Jindal Fire Accident : धुराच्या लोळांनी व्यापला आसमंत! कामगार मंत्र्यांकडून पाहणी अन् परिसरात हायअलर्ट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jindal Fire Accident

Jindal Fire Accident : धुराच्या लोळांनी व्यापला आसमंत! कामगार मंत्र्यांकडून पाहणी अन् परिसरात हायअलर्ट

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावरील मुंढेगाव (ता. इगतपुरी) शिवारातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीत रविवारी (ता. १) लागलेल्या आगीनंतरच्या स्फोटाने रौद्ररुप धारण केल्याच्या दुर्घटनेच्या आज सोमवारी (ता. २) दुसऱ्या दिवशीही आगीसह धुराच्या लोळांनी आसमंत व्यापला होता.

राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी औद्योगिक सुरक्षा, कामगार कल्याण, बाष्पके, अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसह दुर्घटनास्थळाची पाहणी केल्यावर दोषींविरुद्ध कारवाईची ग्वाही दिली. मात्र आग पूर्णतः आटोक्यात आल्याखेरीज त्रूटी लक्षात येणार नाहीत, असे श्री. खाडे यांनी स्पष्ट केले आहे. (Inspection by labor minister and high alert in area Jindal Fire Accident nashik news)

औद्योगिक सुरक्षा, बाष्पके आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कंपनीतील आग आणि धुराचे लोळ पूर्णतः आटोक्यात येण्यासाठी आणखी दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्याची प्रचिती आज सायंकाळनंतर आली. कंपनीत धुमसत असलेली आग आज सकाळी काहीशी नियंत्रणात आल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.

मात्र सायंकाळनंतर पुन्हा महामार्गावरुन आगीचे लोळ पाहावयास मिळालेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगीच्या नियंत्रणासाठी सैन्यदलाची मदत घेण्यात येईल, असे स्पष्ट केले होते.

भारतीय लष्करातर्फे दोन हेलिकॉप्टर आणि जवान दुर्घटनास्थळी रवाना केले होते. मात्र रासायनिक साठ्यामुळे हेलिकॉप्टरद्वारे आग नियंत्रणाचे प्रयत्न करण्यासाठी यंत्रणांतर्फे अनुकुलता दर्शवली नसल्याची माहिती मिळत आहे. आग नियंत्रणासाठी नॅशनल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स आणि स्टेट डिजास्टर रिस्पॉन्स फोर्सची पथके आग विझवण्यासाठी तळ ठोकून आहेत.

शिवाय धुराच्या लोळांमुळे रासायनिक उग्र दुर्गंधी पसल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनातर्फे १० ते १५ किलोमीटर परिसरातील गावांमध्ये कामाशिवाय घराबाहेर पडू नये व मास्क वापरावा असे आदेश देण्यात आले आहेत.

कंपनीपासून दूरवर असलेल्या कळसूबाई शिखरावरील पर्यटकांना धुराचे लोळ पोचल्याची जाणीव प्रकर्षाने झाली. कंपनीशेजारील सरकारी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना शेनवड खुर्दच्या आश्रमशाळेत नेण्यात आले आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

हेही वाचा: Jindal Fire Accident : जिंदालची आग विझवण्यासाठी NMCची 12 अग्निशमन वाहने आली कामी!

जखमी कामगारांचे जाबजबाव

जिंदालमधील आगीत जखमी झालेल्या कामगारांचे जाबजबाब नोंदवण्याची पोलिसांची प्रक्रिया दुसऱ्या दिवशी सुरु होती. दुर्घटनेत दोन महिला कामगारांचा मृत्यू झाला असून रविवारी (ता. १) त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. दोन रुग्णांवर प्लॅस्टिक सर्जरी करण्यात आली आहे. याप्रकरणी सोमवारी (ता. २) रात्री उशिरापर्यंत घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

मृत महिला बिहारमधील

जिंदालमधील स्फोटामुळे लागलेल्या आगीत गंभीररित्या भाजलेल्या दोन महिला कामगारांचा उपचारादरम्यान, मृत्यू झाला. महिमाकुमारी प्रल्हादसिंग (२०, रा. नवादा, बिहार. सध्या रा. गर्ल्स होस्टेल, जिंदाल कंपनी), अंजली रामकुबेर यादव (२९ रा. आनंद भवन, गोंदे) अशी मृत्यू झालेल्या महिला कामगारांची नावे आहेत.

घोटी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयत तरुणींच्या नातेवाइकांना पोलिसांनी माहिती दिली असून, सोमवारी सायंकाळपर्यंत ते नाशिकमध्ये पोचले नव्हते. दोघींचे मृतदेह शवागृहात ठेवण्यात आले आहेत. नाशिकमधील सुयश रुग्णालयामध्ये जखमी कामगारांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

इथे १७ कामगार दाखल आहेत, तर एका कामगारांवर नाशिक आयसीयू ॲण्ड ट्रॉमा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ६ रुग्ण हे अतिदक्षता विभागात दाखल आहेत. ११ कामगारांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा: Dhule News : 5 महिन्यांपासून पगार नाही; धुळे Civilच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन

टॅग्स :NashikFire Accident