
नाशिक : सोन्याची बिस्कीटे असल्याचे भासवून लुटमार करणारी टोळी गजाआड
वणी (जि. नाशिक) : सापुतारा ते वणी रोडवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी गुन्हेगार चेकिंग व अवैध धंद्याची माहिती घेण्यासाठी गस्त घालत असतांना सापुतारा ते वणी रोडवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात संशयीत आरोपींना १२ लाख ७९ हजार ८६० रुपये किंमतीचा एैवज जप्त केला आहे.
नाशिक ग्रामिणचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळालेल्या गुप्त बातमीनूसार संशयीत वणी सापुतारा रस्त्यावर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची गोपनीय बातमी मिळाली असता, त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला केलेल्या सुचनेनूसार पोलिस पथकाने सापुतारा ते वणी रोडवर खिराड फाटा परिसरात सापळा रचला, सदर ठिकाणी अंधारात ०३ चारचाकी वाहने रस्त्याचे कडेला उभी करून रोडने येणारे जाणारे नागरिकांना अडवून दरोडा घालण्याचे उद्देशाने काही संशयीत उभे असल्याचे दिसल्याने पथकातील अधिकारी व अंगलदार यांनी घेराव घालुन संशयीत जयप्रकाश पंढरीनाथ मेहेर (रा. सातपाडी, ता. पालघर, जि. ठाणे हल्ली. सुरगाणा, ता. सुरगाणा) रमेश देवाजी पवार (रा. मोकपाडा, ता. सुरगाणा) वसंत सिताराम पवार (रा. मोकपाडा, ता. सुरगाणा) संपत राजाराम मुढा (रा. अलंगुण, ता. सुरगाणा) लक्ष्मण मधुकर कोल्हे (रा. वडपाडा, ता. सुरगाणा) कमलाकर सुरेश गांगुर्डे (रा. वडपाडा, सुरगाणा) शिवदत्त सोमनाय विश्वकर्मा (रा. सुरगाणा, ता. सुरगाणा) यांना जागीच ताब्यात घेतले. यावेळी त्याचे कब्जात सिल्हर रंगाची तवेरा वाहन क्र. GJ-19-AA-5976, दुसरी सफेद रंगाची स्कॉर्पिओ वाहन क्र. GJ-21-AA-1989, व हिरव्या रंगाची तवेरा वाहन क्र. GJ-30-AA 2864 असे ०३ चारचाकी वाहने मिळुन आले, सदर वाहनांची व संशयीत इसमांची झडती घेतली असता, त्यांचे कब्जात ०३ डोन्ना कंपनीचे ब्लॅक पेपर स्प्रे, स्कु ड्रायव्हर, लोखंडी टॉमी, नायलॉन दोरीचा बंडल, चिकटपट्टी असे दरोडा टाकण्याचे साहित्य तसेच सोनेरी रंगाची धातुची बिस्किटे व नाणे, रोख ३ लाख १८ हजार ६६ रूपये, १३ मोबाईल हॅण्डसेट असा एकुण १२ लाख ७९ हजार ८६० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे.
ताब्यात घेतलेला आरोपी जयप्रकाश मेहेर हा सराईत गुन्हेगार असुन त्यांची पोलिसांनी अधिक विचारपुस केली असता, त्याने त्याचे साथीदारांसह ०४ ते ०५ दिवसामध्ये गुजरात राज्यात दरोडा टाकला असुन त्यात मिळालेली वरील रोख रक्कम असले बाबत सांगितले. तसेच सोनेरी रंगाचे धातुचे बिस्किटांबाबत विचारणा केली असता, सदर बिस्किटे व नाणे ही सोन्याची असल्याचे भासवुन आम्ही नागरिकांना तसेच वाहनांना अडवुन त्यांची लुटमार करत असतो असे सांगितले आहे. यातील आरोपी हे वणी सापुतारा रोडवर दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य साधने व वाहनासह अथवा काही तरी दखलपात्र स्वरूपाच्या मालाविरूध्दचा गुन्हा करण्याचे तयारीत असतांना मिळुन आले असून त्यांचे विरूध्द वणी पोलिस ठाणेस दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शनानुसार वणी पोलिस ठाणेचे अधिकारी व अंमलदार करीत आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे ग्रामीण पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि मयुर भामरे, वणी पो.स्टे. चे सपोनि स्वप्निल राजपुत, पोउनि उदे, तसेच स्थागुशाचे सपोउनि नाना शिरोळे, पोहवा दिपक आहिरे, प्रविण सानप, किशोर खराटे, नवनाथ सानप, पोकों गिरीष बागुल यांनी सदर कारवाई केली आहे.