esakal | नाशिक जिल्‍हा हादरला; कोरोनामुळे मृतांच्‍या संख्येने यापूर्वीचे सर्व उच्चांक मंगळवारी मोडून काढले

बोलून बातमी शोधा

Corona

गेल्‍या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्‍या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.२०) मृतांच्‍या संख्येने यापूर्वीचे सर्व उच्चांक मोडून काढले.

नाशिक जिल्‍हा हादरला; कोरोनामुळे मृतांच्‍या संख्येने यापूर्वीचे सर्व उच्चांक मंगळवारी मोडून काढले
sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

नाशिक : रुग्‍णालयांमध्ये खाटा न मिळणे, ऑक्‍सीजनचा तुटवड्यासह विविध कारणांमुळे अनेक रुग्‍णांना आरोग्‍य सेवा उपलब्‍ध होत नसल्‍याची स्‍थिती आहे. यातून कोरोनामुळे मृत्‍यूचे थैमान सध्या सुरू असून, मृतांचा आकडा आटोक्‍याबाहेर चालला आहे. मंगळवारी (ता.२०) जिल्ह्यात तब्‍बल ५७ रुग्‍णांचा कोरोनाने बळी घेतला. यापैकी चांदवड तालुक्‍यातील दहा मृतांसह नाशिक ग्रामीणमधील एकूण ४३ बाधितांचा मृत्‍यू झाला आहे.

हेही वाचा: आजचा श्रीराम जन्मोत्सव बंद दाराआडच

गेल्‍या काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृतांच्‍या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी (ता.२०) मृतांच्‍या संख्येने यापूर्वीचे सर्व उच्चांक मोडून काढले. अक्षरशः कोरोनामुळे होणाऱ्या मृत्‍यूंमध्ये जिल्‍हावासीय हादरले असून जिल्‍ह्‍यात प्रथमच एका दिवसात पन्नासहून अधिक बाधितांचा मृत्‍यू झाला आहे. आरोग्‍यसेवांच्या उपलब्‍धतेअभावी तर मृतांची संख्या वाढत नाही ना, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. दिवसभरातील मृतांमध्ये सर्वाधिक ४३ मृत नाशिक ग्रामीण भागातील आहेत. चांदवड तालुक्‍यातील सर्वाधिक दहा, येवला आणि नांदगाव तालुक्‍यातील प्रत्‍येकी सात, निफाड तालुक्‍यातील सहा, नाशिक महापालिका क्षेत्रालगत असलेला नाशिक तालुक्‍यातील पाच, त्र्यंबकेश्‍वर व पेठ तालुक्‍यातील प्रत्‍येकी दोन, आणि मालेगाव ग्रामीण आणि सिन्नर तालुक्‍यातील एका मृताचा समावेश आहे. नाशिक शहरातील नऊ, मालेगाव महापालिका क्षेत्रातील तीन, तर जिल्‍हाबाहेरील ठाणे आणि औरंगाबाद येथील व सध्या नाशिकला उपचार घेत असलेल्‍या बाधितांचा असे जिल्‍हाबाहेरील दोघा बाधितांनी जीव गमावला आहे.

हेही वाचा: पंचवटी पोलिसांकडून दोन दिवसांत २२९ जणांवर कारवाई

बळींमध्ये २८ ज्‍येष्ठ नागरीक

जिल्ह्यातील एकूण बळींमध्ये तब्‍बल सहा मृत हे चाळीशीच्‍या आतील आहेत. विजापूर (जि. औरंगाबाद) येथील २३ वर्षीय युवकासह आशेवाडी (ता.दिंडोरी) येथील ३२ वर्षीय युवक, चांदवड तालुक्‍यातील ३५ वर्षीय दोन महिला, मालेगाव कॅम्‍पमधील ३६ वर्षीय, नाशिक शहरातील त्रिमुर्ती चौकातील ३८ वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृतांमध्ये सर्वाधिक २८ मृत हे वयाची साठी ओलांडलेले अर्थात ज्‍येष्ठ नागरीक आहेत.

हेही वाचा: दहा दिवसांसाठी बांधकामे बंद; बिल्डर्स असोसिएशनचा निर्णय

ॲक्‍टीव्‍ह रुग्‍ण संख्या ४२ हजारांवर

मंगळवारी आढळलेल्‍या नवीन कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात दोन हजार ७७७, नाशिक ग्रामीणमध्ये दोन हजार १६७, मालेगावला २१ तर जिल्‍हा बाहेरील चाळीस रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. तुलनेत तीन हजार ८६१ रुग्‍णांनी कोरोनावर यशस्‍वीरीत्‍या मात केली. यातून ॲक्‍टिव्‍ह रुग्‍ण संख्येत वाढ झाल्‍याने हा आकडा ४२ हजारांहून अधिक झाला आहे. सध्या जिल्‍ह्‍यात ४२ हजार २४२ रुग्‍णांवर उपचार सुरू आहेत. हादेखील उच्चांकी आकडा आहे.