सुरगाण्यात गैरसमजूतमुळे आदीवासी उपचाराविना अंथरूणाला खिळून

tribal community
tribal communityesakal
Summary

कोरोनाच्या महामारीमधून (corona virus) निसर्गाच्या कुशीत राहणारे आदिवासीही सुटले नाहीत. त्यातच कोरोनामुळे अपप्रतिष्ठा होते, अशी भीती पसरली. उपचारासाठी गाव-पाड्यांवरून तालुक्याच्या ठिकाणी आणि प्रकृती बिघडल्यावर नाशिकला जायचे. पण परत येऊ का? या प्रश्‍नाने रुंजन घातल्याने कोरोनाच्या चाचणीपासून उपचारासाठी न धजवणाऱ्यांची संख्या वाढत गेली. परिणामी, सरकारी उपचार पद्धतीकडे पाठ फिरवली गेली. अखेर आदिवासींनी नैसर्गिक आरोग्य पद्धतीचा अवलंब करत कोरोनायोद्ध्यांसाठीची प्रेरणा दिली. याच अनुषंगाने ‘सुरगाणा पॅटर्न' मालिका आजपासून...

नाशिक : सुरगाणा एकेकाळचे संस्थान. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील आदिवासीबहुल तालुका. सह्याद्री पर्वतरांगांनी वेढलेला व निसर्गराजाने नटलेला. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या (corona first wave) झळा या तालुक्याला फारशा बसल्या नाहीत. पण दुसऱ्या लाटेत १८९ गावांपैकी २८ गावांचा अपवाद वगळता इतरत्र कोरोनाने थैमान घातले. जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, फिरत्या आणि भरारी पथकाच्या डॉक्टरांनी कोरोनावरील उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. पण कोरोनाची लाट उसळलेली असताना डॉक्टर ‘पॉझिटिव्ह’ काढतात...माणसं मरतात, अशी गैरसमजूत गुजरातमधील हाकाटीमुळे पसरली. तिच्या ठसठशीमुळे आदिवासी उपचाराविना अंथरुणाला खिळून राहिले. (Tribal-people-misunderstanding-in-Surgana-nashik-marathi-news)

डॉक्टर पॉझिटिव्ह काढतात... मरतात माणसं

भाबडेपणा, आर्थिक अडचणींचा फायदा उठवत आदिवासींना ठकवण्याचा प्रकार आरोग्य सेवेपर्यंत धडकला. बोगस डॉक्टर, भगत बाबांनी आपली ‘पोळी’ भाजून घेतली. बाऱ्हे पट्ट्यात काविळीचे गावठी उपचार केले गेले. लोकप्रतिनिधींनी तालुक्यापासून ते जिल्हास्तरापर्यंतच्या बैठकींमधून त्याविरुद्ध आवाज उठवल्यावर आरोग्य यंत्रणेने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यातच भगताला कोरोना झाला आणि भगताने काढता पाय घेतला. हे एकीकडे होत असताना सरकारी दवाखान्यांमधील डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाने घेरले. सीमेपलीकडच्या गुजरातमधील गावातून चाचणीविना लसीकरण झालेल्यांचा मृत्यू झाल्याने आदिवासींमधील कोरोनाच्या उपचाराबद्दल भीती आणखी वाढत गेली. म्हणूनच ‘काही झाली तरी घरात राहाचंय’, असे आदिवासींनी ठरवून टाकले. दूरवरच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात जाऊन उपयोग तरी काय? या प्रश्‍नामुळे आदिवासी सरकारी दवाखान्यापासून अलिप्त राहू लागले. बोरगाव, बुबळी, उंबरठाण, पळसन, पांगारणे, आंबुपाडा-बाऱ्हे, माणी, मनखेड या प्राथमिक आरोग्य केंद्रांतील ‘ओपीडी’ची संख्या दणकन घसरली. लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर ‘सकाळ’ने संपूर्ण तालुक्यातील आदिवासींच्या नेमक्या व्यथा जाणून घेतल्या आणि त्यातून हे धगधगते वास्तव पुढे आले.

‘डेंजर झोन’चा गुंता वाढला कसा?

