

Nashik News : मल्टी लेव्हल मार्केटिंग व्यवसायाच्या निमित्ताने आर्थिक देवाणघेवाणीवरून झालेल्या प्रकाराचे पर्यावसन पाथर्डी फाटा येथील नरहरीनगर भागातील मनसेच्या एका पदाधिकाऱ्याच्या कार्यालयातील हाणामारीत झाले, तोडफोड झाली.
एकमेकांच्या विरोधात विनयभंग आणि लुटमारीची फिर्याद देण्यासाठी दोघे गट इंदिरानगर पोलिस ठाण्यात आले. (Thackeray group and MNS face to face due to misunderstanding nashik news)
परिसरात मात्र मनसे कार्यालयात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड झाल्याची चर्चा झाली आणि संपूर्ण भागात परिस्थिती तणावपूर्ण झाली.त्यामुळे ठाकरे गटाच्या आणि मनसेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ निरीक्षक नितीन पगार हेदेखील पोचले.
मात्र संपूर्ण प्रकारच गैरसमजातून घडल्याचे समोर आल्यानंतर नाहक पक्षिय रंग देण्यात आला हे स्पष्ट झाल्याने दोन्ही गटांनी सामोपचाराने प्रकरण मिटविले. मंगळवारी (ता. १७) दुपारी दीडच्या सुमारास नरहरीनगर येथील मनसेचे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. निकितेश ठाकरे आणि असोर्ट कंपनीची फ्रांचाईसी असलेले आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आनंद आहेर यांच्यात कंपनीमधील कर्मचारी युवतीच्या आर्थिक गुंतवणुकीवरून वाद झाला.
या वेळी संबंधित युवती तेथे होती. बोलाबोलीचे रूपांतर दमबाजी आणि हाणामारीत झाले. मात्र मनसे आणि ठाकरे गटात वाद झाल्याची चर्चा सर्व दूर पोचल्याने मोठी गर्दी झाली. ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपजिल्हाप्रमुख देवानंद बिरारी, उपमहानगरप्रमुख नीलेश साळुंखे, संजय गायकर, ऋषिकेश वर्मा, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख बाळकृष्ण शिरसाट, मदन डेमसे, धनंजय गवळी, त्र्यंबक कोंबडे, शारदा दोंदे, सुभाष गायधनी, नाना पाटील, श्रुती नाईक आदी कार्यकर्ते तेथे पोचले.
मनसे नेते माजी महापौर अशोक मुर्तडक, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, पराग शिंत्रे, नितीन माळी, महिला अध्यक्ष अक्षरा घोडके, स्वागता उपासनी आदी येथे आले.
काही काळ नेमका प्रकार काय आहे हे कुणालाही न कळल्याने मोठा गोंधळ झाला. अखेर सहाय्यक आयुक्त देशमुख यांनी सर्वांची बैठक घेत प्रकार जाणून घेतला. वरिष्ठ नेत्यांनीदेखील मग धाकराव, संबंधित युवती आणि आहेर यांच्याशी चर्चा करून अखेर गैरसमजातून हा प्रकार झाल्याचा निष्कर्ष काढत सामोपचाराने हे प्रकरण मिटविण्याचा निर्णय घेतला. असे असले तरी सायंकाळी उशिरापर्यंत दोघा पक्षांचे समर्थक येथे होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.