#lockdown : चिमुकल्या सुगरणीची "लॉकडाउन'मध्ये होतेय खमंग चर्चा!

ishwari gangurde 1.png
ishwari gangurde 1.png

नाशिक / गणूर : "लॉकडाउन'ची शिट्टी वाजली अन्‌ 21 दिवसांचे काय, याचे उत्तर शोधताना अनेक पुरुषांनी किचनचा ताबा घेतला. काहींच्या तव्याला चिपकलेल्या चपात्या, करपलेल्या थालीपीठापर्यंत सोशल मीडियात बरंच काही व्हायरल झाले. हा उत्साह जेमतेम दोन दिवस "उकळला', पण परिपूर्णतेबाबत "कच्चा'च शिजले. चांदवडच्या अवघ्या तीनवर्षीय ईश्‍वरीच्या स्वयंपाकाचा खमंग सध्या सोशल मीडियात सर्वत्र दरवळतोय. अनेकांनी तिच्याकडून स्वयंपाकाचे धडे घेण्याची तयारी दर्शवली आहे. 

चांदवडची तीन वर्षांची ईश्‍वरी शिकली 12 रेसिपी 
हॉटेल व्यावसायिक वैभव गांगुर्डे यांची ईश्‍वरी मुलगी. वैभव स्वतः मालक असले, तरी आवड म्हणून घर असो की हॉटेल हमखास किचनमध्ये दिसायचे. खेळण्या-बागडण्याच्या वयात तिने मला पण स्वयंपाक शिकायचा, म्हणून केलेला आग्रह "पुढच्या वेळी' असे आश्‍वासन देऊन त्यांनी दुर्लक्ष केले. एका शब्दात ऐकतील, ती लेकरं कसली. पुन्हा हट्ट सुरू झाल्याने मॅगी बनविण्याचे ठरले. धारदार चाकूने चिरण्याचे अन्‌ गॅसचे काम आई रूपाली यांनी संभाळले अन्‌ मॅगी तयार झाली. 

तिची शिकण्याची धडपड वडिलांना कायम उत्साह देणारी
उत्तम स्वयंपाक कौशल्य म्हणजे पोटाकडून ह्रदयाकडे जाण्याचा सुरेख मार्ग असला, तरी शिक्षण आणि नोकरी संभाळताना प्रत्येकीला तो लीलया पार पाडता येत नाही. यात विविध पदार्थांचे योग्य मिश्रण जमले, की चवीची हमी निश्‍चित समजली जाते, हेच काम ईश्‍वरी इतक्‍या लहान वयात व्यवस्थित पार पाडत असल्याचे बघून गॅससारख्या ज्वालाग्राही वस्तूचा कमीत कमी वापर करण्याच्या रेसिपीज वैभव यांनी ईश्‍वरीला शिकवल्या. ज्यात एक गोष्ट वारंवार सांगावी लागत असली, तरी तिची शिकण्याची धडपड वडिलांना कायम उत्साह देणारी ठरली. यातून मॅगी, ऑम्लेट, व्हेज पिझ्झा, बिस्कीट केक, कोल्ड कॉफी, आइस लेमन टी, ओरिओ मिल्क शेक, साउथ कोरियन स्पेशल डालगोना कॉफी, सिंगापूर स्पेशल मायलो डायनोसोर, मलई ब्रेड रोल, चिज गार्लिक ब्रेड या ग्रामीण भागात नव्याने ऐकल्या जाणाऱ्या रेसिपी ईश्‍वरीने बनविल्या. 

तीनवर्षीय सुगरणीची सध्या शहरात खमंग चर्चा
प्रथमदर्शनी इतक्‍या लहान वयात हे कसे शक्‍य आहे, असे म्हणून आपल्याला अतिशयोक्ती वाटत असली, तरी याबाबतचे सर्व व्हिडिओ वैभव यांनी यू-ट्यूबला अपलोड करून सोशल मीडियात व्हायरल केल्याने अवघ्या तीनवर्षीय सुगरणीची सध्या शहरात खमंग चर्चा आहे. त्यामुळे "लॉकडाउन'वर "हास्य तडका' देणारे विनोद ऐकून झाले असतील, तर "लॉकडाउन'चा सदुपयोग कसा करायचा, हे ईश्‍वरीने आपल्या कृतीतून अनेकांना दाखवून दिले आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com