळे-पिंपळचौद-कोटंबा-मेरदंड-सांबरकाळ-हस्ते-जाहुले. 
पेठ : पाऊचीबारी-कळमदरी-वाडाबरी-हारुणागाव-तेटमळा. 
दिंडोरी : गोंडोळे-राटोडी-ननाशी-चेलपाडा-कावडसेव-म्हाळजे-वाळोसी-जाण्यालीपाडा-अंबेगाव-चाचडगाव-धाऊर- उमराळे बुद्रुक. 
नाशिक : आडगाव-विंचूरगवळी-ओढा-लाखलगाव. 
निफाड : चेहेडी खुर्द-वऱ्हेदारणा-लालपाडी-दारणासांगवी-चाटोरी-रामनगर-पिंपळगा-निपाणी. 
सिन्नर : देशवंडी-पाटपिंप्री-बारगावपिंप्री-देवपूर-कोपडी बुद्रुक-फरतपूर-धरणगाव-भोकणी-पांगरी-पुणेनगर-वावी- कांडळवाडी. 

महामार्गातील बोगद्यांची लांबी, रुंदी सात मीटरवरून नऊ मीटर व नऊ मीटरवरून १२ मीटर करण्याचे सुचविले आहे. सहापदरी महामार्गामुळे दोन तासांत सुरतला जाता येणार आहे. त्यामुळे शहराच्या विकासासह व्यापार विकासाला चालना मिळणार आहे. - हेमंत गोडसे, खासदार, नाशिक  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com