लष्करातील निवृत्त "तोपची'ही कोरोना विरोधात रणांगणात..आदेशाची प्रतीक्षा! 

artilary 5.jpg
artilary 5.jpg

नाशिक : हातात गन घेऊन देशाच्या सीमेवर एकेकाळी मर्दुमकी गाजविणारे लष्करातील तोपची निवृत्तीनंतर कोरोना साथरोगाच्या जैविक लढाईसाठीही रणांगणावर लढण्यासाठी आदेशाची वाट पाहात आहेत. प्रशासनाने त्यांना अद्याप रणांगणावर उतरण्याचा आदेश दिलेला नसतानाही ते बंदोबस्तापासून प्रबोधन आणि थेट पाच हजारांवर कोरोना संशयितांना "फ्लू क्‍लिनिक'च्या माध्यमातून तपासणी, स्क्रिनिंग ते जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यापर्यंतच्या लढाईत उतरले आहेत. 

निवृत्त तोपचींच्या वैद्यकीय सेवेची क्षमता
उपचारासाठी निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रशासनाला मोठे योगदान लाभू शकते. त्यासाठी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचे "इसीएचएस' हे मजबूत संघटन आहे. सध्या 23 हजारांहून अधिक लष्करी कुटुंबीयांना कोरोनाचा धोका उद्‌भवल्यास तातडीने योगदान देण्याकडे इसीएचएस पॉलिक्‍लिनिकने लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार दोन महिन्यांत एकट्या नाशिक जिल्ह्यात पाच हजारांहून अधिक रुग्णांची तपासणी करताना दोन संशयितांना कोरोनासदृश लक्षण दिसू लागताच तातडीने उपचार मिळवून देण्यासह निगेटिव्ह रिपोर्ट मिळेपर्यंत या पथकाने सेवा दिली आहे. नाशिक, औरंगाबाद, पुणे, मुंबई, मालेगाव, धुळे यांसह विविध भागांतील लष्करी कुटुंबीयांना उपचाराची या निवृत्त तोपचींच्या वैद्यकीय सेवेची क्षमता आहे. 

वैद्यकीय सेवेसाठी रणांगणात... 
लेफ्टनंट कमांडर सर्जन डॉ. किशोर म्हस्के, कर्नल दीपक खडसे, डॉ. मोनिका अग्रवाल, रंजना चौधरी आदींसह चार वैद्यकीय अधिकारी, एक दंतचिकित्सक, एक सक्षम लॅबोरेटरी, फार्मसिस्टसह जवळपास 125 तोपचींचे भक्कम पथक सध्या कार्यरत आहे. लष्करातील तसेच वैद्यकीय क्षेत्रात सेवेचा अनुभव असलेल्या या सैनिकांनी सध्या नाशिक जिल्ह्यासह धुळ्यापर्यंत लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यात दोन संशयितांना तपासून त्यांच्या लक्षणांबाबत थेट जिल्हा आरोग्य यंत्रणेपर्यंत पोचून संबंधितांची कोरोनाची चाचणी करून अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत पाठपुरावा केला आहे. 

बंदोबस्तापासून प्रबोधनापर्यंत 
लष्करात जवान ते सुभेदार, मेजरपर्यंत विविध पदांवरून निवृत्त झालेल्यांची आणखी एक भक्कम संघटना आहे. साधारण दीडशेच्या आसपास निवृत्त अधिकारी यात सहभागी आहेत. सुभेदार दिनकर पवार राज्याचे उपप्रमुख आहेत. राज्यभर या निवृत्त जवानांचे मोठे नेटवर्क आहे. कोरोनाच्या विरोधातील संघर्षात सध्या ही मंडळी कार्यरत आहे. त्यात रक्तदान, प्रबोधनासह पोलिसांच्या मदतीसाठी ते योगदान देत आहेत. नाशिक, मालेगाव, नांदगाव, धुळे यांसह विविध भागांत विविध सामाजिक उपक्रमांत निवृत्त जवानांचे योगदान राहिले आहे. त्यात, बॅरिकेडिंग बंदोबस्तात मदतीपासून तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या प्रबोधनापर्यंत सगळी कामे लष्करी क्षमतेत पार पाडण्याचे कसब या मंडळींमध्ये ओतप्रोत भरले आहे. 

हे निवृत्त तोपचीही कोरोना लढाईत मागे नाहीत

कोरोना विरोधातील लढाई ही वैश्‍विक लढाई आहे. या लढाईत सर्वांचेच योगदान महत्त्वाचे आहे. याच भूमिकेतून निवृत्त वैद्यकीय अधिकारी दोन महिन्यांपासून "फ्लू क्‍लिनिक'च्या माध्यमातून वैद्यकीय सेवेसाठी कार्यरत आहेत. -डॉ. किशोर म्हस्के, सर्जन, लेफ्टनंट कमांडर इंडियन नेव्ही (निवृत्त) 

एकूणच कोरोना विरोधातील लढाई निर्णायक टप्प्यावर पोचली असताना लष्करात मर्दुमकी गाजविणारे हे निवृत्त तोपचीही कोरोना लढाईत मागे नाहीत. प्रशासन हाक देईल, त्या क्षणाला पाहिजे त्या ठिकाणी जाऊन लढण्यासाठी निवृत्त तोपची आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत. -दीपक खडसे, निवृत्त कर्नल, इसीएचएस पॉलिक्‍लिनिक 

हेही वाचा > #Lockdown : 'लॉकडाउन'च्या अंधारावर उमटली चार चिमुकली पावले...'ते' देवदूतासारखे धावले मदतीला!    
 
पोलिस बंदोबस्तापासून तर रक्तदानासह आवश्‍यक त्या सगळ्या प्रकारच्या तयारीसाठी आतापासून आमचे अनेक सहकारी तत्पर आहेत. पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून मिळेल ती जबाबदारी पार पाडून, कोरोना या जैविक शत्रूविरोधात लढण्यासाठी सक्षम आहोत. -दिनकर पवार, निवृत्त सुभेदार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com