जमीन विक्रीचा मुळशी पॅटर्न नको! जॉइंट फार्मिंगने बहरली शेती

जमीन विक्रीचा मुळशी पॅटर्न नको! जॉइंट फार्मिंगची किमया; बोरी-बाभळीच्या ओसाड जागेवर बहरली शेती
joint farming
joint farmingesakal

पिंपळगाव बसवंत (जि. नाशिक) : सर्वांच्या हिताचा सहमतीने एखादा निर्णय घेतला व त्याला मूर्त स्वरूप दिले, तर किती लाभदायक ठरतो, याचा प्रत्यय पिंपळगाव जॉइंट फार्मिंग सोसायटीच्या जमीन क्षेत्रातकडे नजर टाकल्यानंतर येतो. जोपूळ रस्त्यावर सलग ५० वर्षे माळरान अर्थात पिंपळगावच्या शेतकऱ्यांचे सामूहिक कुरणात बोरी-बांभळीचे अ‌न् गवताने भरलेले आठ एकर ओसाड क्षेत्र होते. जमीन विक्री करून मुळशी पॅटर्नचा कित्ता गिरविण्याऐवजी संस्थेतील भागाच्या प्रमाणात वाटप करून घेण्याचा एकमुखी निर्णय झाला. त्याचा परिणाम पडीक जमिनीवर आता टोमॅटो, सोयाबीन, मका अशी पिके बहरली आहेत. जमिनीचा पोत बघता भविष्यात याच मातीतून चवीला अवीट गोडी असलेली द्राक्षे निर्यात होतील, यात शंका नाही.

जमीन विक्रीचा मुळशी पॅटर्न नको!

(कै.) दगूनाना मोरे, खंडूभाऊ विधाते यांच्या संघर्षानंतर पिंपळगावच्या शेतकऱ्यांची हक्काची आठशे एकर जमीन जोपूळ रस्त्यावर मिळाली. ही मालकी टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी १९६१ मध्ये जॉइंट फार्मिंग सोसायटीची स्थापना केली. पिंपळगाव शहरात निर्यातक्षम द्राक्षशेती, व्यापार वाढीस लागला अन्‌ जमिनीचे मूल्य वधारले. २०१० मध्ये पिंपळगाव बाजार समितीला शंभर एकर जागा विक्रीचा निर्णय शासनाच्या परवानगीने झाला. गावाच्या संस्थेचा विस्तार होईल व उर्वरित ७०० एकर जमिनीचे मूल्य वाढेल, असा दुहेरी हेतू त्यामागे होता, पण यानंतर उर्वरित क्षेत्र विक्रीसाठी प्रयत्न झाले, पण सभासदांनी त्याला परवानगी नाकारली.

joint farming
शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करायची कशी? बाजार समित्या बंद

चारशे एकर जमिनीवर शेतकरी घेतायत पिके

पिंपळगाव शहराचा झपाट्याने होणारा विकास व विस्तार पाहता आपल्या वारसांना जमीन क्षेत्र असावे, अशी धारणा शेतकरी बाळगून होते. (कै.) राजेंद्र मोरे यांनी यासाठी आवाज उठविला. अशक्य वाटणारा गुंता सभासदांनी सामंजस्याने सोडविला. चार शेअर्सला सव्वा एकर जमीन शेतकऱ्यांच्या हिश्‍शाला आली. ५० ते ८० भागधारकांनी समूह करून चिठ्ठी पद्धतीनुसार क्षेत्राचे वाटप केले. संस्थेने त्यांना शासनाकडून सातबारा उताऱ्यावर नाव देण्यासाठी प्रयत्न केले. असे सुमारे ४०० एकर क्षेत्र १०० ते १३० शेतकऱ्यांच्या नावावर झाले आहे. सातबारा मिळताच शेतकऱ्यांनी येथे शेततळे, विहीर अशी सिंचन व्यवस्था उभी केली. दोन वर्षांपासून टोमॅटो, सोयाबीन, सूर्यफूल अशी पिके शेतकरी घेत आहेत. येथील जमिनीचा मुरमट व काळी असा पोत पाहता भविष्यात रानमळ्यासारखे निर्यातक्षम द्राक्षाचे आगर म्हणून सातशे एकरकडे पाहिले जाऊ शकते.

जमीनवाटपाचा निर्णय ठरला सुज्ञपणाचा

पिंपळगाव शहरातील मातीच्या ठायी द्राक्षांसह निर्यातक्षम फळपिके घेण्याचा गुणधर्म आहे. जमीन विक्री की वाटप करून घ्यायची यावरून संस्थेच्या सभासदांमध्ये मोठा संघर्ष उठाला होता. अखेर विभक्त कुटुंबपद्धती व भावी पिढीचा विचार करून शेअर्सनुसार जमीनवाटपाचा निर्णय झाला. मोठे अडथळे पार करून सातबाऱ्यावर शेतकऱ्यांची नावे लागली आहेत. सध्या येथील जमिनीचा दर किमान ५० लाख रुपये एकर आहे. त्यामुळे जमीनवाटपाचा निर्णय आज सुज्ञपणाचा ठरला आहे.

joint farming
'शेतकरी हजारो तोंडाच्या रावणासोबत लढत आहेत' - थोरात

जॉइंट फार्मिंगची किमया

''जॉइंट फार्मिंगची जमीन शेअर्सनुसार वाटप करण्याचा निर्णय सभासदांनी घेत दूरदुष्टी दाखविली. अवघड व अशक्य वाटणाऱ्या प्रक्रिया विलंबाने का होईना पार पडल्या. अर्ध्याहून अधिक सभासदांच्या नावाने सातबारा उतारे मिळाले आहेत. उर्वरित सुमारे ३२५ एकर जमीनवाटपाची प्रक्रिया शासनाच्या गुंठेवारीच्या खरेदीच्या निर्णयामुळे तूर्त स्थगित आहे. लवकरच उर्वरित सभासदांनाही त्यांचे क्षेत्र मिळेल.'' - सुरेश खोडे, अध्यक्ष, जॉइंट फार्मिंग सोसायटी, पिंपळगाव बसवंत

''१२ शेअर्सनुसार माझ्या हिश्‍याला साडेतीन एकर क्षेत्र आले. त्यात आता सूर्यफुल, सोयाबीन अशी पिके घेतली आहेत. पुढील वर्षी पुरेशा पाण्याची सुविधा होताच द्राक्षबागेची लागवड करणार आहे.'' - दीपक मोरे, शेतकरी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com