
Nandurbar St Bus News : ताफ्यात नवीन एसटी बस लवकरच दाखल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती
नंदुरबार : धुळे-नंदुरबार एसटी आगाराला लवकरच नवीन बस उपलब्ध करून देत एसटीची स्थिती सुधारणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी येथील प्रवासी संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांना लेखी पत्राद्वारे दिले (New ST bus in service soon Information about Chief Minister Eknath Shinde nandurbar news)
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ नंदुरबार व धुळे जिल्ह्यात अत्यंत खराब एसटी बस असल्याची तक्रार श्री. शिंपी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्या तक्रारीत एसटी बसची दयनीय अवस्था, त्यामुळे निर्माण झालेला प्रवाशांना धोका, त्याचा एसटी प्रवाशांवर होणारा परिणाम आणि त्यातून एसटीचे होणारे नुकसान या बाबींचा सविस्तर उल्लेख करीत सत्य परिस्थिती प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिंपी यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केली होती.
नंदुरबार जिल्ह्यात ३५० बस आहेत. त्यात ८० बस अत्यंत खराब स्थितीत आहेत. त्याचप्रमाणे नंदुरबार आगाराच्या ११० बस आहेत. जिल्ह्यामध्ये व जिल्ह्याबाहेर धावत असलेल्या गाड्या अत्यंत कुचकामी ठरल्या आहेत.
या संदर्भात प्रवासी संघटनेने लक्षात आणून दिले व या संदर्भात काही छायाचित्रे देण्यात आली होती. भंगार अवस्थेतील गाड्या, टायर नाही, नादुरुस्त गाड्या, ज्या गाड्या रस्त्यावर बंद पडतात, अशा गाड्या धावत आहेत. प्रवाशांना धक्का मारावा लागतो ही वस्तुस्थिती मांडण्यात आली.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यालयातून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, मुंबई यांना पत्र पाठविले. त्यात प्रवासी संघटना अध्यक्ष गजेंद्र शिंपी यांनी केलेल्या तक्रारीवर योग्य कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार शिंपी यांना नुकतेच मुख्यमंत्री कार्यालयाकडून लेखी स्वरूपात पत्र प्राप्त झाले. त्यात लवकरच दोन हजार नवीन एसटी बस टप्प्याटप्प्याने येणार आहेत. त्यानुसार धुळे व नंदुरबार यांना बस उपलब्ध केल्या जातील, असे म्हटले आहे.
"एसटी बसची दयनीय अवस्था झाली आहे. त्या संदर्भात अनेक तक्रारी आल्या होत्या. मी प्रत्यक्ष त्याची पडताळणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वस्तुस्थिती पत्राद्वारे मांडली होती. त्याची दखल घेऊन त्यांच्याकडून लवकरच नवीन बस पुरविण्याची ग्वाही मिळाली आहे."-गजेंद्र शिंपी, अध्यक्ष, प्रवासी संघटना, नंदुरबार