esakal | वयोवृद्ध दांपत्याचे लय भारी संशोधन! वाहनांचे वायुप्रदूषण कमी करणाऱ्या यंत्राचा शोध
sakal

बोलून बातमी शोधा

senior citizen reseacrh.jpg

देशात डिझेल व पेट्रोलच्या वाहनांनी वायुप्रदूषण होत आहे, त्यामुळे निसर्गावर व मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. हीच गरज ओळखून नाशिकच्या वयोवृद्ध दांपत्याने डिझेल वाहनांचे वायुप्रदूषण कमी करणाऱ्या यंत्राचा शोध लावला आहे.

वयोवृद्ध दांपत्याचे लय भारी संशोधन! वाहनांचे वायुप्रदूषण कमी करणाऱ्या यंत्राचा शोध

sakal_logo
By
हर्षवर्धन बोऱ्हाडे

नाशिक : देशात डिझेल व पेट्रोलच्या वाहनांनी वायुप्रदूषण होत आहे, त्यामुळे निसर्गावर व मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम पाहायला मिळत आहेत. हीच गरज ओळखून नाशिकच्या वयोवृद्ध दांपत्याने डिझेल वाहनांचे वायुप्रदूषण कमी करणाऱ्या यंत्राचा शोध लावला आहे.

वायुप्रदूषण कमी करणाऱ्या यंत्राचा शोध
अभियांत्रिकी शाखेत टॉपर असणारे राघवेंद्र देसाई व विज्ञान शाखेत पदवीधर असणाऱ्या त्यांच्या पत्नी सुषमा देसाई यांनी पुण्यात प्रदीर्घ काळ वास्तव्य केले. बुद्धिमत्तेच्या जोरावर राघवेंद्र देसाई यांनी अनेक खासगी कंपन्यांत नोकऱ्या केल्या. पुण्यामध्ये प्रदूषण जास्त असल्यामुळे प्रदूषणावर काही शाश्वत उपाययोजना व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी पोल्यूशन कंट्रोल युनिट बनविले. पोल्यूशन कंट्रोल युनिट असे या यंत्राचे नाव असून, शाश्वत वायुप्रदूषण रोखणे आता शक्य होईल, असा दावा संबंधित दांपत्याने ‘सकाळ’शी बोलताना केला. 

असे आहे पोल्यूशन कंट्रोल युनिट 
वाहनातून बाहेर पडणारे नायट्रोजन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, कार्बन डाय-ऑक्साइड या प्रदूषणाचा कारणीभूत असणाऱ्या द्रवपदार्थाला रोखण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक द्रवपदार्थ (द्रव्याचे नाव गुपित ठेवले आहे.) एका प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये भरल्यानंतर त्यांना एका बाजूने छिद्रे पाडलेले आहे. ही कॅन सायलेन्सरला बसविल्यानंतर सायलेन्सरमधून बाहेर पडणारा धूर कॅनमध्ये जाऊन विशिष्ट रासायनिक द्रव पदार्थांच्या संपर्कातून कॅनच्या दुसऱ्या छिद्रातून प्रवाहित केल्यानंतर घातक वायूंचे प्रमाण कमी होऊन तो हवेत मिसळला जाऊ शकतो. यामुळे ९० टक्के गाडीतून निघणाऱ्या धुरापासून प्रदूषण कमी होते, असा राघवेंद्र व सुषमा देसाई या दांपत्याचा दावा आहे. यासाठी त्यांनी प्रायोगिक तत्त्वावर मोटारसायकल, रिक्षा, स्कूटर व मोपेड या गाड्यांसाठी हा प्रयोग पुण्यामध्ये केलेला आहे. 

हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप


प्रयोगशाळेत तपासण्या 
पोल्यूशन कंट्रोल युनिट तयार केल्यावर याची तपासणी प्रयोगशाळेत करण्यात आली आहे. पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन प्रयोगशाळेत तपासणीद्वारे सकारात्मक अहवाल प्राप्त झाला आहे. त्याचबरोबर शरद पवार यांच्या बारामतीच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रयोगशाळेत या प्रकल्पाची मोफत तपासणी केली असून, यामुळे प्रदूषण कमी होते यावर शिक्कामोर्तब झाले आहे. प्रयोगशाळेच्या निष्कर्षावरून या युनिटला अधिकृतता प्राप्त झाली आहे. 

हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश


दहा वर्षांपासून प्रयत्न 
पोल्यूशन कंट्रोल युनिट राघवेंद्र व सुषमा देसाई यांनी दहा वर्षांपासूनच तयार केले आहे. दहा वर्षांत त्यांनी शासनाचे व खासगी कंपन्यांचे उंबरठे झिजविले, मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. या युनिटची माहिती त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, निवडक खासगी कंपन्यांना दिली, मात्र कोणीही प्रतिसाद दिला नाही. वयाच्या साठीनंतर लागलेल्या या शोधाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी वयोमानाची मर्यादा आल्याचे या दांपत्याचे म्हणणे आहे. 


असा होऊ शकतो वापर 
पोल्यूशन कंट्रोल युनिट हे दुचाकी अथवा चारचाकीच्या धूर निघणाऱ्या गाड्यांच्या सायलेन्सरच्या बाहेर बसविल्यावर त्यातून ९० टक्के प्रदूषणविरहित धूर बाहेर पडेल. त्याचप्रमाणे विविध कारखान्यांच्या चिमणीवर युनिट लावल्यास आकाशात प्रदूषणविरहित धूर बाहेर पडू शकतो. यामुळे प्रदूषण अत्यल्प प्रमाणात होऊन हवा खेळती राहील, मानवाला लागणारा प्राणवायूही दूषित होणार नाही. गेल्या दहा वर्षांपासून संशोधन आणि विकास तत्त्वावर हा शोध यशस्वी झाला आहे. यासाठी शासकीय पायऱ्या झिजविल्या मात्र यश आले नाही. वयोमानानुसार बाहेर कुठेही फिरू शकत नाही. -राघवेंद्र देसाई, संशोधक, पोल्यूशन कंट्रोल युनिट  

loading image