esakal | तयारी शून्य... मात्र, लसोत्सवाचा शासकीय यंत्रणेत ज्वर

बोलून बातमी शोधा

vaccine
तयारी शून्य... मात्र, लसोत्सवाचा शासकीय यंत्रणेत ज्वर
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : कोरोना संसर्गाच्या क्रमवारीत जागतिक पातळीवर भारताची आरोग्यविषयक पातळी खालावल्यानंतर येत्या शनिवार (ता. १)पासून अठरा वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करण्याची घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ज्यांच्याकडून लसीकरण केले जाणार आहे. त्या यंत्रणाच अद्याप संभ्रमात आहेत. केंद्र शासनाकडून आधीच लसींचा तुटवडा असताना आता शहरात लसीकरणासाठी पात्र ठरत असलेल्या बारा लाख लोकांची त्यात भर पडणार आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी लस कोठून आणणार येथपासून ते गर्दी झाल्यास आवर कोण घालणार, गर्दी कोरोना स्प्रेडर्स ठरली तर जबाबदार कोण, असे अनेक प्रश्‍न यंत्रणेला पडले आहेत. त्यामुळे राज्य टास्क फोर्सच्या आजच्या बैठकीत लस किती उपलब्ध होणार, असा सवाल उपस्थित झाल्यानंतर, ‘त्या वेळी बघू’, असे उत्तर देण्यात आल्याने लसोत्सव रामभरोसे चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: मरायचे असेल तर अकराच्या आत! शहरात मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर

तुटवडा कायम : नोंदणी केल्यानंतरच मिळणार लस

नाशिक शहराची लोकसंख्या २०११च्या गणणेनुसार १४ लाख ८६ हजार आहे. त्यात पुरुष व स्त्रियांचे प्रमाण जवळपास टक्केवारीनुसार निम्मे आहे. गेल्या दहा वर्षांत शहराची लोकसंख्या २१ लाखांपर्यंत पोचली आहे. ४५ वयोगटांपुढील लोकसंख्या तीस टक्के आहे. साधारण साडेसहा लाख लोकांचे लसीकरण सुरू आहे. आता केंद्र सरकारने अठरा ते ४५ वयोगटांसाठी देखील लसीकरणाची मोहीम एक१ मेपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बारा लाख लोकसंख्येला पुरेल एवढी लस उपलब्ध होणार नसल्याने अनेक समस्या लसोत्सवात उपस्थित होणार आहेत. शून्य ते १८ वयोगटांतील लोकसंख्या शहरात तीन लाखांच्या आसपास आहे. शहरात २७ महापलिकेचे, तर २४ खासगी लसीकरण केंद्रांची घोषणा करण्यात आली आहे. लसीकरणासाठी हवेशीर, मोकळी जागा असावी लागते. जेणे करून सहा फुटांचे अंतर प्रत्येकामध्ये ठेवता येईल. नियमाप्रमाणे नोंदणी केल्यानंतरच ठराविक वेळेत बोलावून संबंधित व्यक्तीचे लसीकरण केले जाणार आहे. मात्र, आरोग्य केंद्रांच्या जागेचा विचार करता सोशल डिस्टन्स नियमाचा फज्जा उडणार, हे स्पष्ट आहे. लसीकरणाला विलंब लागल्यास बसण्याची व्यवस्था, लस घेतल्यानंतर अर्धा तास संबंधित व्यक्तीला निगराणी खाली ठेवावे लागते, त्यांना बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाणी या पायाभूत सुविधांची मारामार, लसीकरणासाठी स्टाफ वाढविणे आदी समस्यांबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने लसीकरण उत्सव म्हणून साजरा होत असला तरी त्या उत्सवाला गालबोट लागण्याचीच दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: कमालच! स्कोर १५, रेमडिसिव्हीर अन् ऑक्सिजनशिवाय आजोबांची कोरोनावर मात

ॲन्टिजेन किटही लागणार

महापालिकेच्या आरोग्य केंद्रांवर लस घेण्यापूर्वी संबधित व्यक्तीने रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्याचे सूचना फलक लावले आहेत. त्याचबरोबर डॉक्टरांकडूनही ॲन्टिजेन टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो. अठरा ते ४५ वयोगटांतील मोठी संख्या असल्याने तेवढ्या प्रमाणात ॲन्टिजेन किट उपलब्ध नाही. लस शासन उपलब्ध करून देणार असले तरी, रॅपिड ॲन्टिजेन किट देणार नसल्याने महापालिका किंवा अन्य वैद्यकीय यंत्रणांना उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. परंतु ॲन्टिजेन किटचादेखील तुटवडा असल्याने या समस्या दुर्लक्षित करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: डॉक्टर म्हणताहेत..!"नाशिक-नगरची झंझट नको, आम्हाला ऑक्सिजन द्या"

लसीकरणातही वशिलेबाजी

४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण करताना ४५ वयोगटांखालील नागरिकांचेदेखील लसीकरण झाले आहे. त्यामुळे अठरा ते ४५ वयोगटांसाठी लसीकरण करताना वशिलेबाजी होण्याची शक्यता आहे. शासनाला लसीकरणाचा हिशेब द्यावा लागतो. एकूण प्राप्त झालेल्या लसींपैकी काही प्रमाणात वेस्टेज होते. वशिला लावून घेण्यात आलेल्या लस वेस्टेज प्रकारात दाखविल्या जात असल्याने त्यातून आडमार्गाने जाऊन लस घेणाऱ्यांचे फावत आहे. १८ ते ४५ वयोगटांतील लसोत्सवातदेखील वशिलेबाजी अधिक होण्याची दाट शक्यता आहे.

लसीकरणाची शहरातील आजची स्थिती

* एकूण प्राप्त डोस - २,८३,३१०

* डोसचा वापर- २,६८,४५२

* शिल्लक डोस - १४,८५८

* दिवसाला दिले जाणारे डोस - पाच ते साडेपाच हजार

* सध्या तीन दिवस पुरतील एवढे डोस शिल्लक.

...असे आहे लसीकरणाचे सूत्र

* ४५ वयापुढील नागरिकांचे नियमित महापालिकेच्या २७ केंद्रांवर लसीकरण

* १८ ते ४५ वयोगटांसाठी नोंदणी आवशक्यच

* नोंदणीनंतर घराजवळच्या केंद्रांचा संदेश मोबाईलवर मिळणार

* १८ ते ४५ वयोगटांच्या लसीकरणाला मर्यादा

* जेवढ्या लस प्राप्त होतील त्यातील प्रत्येकी ५० टक्के खासगी व शासकीय केंद्राला मिळणार

* खासगी केंद्रांत लसीकरणाचे दर निश्‍चित

* खासगी लसीकरण केंद्रांना शासनाच्या ॲपवर मागणी नोंदविणे बंधनकारक

* खासगी केंद्रांची लस वाटपाची माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध होणार

अठरा ते ४५ वयोगटांसाठी लसीकरण करताना नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे. नोंदणीनंतर मोबाईलवर संदेश आल्यानंतर जवळच्या केंद्रावर लस टोचून घेता येईल.

-डॉ. अजिता साळुंखे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, महापालिका