
नाशिक रोडला भरवस्तीत बिबट्याचा धुमाकूळ; थरार कॅमेऱ्यात कैद
नाशिक रोड : तब्बल सात तासाच्या परिश्रमानंतर येथील जय भवानी रोड परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभाग कर्मचारी, उपनगर पोलिस व स्थानिक नागरिकांच्या मदतीने यश आले. बिबट्या जेरबंद झाल्याने परिसरातील नागरिक व महिलांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
सोमवारी (ता. ३१) सकाळी सहाच्या सुमारास जय भवानी रोड येथील शिवसेनेचे कार्यकर्ते राजेंद्र गायकवाड यांच्या बंगल्याच्या पाठीमागे असलेल्या उद्यानात बिबट्याने दर्शन दिले. बिबट्याला महिलांनी बघितल्यानंतर नागरिकांना सांगितले. या घटनेनंतर बिबट्या तेथून भर रस्त्याने वावरत होता. यानंतर बिबट्या हा फर्नांडिस वाडी येथे राहणारे सुनील बहेनवाल यांच्या घरात घुसला, बिबट्याला पाहून बहेनवाल कुटुंबाला घाबरले. त्यानंतर बिबट्या हा तेथून पसार झाला. मेहता हायस्कूल परिसरातील बंगल्याच्या आवारातील गाडीखाली हा बिबट्या लपला. वनविभाग कर्मचाऱ्यांना व नागरिकांना बघताच बिबट्या तेथून बाहेर निघाला व एका बंगल्याच्या आवारात चालत गेला. याच दरम्यान बिबट्याने क्षत्रिय नावाच्या एका ज्येष्ट नागरिकावर हल्ला केल्याने ते जखमी झाले. घटनास्थळी उपनगर पोलिस, वनविभागाचे कर्मचाऱ्यांना बिबट्याला पकडण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. परंतु बिबट्या हाती लागत नव्हता.
हेही वाचा: नाशिक : भाजपचे 7 नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर? चर्चांना ऊत
घटनेनंतर नागरिकांची गर्दी झाल्याने पोलिसांना व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गर्दी हटविणे मुश्कील झाले होते. बिबट्या घाबरून एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यात उड्या मारत जात होता. भरवस्तीत बिबट्या घुसल्यामुळे नागरिक, लहान मुले घाबरले होते. या परिसरातील ॲड. सोमनाथ गायकवाड यांच्या बंगल्यातील मारुती सुझुकी गाडीच्या खाली हा बिबट्या लपला. तत्पूर्वी संगीता गायकवाड यांच्यावर बिबट्याने झडप मारण्याचा प्रयत्न केला, परंतु गायकवाड यांनी प्रसंगावधान राखून हल्ल्यातून वाचविण्यात यश मिळविले. दरम्यान, या घटनेनंतर वनविभाग कर्मचारी, उपनगर पोलिस व स्थानिक नागरिकांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. चारही बाजूने जाळ्या टाकून बिबट्याला बेशुद्ध होणारे इंजेक्शन देऊन जेरबंद केले. बिबट्याला जेरबंद करताच बघण्यासाठी प्रचंड गर्दी जमली. वरिष्ठ वनअधिकारी पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक, गणेश झोले, वनअधिकारी विवेक भदाने, अनिल अहिरराव, देशपांडे यांनी परिश्रम घेतले. पोलिस उपायुक्त विजय खरात सहाय्यक आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ, उपनगर ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नीलेश माईनकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा: ''देशी गाळणारेच वाईन विरोधासाठी आघाडीवर'' - छगन भुजबळ
Web Title: Leopards In Residential Areas At Nashik Road
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..