
Ramzan Eid : मालेगावी दीड लाख मुस्लीम बांधवांचे सामुहिक नमाजपठण
मालेगाव (जि. नाशिक) : शहरात रमजान ईदनिमित्त (Ramzan eid) येथील पोलिस कवायत-ईदगाह मैदानावर मुख्य सामुहिक नमाज पठण झाले. नमाज पठणात सुमारे दीड लाखाहून अधिक मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी मुख्य नमाज पढविली. पोलिस कवायत मैदानासह १४ ठिकाणी सामुहिक नमाजपठण (namaz) झाले. ३० रोजे संपल्याने व सोमवारी चंद्रदर्शन झाल्याने मंगळवारी (ता.३) रमजान ईद शांततेत व उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोना (Corona) संसर्गामुळे असलेल्या कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षे सामुहिक नमाज पठण होवू शकले नव्हते. त्या पार्श्वभूमीवर ईद-उल-फित्रचे मुख्य नमाजपठणास विक्रमी जनसमुदाय होता. रमजान ईद दोन वर्षाच्या कोरोना संसर्गामुळे झालेल्या खंडानंतर मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली.
शहरातील अन्य ठिकाणी झालेल्या सामुहिक नमाजपठणास जेमतेम उपस्थिती होती. बहुसंख्य मुस्लीम (muslim) बांधवांनी पोलिस कवायत-ईदगाह मैदानावर नमाज पठणास पसंती दिली. शहरासह मैदान परिसरात सीसीटीव्ही व चोख पोलिस बंदोबस्त होता. कॅम्प रस्त्याला येवून मिळणारे जोड रस्ते बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आले होते. चॉंदरात साजरी केल्यानंतर सकाळी अंघोळ, नवे कपडे परिधान करुन साडेसहापासूनच वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात त्याप्रमाणे शहरातील पुर्व भागातील विविध वस्त्यांमधून मुस्लीम बांधवांनी पोलिस कवायत मैदानाचा रस्ता धरला. नमाजपठणानंतर एकमेकांशी गळाभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. राष्ट्रीय एकात्मता समिती, पोलिस व महसूल प्रशासनातर्फे जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील (Sachin Patil), प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, आयुक्त भालचंद्र गोसावी, तहसिलदार चंद्रजीत राजपूत, उपायुक्त गणेश गिरी यांनी आमदार मौलाना मुफ्ती यांना साफा बांधून रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. महापालिका प्रशासनाने उन्हाचा तडाखा लक्षात घेता या वेळी प्रथमच मैदान व परिसरात सुमारे साडेतीनशेहून अधिक पाण्याचे जार जागोजागी ठेवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. त्याबद्दल अनेकांनी समाधान व्यक्त केले.
हेही वाचा: राज्यातील ९४ हजार शिक्षकांच्या वेतनवाढीचा मार्ग सुकर
नमाजपठणानंतर घरोघरी मुस्लीम बांधवांनी शिरखुर्मा खाण्यासाठी एकमेकांना निमंत्रण दिले. दुपारनंतर कडाक्याच्या उन्हामुळे दोन्ही प्रमुख सण असुनही रस्त्यावर शुकशुकाट होता. सायंकाळी शहरातील खाद्यपदार्थांचे दुकाने, स्टॉल, हॉटेल हाऊसफुल होते. उद्या बाशी व तिवासी ईद निमित्त मुस्लीम बांधव शहराजवळील नजीकच्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यास पसंती देतील. उन्हामुळे पर्यटनावरही काहीसा परिणाम अपेक्षित आहे. शहरात सोमवारी रात्री पोलिसांचे सशस्त्र संचलन झाल्यापासूनच सर्वत्र चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता. पोलिसांची वाहने सातत्याने विविध विभागात गस्त घालत होती. येथील यंत्रमाग व्यवसाय जेमतेम असूनही रमजान ईदचा उत्साह मोठा होता. मुख्य नमाजपठणासह सण शांततेत पार पडला.
हेही वाचा: नाशिक : नियमित कर्ज फेडणाऱ्यांना प्रोत्साहन निधी
नेत्यांच्या शुभेच्छा
कृषिमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, महापौर ताहेरा शेख, माजी आमदार रशीद शेख, माजी आमदार आसिफ शेख, कॉंग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP) राजेंद्र भोसले, कॉंग्रेसचे प्रसाद हिरे, एजाज बेग आदींनी शहर व परिसरातील जनतेला अक्षयतृतीया (Akshay Tritiya) व रमजान ईदनिमित्त शुभेच्छा दिल्या.
भारत देश बलशाली व्हावा
मुख्य नमाजपठणानंतर दुवा करताना आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांनी भारत देश बलशाली व्हावा. देशात शांतता, एकात्मता व भाईचारा कायम राहावा असा संदेश दिला. त्याचवेळी राष्ट्रीय एकात्मतेला नख लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अल्लाहने धडा शिकवावा अशी प्रार्थना केली.
Web Title: Malegaon Celebrates Ramadan Eid Namaz Of One And Half Lakh Muslim Brothers Nashik Ramzan News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..