esakal | रेमडेसिव्हिर’चा काळाबाजार करणाऱ्यांची सनद रद्द करा; पोलिस प्रशासनाचे पत्र
sakal

बोलून बातमी शोधा

remdesevir

रेमडेसिव्हिर’चा काळाबाजार करणाऱ्यांची सनद रद्द करा; पोलिस प्रशासनाचे पत्र

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या डॉक्टरांची सनद रद्द करण्याबाबत पोलिस प्रशासनाने महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीच्या कुलसचिवांना शुक्रवारी (ता. १६) पत्र पाठविले. यामुळे नाशिक शहरात खळबळ उडाली असून, काळा बाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पोलिस प्रशासनाचे राज्य होमिओपॅथी कौन्सिलला पत्र

गेल्या रविवारी (ता. ११) सामाजिक कार्यकर्ते योगेश मोहिते यांनी पंचवटी पोलिसांच्या मदतीने सद्‌गुरू हॉस्पिटलचे संचालक डॉ. रवींद्र मुळक यांना बाराशे रुपयाचे रेमडेसिव्हिर इंजेक्शन चढ्या दराने विक्री करताना पकडून दिले होते. या प्रकरणी पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक सुरेश देशमुख यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल गिरी तपास करीत आहेत. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे साथरोग प्रतिबंधक अधिनियमाच्या तरतुदींचा वापर करून ‘महाराष्ट्र कोविड-१९ नियमन २०२०’ निर्गमित केले आहे. दरम्यान, डॉ. मुळक यांनी जाणीवपूर्वक रेमडेसिव्हिरचा काळा बाजार करून ते अवाजवी किमतीत विक्री करण्याच्या उद्देशाने स्वत:च्या कब्जात बाळगल्याचे निष्पन्न झाले आहे. हा गुन्हा गंभीर असून, शासनाच्या आदेशाचे आणि महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद, मुंबई यांचेकडून प्राप्त झालेल्या नोंदणी प्रमाणपत्रातील तरतुदींचे उल्लंघन आहे. त्यामुळे मुळक यांची सनद तत्काळ रद्द व्हावी, अशा आशयाचे पत्र सहायक पोलिस आयुक्त प्रदीप जाधव यांनी महाराष्ट्र होमिओपॅथी परिषदेच्या कुलसचिवांना दिले आहे.

हेही वाचा: लग्नाचा बार उडवणे भोवले! यजमान, वऱ्हाडी मंडळींना कोरोनाची लागण

जामीन अर्ज फेटाळला

दरम्यान, डॉ. मुळक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यांची पाच दिवसांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने शुक्रवारी (ता. १६) पुन्हा न्यायालयात उपस्थित केले असता, आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर डॉ. मुळुक यांच्या वकिलांनी जामीन अर्ज सादर केला होता. मात्र, न्यायालयाने तो फेटाळला.

हेही वाचा: ‘टॉसिलिझुमॅब’ रॅकेटचे थेट मुंबई कनेक्‍शन! मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्‍यता