
देवळालीगाव क्रेडिट सोसायटीत 46 लाखांचा अपहार
नाशिकरोड : देवळाली गावातील सिद्धेश्वर क्रेडीट सोसायटी (Siddheshwar Credit Society) काही वर्षांपूर्वी ठेवीदारांच्या नावाने बोगस कागदपत्रे बनवून त्यावर कर्ज उचलून ४६ लाख २५ हजार रुपयांचा अपहार (appropriation) करण्यात आला. याप्रकरणी सोसायटीच्या संचालक, तसेच व्यवस्थापकासह उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी राजेश पंडितराव गायकवाड यांनी उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयित रमाकांत विश्वंभर दंडणे (रा. लिंगायत कॉलनी, देवळाली गाव) यांच्यासह सोसायटी संचालक व इतरांनी सहकारी संस्थेचे उपनिबंधक यांनी केलेल्या पोटनियम व सहकार आयुक्तांच्या परिपत्रकानुसार मंजूर कर्ज मर्यादेपेक्षा जास्त रकमेची कर्ज कर्जदारास देताना कर्जदारांकडून सुरक्षित तारण घेणे बंधनकारक आहे. असे असताना संबंधित संचालक व व्यवस्थापकांनी नागरी क्षेत्राबाहेरील आस्थापनेवरील कर्जदारांना कर्ज दिले.
तसेच संचालक व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांनी ठेवीदारांच्या नावाने बोगस कागदपत्रे बनवून त्यावर ठेवीदारांच्या सह्या घेतल्या. तसे ठेवीदारांच्या नावावर स्वतःच्या फायद्यासाठी बोगस कर्ज रक्कम उचलून तेरा लाख ४१ हजार चारशे रुपयांचा अपहार केला. त्याचप्रमाणे कर्जाची रक्कम कर्जदारांकडून वसुल करण्याची जबाबदारी असतानासुद्धा कर्जदारांकडून ३२ लाख ८२ हजार ८३३ व कर्जावरील व्याजाची रक्कम वसूल न करता त्यातील संगनमताने संस्थेचा ४६ लाख २५ हजार २३३ रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सदर प्रकार १ एप्रिल १९९५ ते ३१ मार्च २००८ या कालावधीत देवळाली गाव येथे कार्यरत असलेल्या सिद्धेश्वर को ऑपरेटिव्ह सोसायटीत घडला. असेही तक्रारीत म्हटले आहे.