esakal | मुबलक जलसाठ्यामुळे रब्बीला दिलासा; उन्हाळ कांद्याची धूम शक्य
sakal

बोलून बातमी शोधा

Onion

मुबलक जलसाठ्यामुळे रब्बीला दिलासा; उन्हाळ कांद्याची धूम शक्य

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : तालुक्यासह कसमादे भागात कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र सरासरीएवढा पाऊस झाला आहे. मालेगाव, नांदगाव व देवळा तालुक्यांत सरासरीच्या सव्वाशे ते दीडशे टक्के पाऊस झाला. केवळ चांदवड तालुक्यात अद्याप सरासरी एवढा पाऊस झालेला नाही. मुबलक पावसामुळे कसमादेतील तलाव, पाझर तलाव, धरणे, नाले, शेततळे व विहिरी तुडुंब भरल्या आहेत. पाण्याच्या उपलब्धतेमुळे आगामी रब्बी हंगाम जोरात असेल. विविध पाणीपुरवठा योजनांना वर्षअखेरपर्यंत पूरपाणी पुरू शकेल. साहजिकच कसमादेतील धरणांमधून शेतीसाठी हमखास आवर्तने मिळतील. त्यामुळे यंदाही उन्हाळी कांद्याची धूम दिसून येईल.

आगामी रब्बी हंगामाची शाश्‍वती

जून-जुलैच्या अडखळत सुरवातीनंतर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दमदार पाऊस झाला. यामुळे प्रमुख धरणे ओव्हरफ्लो झाली. गिरणा-मोसमसह इतर लहान नद्या दुथडी भरून वाहिल्या. मालेगाव तालुक्यातील माळमाथ्यावर तर सरासरीच्या दीडशे ते दोनशे टक्के पाऊस झाला आहे. विहिरी तुडुंब भरल्याने आगामी रब्बी हंगामाची शाश्‍वती निर्माण झाली. सध्या गिरणा, मोसमसह इतर नद्यांना कमी प्रमाणात का होईना पूरपाणी आहे. यातून पाणीपुरवठा योजनांचे जलसाठेदेखील भरून घेण्यात आले आहेत. मालेगावसह कसमादेतील विविध पाणीपुरवठा योजनांना वर्षअखेरपर्यंत पूरपाणी पुरू शकेल. परिणामी, धरणांमधील आवर्तने नवीन वर्षातच सुरू होतील. विहिरींमध्ये असलेले पाणी व धरणांमधील जलसाठा पाहता रब्बी हंगामाबरोबरोच उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाईल. गेल्या दोन वर्षांपासून कसमादेत उन्हाळी कांद्याचे मोठ्या प्रमाणावर पीक घेतले जात आहे.

हेही वाचा: लासलगाव : बनावट नोटा चलनात आणणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कसमादेतील आतापर्यंतचा पाऊस (मिलिमीटर)

तालुका - पाऊस - टक्केवारी

मालेगाव - ६५४ - १२९

नांदगाव - ९८५ - १७९

चांदवड - ३५२ - ६१

कळवण - ६४७ - ९३

बागलाण - ५४८ - ९९

देवळा - ५३७ - ११०

हेही वाचा: महागडे कांदा बियाणे पाण्यात! अतिवष्टीचा शेतकऱ्यांना मोठा फटका

loading image
go to top