कोरोनाच्या पहिल्या लाटेत तालुक्यात १४० जण बाधित झाले. त्यातील तिघांचा मृत्यू झाला. मुळातच, निसर्गराजीमुळे आरोग्यसंपन्न आदिवासी. त्यांच्याच मधुमेह, हृदयरोग, फुफ्फुस, पोटाच्या विकारांचे प्रमाण कमी. मग अशावेळी ‘डेंजर झोन’चा गुंता वाढला कसा? असा प्रश्‍न स्वाभाविकपणे येतो. आदिवासी पावसाळ्यात शेतीच्या कामासाठी घरी राहतात. खरिपानंतर मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरणास सुरवात होते. कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर शेतीच्या कामासाठी आदिवासी जिल्ह्यातील द्राक्ष बागायती गावांमध्ये पोचले. अनेकांच्या दैनंदिन कामासाठी गुजरातमध्ये जाणे-येणे सुरू होते. कोरोनाची दुसरी लाट पसरली आणि आदिवासी आपल्या घराकडे आजार घेऊन परतले. त्याचप्रमाणे गुजरातमधून कोरोनासह आदिवासी आपल्या घरी पोचले. त्यामुळे गावागावांमधून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत गेली. कोरोनाग्रस्त कुटुंबांची संख्या वाढली. सरकारी डॉक्टरांनी तपासणीला आणि रुग्णांवर उपचार सुरू केले. दुसरीकडे मात्र डॉक्टर ‘पॉझिटिव्ह’ काढतात, अशी धारणा गच्च झाल्याने सरकारी दवाखान्यात पाय ठेवायला आदिवासी धजावत नव्हते. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी गावात-पाड्यावर चाचणीसाठी पोचल्यावर त्यांना आदिवासींनी हाकलून लावले. शिवाय घरी राहण्यातून अनेकांची प्रकृती आणखी खलावत गेली. निश्‍चित आणि नेमकी औषधे न मिळाल्याने २० जणांचा मृत्यू झाला. एकूण कोरोनाबाधितांची संख्या एक हजार ११९ पर्यंत पोचली. सुरगाण्यात कोरोना केअर सेंटरमध्ये ६५ खाटांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र प्रकृतीत बिघाड झाल्यावर वणी, अभोणा, पेठ अशा ३५ ते ६५ किलोमीटर दूरवरच्या डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटरमध्ये आणि प्रकृती गंभीर झाल्यावर नाशिकमधील जिल्हा रुग्णालयात उपचाराला जावे लागले. आदिवासींच्या उपचारासाठी जिल्हा प्रशासनातर्फे २० एप्रिल २०२१ पासून सुरगाण्यात ४० खाटांच्या डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटरची सोय करण्यात आली. आरोग्य विभागाने बुबळी प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० खाटांचे डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर, सुरगाण्यातील कोरोना केअर सेंटरमध्ये आणखी ३० खाटा मंजूर करून घेतल्या आहेत. प्राथमिक आरोग्य पथकाच्या कुकडणे आणि खोकरविहीर याठिकाणी प्रत्येकी ३० खाटांची व्यवस्था प्रस्तावित करण्यात आली आहे.

tribal community
कोविड रुग्णसेवा अखंडितपणे सुरू ठेवणार; हॉस्पिटल ओनर असोसिएशन

‘माझा डॉक्टर’ पोचले सुरगाण्यात

कोरोनाने आदिवासींच्या आरोग्याच्या गंभीर बनलेल्या प्रश्‍नांच्या पार्श्‍वभूमीवर नाशिकमधील ‘माझा डॉक्टर’ सुरगाण्यात पोचले. लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांच्या समवेत आदिवासी भागात जाऊन त्यांनी आदिवासींशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्यातून विविध प्रश्‍नांची उकल होण्यास मदत झाली. स्थानिक आदिवासींनी आपल्या नैसर्गिक आरोग्य पद्धतीचा अवलंब करण्याची तयारी दर्शवली. त्यातूनच सुरू झालेल्या उपक्रमातून राज्यातील आणि देशातील कोरोनायोद्ध्यांसाठी प्रेरणा देणारा ‘सुरगाणा पॅटर्न’ पुढे आलाय. पुढच्या भागात ‘माझा डॉक्टर’ यांचा उपक्रम असेल.

कोरोनाविषयक सुरगाण्यातील स्थिती

(दोन्ही लाटांची आतापर्यंतची आकडेवारी)

उपचार केंद्र मृत्यू दाखल रुग्ण बरे झालेले

सुरगाणा कोरोना केअर सेंटर ६ ५९६ ५९०

सुरगाणा डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर ६ ६० ५४

पेठ डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर १ ११ १०

अभोणा डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर ० २१ २१

वणी डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटर ० ६१ ६१

नाशिक जिल्हा कोरोना रुग्णालय २ ६२ ६०

खासगी रुग्णालये ४ ३३४ ३३०

गृहविलगीकरण ३ ४१६ ४१३

पळसन प्राथमिक आरोग्य केंद्र १ ० ०

(आज सुरगाणा कोरोना केअर सेंटरमध्ये एक आणि सुरगाणा डेडीकेटेड कोरोना हेल्थ सेंटरमध्ये चार रुग्ण आहेत)

tribal community
Nashik Unlock : दुपारनंतर द्यावा लागणार पुरावा अन्‌ ओळखपत्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com