esakal | काळरात्र टळली, वाचले प्राण! वेळेत ऑक्सिजन मिळाल्याने सुटकेचा नि:श्‍वास

बोलून बातमी शोधा

Oxygen
काळरात्र टळली, वाचले प्राण! वेळेत ऑक्सिजन मिळाल्याने सुटकेचा नि:श्‍वास
sakal_logo
By
दीपक अहिरे

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : केवळ तीन-चार तास पुरेल एवढाच ऑक्सिजन साठा असल्याचे पिंपळगावच्या कोविड सेंटरमधून कळविण्यात आले. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले. आमदार दिलीप बनकर यांनीही सजगता दाखविली. रात्री ऑक्सिजन मिळाला नाही, तर रुग्णांचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. रुग्ण व नातेवाइकांच्या काळजाचा ठोका चुकला. सूत्रे हलली आणि अखेर ऑक्सिजनची दोन ड्युरा सिलिंडर उपलब्ध झाली. त्यामुळे पन्नासहून अधिक रुग्णांचे प्राण वाचले.

पिंपळगाव शहरातील जोपूळ रोडवरील कोविड सेंटरमध्ये शंभरहून अधिक रुग्ण कोरोनाशी लढा देत आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन मोरे जीवाची बाजी लावून रुग्णांना मृत्यू्च्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी येथे सिन्नरमधून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा विस्कळित झाला. त्यामुळे रुग्णांचा प्राण कंठाशी आला होता. ही बाब आमदार दिलीप बनकर यांनी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर यंत्रणा हलली. त्यातून २३० क्यूबिक क्षमतेचे दोन ड्युरा सिलिंडर उपलब्ध झाले. ऑक्सिजनची आणीबाणी टळली अन्‌ सर्वांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला. रुग्णांच्याही जीवात जीव आला.

हेही वाचा: कोविड सेंटरच्या पायरीवर सोडला रुग्णाने प्राण! चांदवडच्या व्हायरल VIDEO मागचं सत्य..


रोज एक हजार क्यूबिक ऑक्सिजनची गरज
पिंपळगाव शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात तब्बल पाचशेहून अधिक रुग्ण कोरोनाशी झुंज देत आहेत. यातील बहुतांश रुग्णांचे श्‍वास कृत्रिम ऑक्सिजन देऊन सुरू आहेत. पिंपळगाव शहराला रोज एक हजार क्यूबिक ऑक्सिजनची आवश्‍यकता आहे. तो पुरवठा पुरेशा प्रमाणात अद्याप होत नाही.

हेही वाचा: नाशिकमध्ये रेमडेसिव्‍हिरचा पुन्हा काळाबाजार; पाच इंजेक्शनसह वॉर्डबॉय गजाआड


माजी आमदार कदम यांची भेट

ऑक्सिजनच्या तुटवड्याची माहिती मिळताच माजी आमदार अनिल कदम यांनी पिंपळगाव कोविड सेंटरला भेट दिली. प्रशासकीय अधिकाऱ्यांना ऑक्सिजनच्या पुरेशा पुरवठ्याबाबत सूचना केल्या. रुग्णांची आस्थेवाईक चौकशी करून धीर दिला. शिवाय काही रुग्णांची ऑक्सिजन पातळी कदम यांनी स्वत: तपासली.