
NMC Flower Festival : महापालिकेत आजपासून दोनदिवसीय पुष्पोत्सव; ‘स्वच्छ, हरित, फुलांचे नाशिक’चा नारा
नाशिक : महापालिका उद्याने व वृक्ष प्राधिकरण विभाग, नाशिक रोझ सोसायटी आणि नाशिक सिटीझन फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार (ता. २४) ते २६ मार्च, असा दोनदिवसीय पुष्पोत्सव होणार आहे. त्यानिमित्त गुरुवारी (ता. २३) नाशिक सायकलिस्टस फाउंडेशनच्या सहकार्याने पर्यावरणपूरक पुष्प सायकल रॅली काढण्यात आली. (Two day flower festival in NMC from today slogan of Clean Green Flowery Nashik nashik news)
अभिनेत्री अर्चना निपणकर यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी पाचला राजीव गांधी भवन पुष्पोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे. या वेळी रंगवेध हा नृत्याचा कार्यक्रम होणार आहे.
२४ ते २६ मार्च दरम्यान दोनदिवसीय नाशिक पुष्पोत्सव सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत नागरिकांसाठी खुला असणार आहे. पुष्पोत्सवानिमित्त छायाचित्र स्पर्धेसह विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
‘पुष्पोत्सव २०२३’ ला नागरिकांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त, प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले. दरम्यान, गुरुवारी आयुक्त तसेच उपायुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सायकल रॅली काढण्यात आली.
शहरातील फूल बाजार येथील गाडगे महाराज पुलाजवळ सायकलस्वार जमले आणि रॅलीला सुरवात झाली. आयुक्त स्वतः सायकलवर रॅलीत सहभागी झाले. तर ‘स्वच्छ नाशिक, हरित नाशिक, फुलांचे नाशिक’, असा नारा देत राजीव गांधी भवन येथे रॅलीचा समारोप झाला.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
नाशिक सायकलिस्टस संस्थेचे अध्यक्ष किशोर माने, उपाध्यक्ष जगन्नाथ पवार, सचिव अविनाश लोखंडे तसेच संस्थेचे सुरेश डोंगरे, चंद्रकांत नाईक, रवींद्र दुसाने, डॉ. मनिषा रौंदळ, एस. पी. आहेर, डॉ. नितीन रौंदळ, नरेश काळे, रामदास सोनवणे, अनुराधा नडे, दिलीप देवांग, मेघा सोनजे, अश्विनी कोंडेकर, कारभारी भोर, अरविंद निकुंभ, मनोज गायधनी, मनोज जाधव आदींसह पुष्पोत्सव आणि पर्यावरणाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ४० सायकलस्वार सहभागी झाले. साधना दुसाने, अमित घुगे यांनी रॅलीचे नियोजन केले.
सेल्फी पॉइंट, संगीत अन् नृत्याची मैफल
'नृत्य- रंगवेध’ या नृत्याचा कार्यक्रम या वेळी होणार आहे. शनिवारी (ता. २५) ‘स्वर सुगंध’ हा सुगम व शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होणार आहे. या दिवशी अभिनेता चिन्मय उदगीरकर, किरण भालेराव उपस्थित राहणार आहेत. २६ मार्चला अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल.