मंदिरे बंदचा आजचा पहिलाच 'श्रावणी सोमवार'! श्रावणातही बंद मंदिराचेच दर्शन

Trimbakeshwar_nj.jpg
Trimbakeshwar_nj.jpg

नाशिक / पंचवटी : व्रतवैकल्यांच्या श्रावण महिन्यात दर वर्षी मंदिरांमध्ये मोठी गर्दी उसळते. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने मंदिरे खुली करण्यास नकार दिल्याने श्रावणी सोमवारीही देऊळबंदच राहणार आहे. आजवर दीर्घकाळ मंदिरे बंद असण्याचा प्रसंग आलेला नव्हता, त्यामुळे प्रथमच आम्ही श्रावणातही बंद मंदिराचे दर्शन घेणार असल्याचे जुनेजाणते सांगतात. दरम्यान, पहिला सोमवार (ता. २७) असल्याने फराळाच्या विविध पदार्थांसह फळांना मात्र चांगली मागणी आहे. 

घरूनच दर्शनाचे आवाहन 
कोरोना उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर कपालेश्‍वर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंदच राहणार आहे. या मंदिराकडे जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारासह मागील बाजूने दोन ठिकाणांहून प्रवेश करता येतो. परंतु सध्या प्रशासनाने बंदी घातल्याने तिन्ही ठिकाणची प्रवेशद्वारे बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आली आहेत. पहिल्या सोमवारमुळे भाविकांनी घरूनच कपालेश्‍वराचे दर्शन घ्यावे, असे आवाहन विश्‍वस्त ॲड. भाऊसाहेब गंभिरे यांनी केले आहे. दरम्यान, निवडक पुजारीवर्गाच्या उपस्थितीत सकाळी महापूजा झाल्यावर मंदिराचे दरवाजे पुन्हा बंद होतील. 

फराळचे पदार्थ महागले 
श्रावण महिना म्हटले, की उपवास, व्रतवैकल्यांचे दिवस. सहाजिकच या महिन्यात काही जण महिनाभर, तर काही शनिवार, सोमवारी उपवास करतात. अधिक मागणीमुळे शेंगदाणे, साबूदाणा, खजूर, भगर आदींच्या दरात तेल्या वर्षीच्या तुलनेत किरकोळ वाढ झाल्याचे ओम ट्रेडर्सचे संचालक प्रवीण संचेती यांनी सांगितले. श्रावणी सोमवारच्या पार्श्‍वभूमीवर बाजारात मोठ्या प्रमाणावर केळीसह सफरचंद, पेरू दाखल झाले असून, त्याला चांगली मागणी आहे. 

दर असे
शेंगदाणे ः १०० ते ११० रुपये किलो 
साबूदाणा ः ६५ ते ७५ रुपये किलो 
भगर ः ९० ते ९५ रुपये किलो 
खजूर ः (लाल) ः ७० ते ८० 
काळी खजूर ः २८० ते ४०० रुपये किलो 
केळी ः २० ते ३० रुपये डझन 
सफरचंद ः १६० ते २०० रुपये किलो 
दूध ः साठ ते सत्तर रुपये लिटर 
 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com