Nashik Crime News: हाणामारीच्या घटनेने सिडको हादरले; तीक्ष्ण हत्यारांचा वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Nashik Crime News: हाणामारीच्या घटनेने सिडको हादरले; तीक्ष्ण हत्यारांचा वापर

सिडको : मोठ्या प्रमाणावर कामगार वर्गाची वसाहत असलेल्या सिडको भागात हाणामाऱ्या, शिवीगाळ, किरकोळ भांडणं यासारखे प्रकार नित्याचेच. पण, शनिवारी (ता. ३१) संपूर्ण शहर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जल्लोषाचे नियोजन करत असताना या भागात घडलेल्या हाणामारीच्या दोन घटनांनी परिसर हादरला.

यामध्ये जुने भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केल्याचा राग मनात धरून एकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना आणि दुसऱ्या घटनेत जुन्या भांडणाची कुरापत काढून युवकाच्या डोक्यात बाटली फोडून व तीक्ष्ण हत्यारासह हल्ला केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे पोलिस प्रशासनाचा गावगुंडांवर वचकच राहिला नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया सिडकोवासीयांमध्ये व्यक्त होत आहेत.

हेही वाचा: Nashik Crime News : अन्नदानाच्या बहाण्याने मंडप डेकोरेटरला गंडविले! भांडी घेऊन संशयित पसार

उत्तमनगरच्या शिवपुरी चौक येथे राहणारा शुभम सुरेश कोळी (वय २२) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्याचा मित्र आकाश आव्हाड याचे संशयित गौरव पेनमहाले, विशाल अहिरे, सुधीर अहिरे (रा. पंडितनगर) यांच्याशी गुरुवारी (ता. २९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास भांडण झाले होते. त्या वेळी शुभम व रोहित झोडगे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविले.

मात्र, याचा राग मनात धरून संशयितांनी पुन्हा वाद घालून शिवीगाळ करत धारदार हत्याराने रोहित झोडगेच्या डोक्यावर, हातावर व पाठीवर वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. फिर्यादी शुभम व त्याचा मित्र साई हगवणे मध्यस्थी करण्यास गेले असता त्यांना, तसेच रोहितच्या आई-वडिलांनाही मारहाण करून संशयितांनी पळ काढला.

हेही वाचा: Nashik Crime News : धोकादायकरीत्या गॅससिलिंडरची हाताळणी करणाऱ्या ‘त्या’ रिक्षाचालकावर गुन्हा दाखल

दुसरी घटना कामटवाडे परिसरात घडली. जुन्या भांडणाची कुरापत काढून घडलेल्या या प्रकारात रोहित सीताराम अंबोरे (वय १९, रा. कामटवाडे) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित घरी येत असताना संशयित विनोद मगर, कुणाल गांगुर्डे, वैभव शिर्के, अजय पगारे यांनी त्याच्यावर हल्ला करत रोहितच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जवळ असलेल्या चॉपरसारख्या हत्याराने वार केले.

यात तो गंभीर जखमी झाला. या वेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रोहितच्या भावालाही मारहाण केल्याचे स्थानिकांनी सांगितले. या दोन्ही प्रकरणांत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

हेही वाचा: Nashik Crime News : शर्ट चोरल्याच्या कारणावरून सेल्समनला बेदम मारहाण! मालकासह बाऊंसरवर गुन्हा दाखल

टॅग्स :NashikCrime News