Nashik News : खरीप हंगामासाठी सोने तारण ठेवण्याची वेळ; पैसा उभा करताना शेतकऱ्यांची वणवण

Farmer News
Farmer Newsesakal

Nashik News : कांद्याला बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असून घरातील थोडेफार सोन्याचे दागिने तारण ठेवत वा मोडत पैसा उभा करण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण सुरू आहे.

उन्हाळ कांद्याच्या भरवशावर शेतकऱ्यांची आर्थिक गणिते जुळवली जातात. परंतु यावर्षी गारपिटीमुळे काही कांदा आधीच फेकला गेला आणि चाळीतील कांदा खराब होण्याच्या भीतीने आणि आर्थिक गरज भागविण्यासाठी जो भाव मिळाला त्या भावात कांदा विकावा लागला.

यामुळे शेतकऱ्यांच्या खिशात पैसा शिल्लक न राहिल्याने आता नाइलाजास्तव सोने गहाण ठेवून पैसा उभा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.(Time to Pledge Gold for Kharif Season Distress of farmers while raising money for seeds fertilizers Nashik News)

पीककर्जाच्या बाबतीत राष्ट्रीयीकृत बँका अपेक्षित प्रतिसाद देत नसल्याने शेतकऱ्यांचा भ्रमनिरास होत आहे. तर ग्रामीण भागात जिल्हा बँक आणि सोसायटींच्या माध्यमातून सहज कर्जपुरवठा केला जात असे. मात्र आता तेथेही मर्यादा पडत असल्याने शेतकऱ्यांना पैसा उभा करणे अवघड झाले आहे.

खरीप हंगाम तोंडावर आल्याने बी-बियाणे, खते, औषधे, मजुरी, मशागत अशा शेतीसाठी लागणाऱ्या अनेक बाबींसाठी पैसा लागणार आहे. याशिवाय शैक्षणिक वर्ष सुरू झाले असल्याने मुलांच्या शिक्षणासाठी आर्थिक जुळवाजुळव करता करता शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर सोने तारण ठेवून किंवा सोने मोडीत काढून पैशांची उपलब्धता केली जात आहे.

बँकांमध्ये सोने गहाण ठेवण्याकडे शेतकऱ्यांचा जास्त कल आहे. राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांनाही सोने तारण योजना सुरू करीत व्याजदर परवडणारे ठेवले आहेत. जवळील सोने मोडले तर ते पुन्हा खरेदी करणे शक्य नाही अशी भावना असल्याने सोने तारण ठेवून पैसा उभारण्याकडे लोकांची पसंती आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Farmer News
Jalgaon Railway News : मध्य रेल्वे सांडपाणी प्रक्रियेत अव्वल; पर्यावरणपूरक प्रकल्पांमुळे पाण्याच्या वापरात 6.3 टक्के घट

सध्या सोने गहाण ठेवत कर्ज घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. यात शेतकऱ्यांचा सहभाग मोठा आहे. काही शेतकरी तर अक्षरशः चार-पाच ग्रॅम सोन्याचे दागिने आणत त्यावर कर्ज घेत असल्याचे पतसंस्था, नागरी बँक संचालक यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

"सोने तारण ठेवणे आणि शेतमाल विकून तारण सोडविणे या प्रक्रियेचा अवलंब शेतकरी अनेक वर्षांपासून करीत आहेत. पूर्वी शेतकरी हातचे सोने विकून पैसा उभारायचा, पण आता मोडपेक्षा सोने तारणाकडे कल वाढला आहे. सोने मोडण्यापेक्षा त्यात आलेल्या घटपेक्षा तारणावरील व्याज अधिक परवडणारे असल्याने शेतकरी हातचे सोने न मोडता तारण ठेवणे अधिक पसंत करतो. त्यामुळे सोने तारण ठेवत कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढती आहे."

- विनोद शिंदे, अध्यक्ष, रामरावजी आहेर पतसंस्था देवळा

"सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. शेतकरी दांपत्य सोने तारण ठेवतात तेव्हा त्यांच्या मनाची घालमेल होत असली तरी पैशांची निकड मोठी असते. अशा वेळी आम्ही कमीत कमी वेळेत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आणि सुरक्षिततेची हमी देत सोने तारणावर कर्ज उपलब्ध करून देतो. सध्या तर दिवसाला ३०-३५ सोने तारण कर्ज प्रकरणे होत असतात."

- महेश जोशी, व्यवस्थापक, सुराणा पतसंस्था देवळा

"शासन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत आहे. लाल कांद्याचे अनुदान अद्याप मिळाले नाही, तसेच उन्हाळी कांद्याला अत्यल्प भाव मिळत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. शेतकऱ्यांच्या खिशात वा खात्यात पैसे नसल्याने नाइलाजास्तव छोटी-मोठी सोन्याची दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली आहे."

- जयदीप भदाणे, जिल्हाध्यक्ष, कांदा उत्पादक शेतकरी संघटना

Farmer News
Jalgaon News : गजानना तूच माझा मुलगा, तूच सांभाळ! आंबे वडगावच्या ‘त्या’ आजीची ‘डिस्चार्ज’प्रसंगी आर्त हाक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com