esakal | कोरोनामध्ये मारलं अन्‌ तारलंही! ब्रॉयलर कोंबडीला गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवात चांगला भाव
sakal

बोलून बातमी शोधा

paultry hen.jpg

चिकनमधून कोरोना होतो असा बनावट व्हिडिओ प्रसारित झाला अन्‌ ब्रॉयलर कोंबड्या उत्पादन उद्योग रसातळाला गेला. मार्च-एप्रिलमध्ये पाच ते दहा रुपये किलो भावाने कोंबड्या विकाव्या लागल्या. जागतिक आरोग्य संघटना, भारतीय वैद्यक संशोधन परिषद आणि राज्य सरकारने चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही, तर कोरोना टाळण्यासाठी चिकन-अंडी खा, अशी शिफारस केली.

कोरोनामध्ये मारलं अन्‌ तारलंही! ब्रॉयलर कोंबडीला गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवात चांगला भाव

sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : चिकनमधून कोरोना होतो असा बनावट व्हिडिओ प्रसारित झाला अन्‌ ब्रॉयलर कोंबड्या उत्पादन उद्योग रसातळाला गेला. मार्च-एप्रिलमध्ये पाच ते दहा रुपये किलो भावाने कोंबड्या विकाव्या लागल्या. जागतिक आरोग्य संघटना, भारतीय वैद्यक संशोधन परिषद आणि राज्य सरकारने चिकन खाल्ल्याने कोरोना होत नाही, तर कोरोना टाळण्यासाठी चिकन-अंडी खा, अशी शिफारस केली. त्यामुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात किलोचा भाव सव्वाशे रुपये झाला. गेल्या नऊ वर्षांनंतर पहिल्यांदा गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवात चिकनला चांगला भाव मिळतो आहे. 

ब्रॉयलर कोंबडीला गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवात चांगला भाव 
सणासुदीच्या काळात उत्सवी ‘मूड’प्रमाणेच उपवासांमुळे चिकनकडे ग्राहकांचा कल कमी होतो आणि चिकनचा भाव कोसळतो. पण, गेल्या महिन्यात सरासरी ९५ रुपये किलो आणि या महिन्यात आतापर्यंत शंभर रुपये किलो या सरासरी भावाने ब्रॉयलर कोंबडी विकली जात आहे. आज किलोचा भाव १०३ रुपये राहिला. ग्राहकांनी पाठ फिरविल्याने ब्रॉयलर कोंबड्यांचे उत्पादन एकीकडे ४० टक्क्यांनी कमी करण्यात आलेले असताना दुसरीकडे मागणी वाढल्याने चांगला भाव मिळतो आहे. त्यातून कोरोनाच्या अफवेत ७० ते ८० टक्के खेळते भांडवल संपलेल्या शेतकऱ्यांचे आता कुठेतरी नुकसान भरून निघू लागले आहे. डिसेंबरपासून ग्राहकांच्या आवाक्यात भाव येतील, असे आनंद ॲग्रो समूहाचे अध्यक्ष उद्धव आहेर यांनी ‘सकाळ’ला सांगितले. ते म्हणाले, की कोरोनावरील उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रांमधून रुग्णांना रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अंडी-चिकनचा वापर सुरू केल्याने सामान्यांच्या जिभेवर चिकनची चव रुळू लागली. ग्राहकांच्या आवाक्यात चिकनचे भाव येत असताना ब्रॉयलर कोंबडी उद्योग नफ्यात येण्यास सुरवात होईल. 

उत्तर भारतीयांची मदत 
राज्यात महिन्याला पावणेतीन कोटी ब्रॉयलर कोंबड्यांचे उत्पादन होते. कोरोना विषाणू संसर्गामध्ये घरी गेलेले उत्तर भारतीय मुंबईत येऊ लागले आहेत. त्यांनी चिकनला पसंती दिल्याने मुंबईतील खप वाढण्यास मदत झाली आहे, असे सांगून श्री. आहेर म्हणाले, की मुंबईत शनिवार आणि रविवारी सात ते आठ लाख कोंबड्या खपतात. एरवी चार ते पाच लाख कोंबड्या मुंबईत विकल्या जात आहेत. नवरात्रोत्सवातील उपवासामुळे कोंबड्यांचे उत्पादन निम्म्यावर आणण्यात आले आहे. तेवढेच ग्राहक असल्याने भावाचे गणित जुळण्यास मदत झाली. 

हेही वाचा > मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

इतिहासातील सर्वांत मोठी मंदी 
बर्ड फ्लूने ब्रॉयलर कोंबड्या उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळविले होते. त्यानंतर आता कोरोनाची अफवा पसरविण्यात आल्याने कुक्कुटपालन उद्योगाच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या मंदीला उत्पादक शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. मात्र ग्राहकांनी चिकन खाण्यास सुरवात केल्याने या उद्योगाची चाके रुळावर येण्यास मदत झाली आहे. गावगाड्यात कोंबड्यांची दुकाने बंद पाडण्यात आली असताना शहरातील दुकाने ग्राहकांविना बंद पडली होती. 

हेही वाचा > क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

संपादन - ज्योती देवरे

loading image